Sugarcane Crop Disease : ऊस पिकावरील विषाणूजन्य रोगांचे नियंत्रण

Sugarcane Disease Control : राज्यातील ऊस उत्पादनात तसेच उताऱ्यात घट दिसून येत आहे. यामागे अनेक कारणे आहेत. यापैकीच रोगांचा वाढता प्रसार व प्रादुर्भाव हे एक महत्त्वाचे कारण आहे.
Sugarcane Crop Disease
Sugarcane Crop DiseaseAgrowon
Published on
Updated on

डॉ. गणेश कोटगिरे,डॉ. ए. डी. कडलग

Sugarcane Disease Management : अलीकडे ऊस पिकांवर आढळणाऱ्या रोगांच्या संख्येत तसेच प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. यामागे एकाच भागात ऊस लागवडीखाली वाढलेले क्षेत्र, एक पीक पद्धती, पीक फेरपालटीचा अभाव, ऊस बेण्याची कमतरता, अशुद्ध व निकृष्ट बेण्याचा वापर, शिफारशीत नसलेल्या जातींची लागवड, बेण्यांची अनिर्बंध ने-आण, समस्यायुक्त जमिनीत लागवड,

खतांचा असंतुलित व अवेळी वापर, पूर्वमशागत तसेच आंतरमशागतीचा अभाव, किडींचा वाढता प्रसार व प्रादुर्भाव, पाण्याचा ताण तसेच अतिवापर, अतिवृष्टी व पूर परिस्थिती, पीक संरक्षणाविषयी शेतकऱ्यांची उदासीनता, हवामान बदल अशा विविध कारणे आहेत. या कारणांमुळेच रोगाच्या वाढीस व प्रसारास अनुकूल वातावरणनिर्मिती होते. त्यामुळे ऊस पिकावर रोगांचा प्रसार व प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.

प्रादुर्भाव होण्याची कारणे

ऊस पिकात बुरशी, सूक्ष्मजंतू, विषाणू, फायटोप्लाझ्मा, सूत्रकृमी, अन्नद्रव्यांची कमतरता, परोपजीवी वनस्पती यामुळे रोगांचा प्रादुर्भाव होतो. तसेच अलीकडे हवामानातील बदलांमुळे विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. रोगांमुळे तसेच विकृतीमुळे ऊस उत्पादन व साखर उताऱ्यात कमी-अधिक प्रमाणात घट दिसून येत आहे.

येत्या काळात उसाचे हेक्टरी उत्पादन वाढ तसेच साखर उतारा वाढविण्यासाठी विषाणूजन्य रोगांसह इतर रोगांचे प्रभावी नियंत्रण व व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी प्रादुर्भावाच्या लक्षणांनुसार रोगाची ओळख व त्यांचे प्रमाण ओळखून नियंत्रणाबाबत उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Sugarcane Crop Disease
Sugarcane Disease : ऊस पिकातील चाबूक काणी रोगाची लक्षणे

राज्यात व्यापारी लागवडीकरिता वेगवेगळ्या हंगामासाठी अनेक ऊस जातींची शिफारस करण्यात आली आहे. परंतु सर्व जाती कोणत्या ना कोणत्या तरी रोगास कमीअधिक प्रमाणात बळी पडतात. राज्यातील ऊस पिकामध्ये साधारणपणे ३० रोगांची नोंद झालेली आहे. राज्यात कोसी ६७१, को ८६०३२, कोव्हीएसआय ९८०५, कोएम ०२६५, एमएस १०००१, व्हीएसआय ०८००५ या ऊस जातींचे क्षेत्र वाढते आहे.

याशिवाय अलीकडे कोएम ९०५७, कोएम १५०१२, कोव्हीएसआय १८१२१ या नवीन शिफारशीत जाती लागवडीस उपलब्ध झालेल्या आहेत. अनुकूल परिस्थितीत कोणत्याही रोगाचा प्रसार व प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो. किडींच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि निकृष्ट बेण्याच्या वापरामुळे विविध विषाणूजन्य रोगांचे प्रमाण वाढत आहे. खोडवा पिकामध्ये रोगाचे प्रमाण लागण पिकापेक्षा जास्त दिसते.

मागील ४ ते ५ वर्षांपासून राज्यात लागवडीखाली असलेल्या को ८६०३२ या प्रमुख ऊस जातीवर तसेच इतर रुंद पाने असणाऱ्या जातींमध्ये यलो लीफ डिसीज या रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार झपाट्याने होत आहे. इतरत्र या रोगामुळे ऊस उत्पादनात ३० ते ५० टक्के घटल्याचे दिसून आले आहे. लागण पिकापेक्षा खोडवा पिकात या रोगाचे प्रमाण जास्त आढळते.

येलो लीफ डिसीज

मागील ४ ते ५ वर्षांपासून को ८६०३२ या प्रमुख ऊस जातीवर तसेच इतर रुंद पाने असणाऱ्या जातींमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार झपाट्याने होत आहे.

रोगामुळे ऊस उत्पादनात ३० ते ५० टक्के घट आल्याचे उदाहरणे आहेत. लागण पिकापेक्षा खोडवा पिकात या रोगाचे प्रमाण जास्त आढळते.

लक्षणे

पीक पाच ते सहा महिन्यांचे झाल्यानंतर रोगाचा प्रादुर्भाव दिसण्यास सुरुवात होते.

प्रथम शेंड्याकडील ३ ते ४ पानांवर रोगाची लक्षणे स्पष्ट दिसतात.सुरुवातीला पानाची मध्य शिर खालील बाजूने पिवळी पडते. कालांतराने संपूर्ण पान पिवळे होते. यामुळेच या रोगाला ‘येलो लीफ डिसीज’ (पाने पिवळी पडणारा रोग) असे म्हणतात.

पानाची मुख्य शिर पिवळी पडण्याची सुरूवात पानाच्या टोकाकडील भागापासून होऊन संपूर्ण शिर पिवळी पडते. असा पिवळसरपणा फक्त शिरेपुरता मर्यादित राहतो किंवा शिरेच्या दोन्ही बाजूंना मध्य शिरेला समांतर दोन-तीन सेंमीपर्यंत वाढत जातो. या रोगाने आलेला पिवळसरपणा पक्व झालेल्या उसात ऑक्टोबर ते मार्चपर्यंत दिसून येतो. पिवळसरपणा मध्यशिरेपासून पूर्ण पानावर पसरत जातो. अखेरीस सर्व पाने पिवळी पडून वाळत आलेल्या भागाचा आकार इंग्रजी ‘व्ही’ (V) अक्षरासारखा दिसून येतो.

रोगाचे प्रमाण वाढल्यास पाने हळूहळू वाळत जातात. अशी लक्षणे लागवडीखाली असणाऱ्या बऱ्याच जातींवर आढळून येतात.

Sugarcane Crop Disease
Sugarcane Disease : ऊसावरील पोक्का बोंग, तपकिरी तांबेरा रोगाचे नियंत्रण

रोगचक्र

रोगग्रस्त बेणे लागणीस वापरल्यास त्यातून रोगाचा प्रसार होतो. अतिरोगग्रस्त पिकाचा खोडवा घेतल्यास खोडवा पीक अत्यंत दयनीय अवस्थेत वाढताना दिसते. कारण ३ ते ४ महिन्यांत विषाणूंची वाढ झपाट्याने होऊन खोडवा पिकाला फटका बसतो.

रोगाचा दुय्यम प्रसार मावा किडीद्वारे होतो. मावा कीड-रोगग्रस्त उसातील रस शोषून नंतर निरोगी उसातील रस शोषते. त्या वेळी या रोगाचे विषाणू निरोगी जातींमध्ये शिरकाव करून रोगास कारणीभूत ठरतात.

ऊस वाढीवर आणि उत्पादनावर होणारा परिणाम

लागणीच्या उसात या रोगाचा प्रादुर्भाव कमी असल्यास ऊस वाढीवर फारसा परिणाम आढळून येत नाही. परंतु खोडवा पिकावर अधिक परिणाम होऊन उत्पादनात मोठी घट येऊ शकते.

रोगाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या पिकात उसाची जाडी व उंची कमी झाल्यामुळे उत्पादनात घट येते.

निरोगी ऊस आणि यलो लीफ डिसीज रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या उसाच्या कांड्यांची संख्या जरी एकसारखी असली तरी दोन्हींच्या वजनामध्ये मोठी घट दिसून येते. कारण येलो लीफ डिसीज रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या उसाची कांडी आखूड आणि वजनाने हलकी असते. एकंदरीत उसाच्या उत्पादनात सरासरी ३० ते ५० टक्के घट दिसून येते. तसेच साखर उताऱ्यातही लक्षणीय घट होते.

समशीतोष्ण विभागातील काही जातींवर शेंडा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला असल्यास, लीफ डिसीज रोगाचा प्रादुर्भाव लवकर झाल्याचे दिसून येते. सध्याची प्रचलित को ८६०३२ ही जात या रोगास काही भागात पूर्ण बळी पडल्याचे निदर्शनास आले आहे. खोडवा पिकात या रोगाचा प्रादुर्भाव जास्तच वाढल्याचे दिसून येत आहे. खोडवा व्यवस्थापन योग्यरीत्या न केल्यास रोगाची तीव्रता ही चिंतेची बाब ठरू शकते.

कोइमतूर येथील ऊस पैदास संस्थेमध्ये घेतलेल्या प्रयोगामध्ये मिळालेले निष्कर्ष

रोगग्रस्त उसाच्या वजनात ३७.२३ टक्के घट झाली.

उसाची जाडी १५.२५ टक्के कमी झाली.

को ८६०३२ या ऊस जातीच्या १२ महिने वयाच्या उसात रसाचे प्रमाण अभ्यासले असता, रोगग्रस्त उसातील रसाचे प्रमाण २७.९ टक्के प्रति किलो, तर रोगमुक्त उसातील रसाचे प्रमाण ४२.९९ टक्के प्रति किलो उसामध्ये दिसून आले.

रोगाचे नियंत्रण

रोगप्रतिकारक ऊस जातींची लागवड करावी.

उति संवर्धित रोपांपासून बेण्याची वाढ केलेल्या बेणे मळ्यात रोगाचे प्रमाण कमी असते. म्हणून अशा बेणेमळ्यातून बेणे लागणीसाठी घ्यावे.

रोगाचा प्रसार प्रामुख्याने मावा या किडीमार्फत होते. मावा किडीचे एकात्मिक नियंत्रण करावे.मावा कीड नियंत्रणासाठी

(फवारणी : प्रतिलिटर पाणी)

इमिडाक्लोप्रीड ०.३ मिलि

पिकामध्ये जैविक आणि अजैविक घटकामुळे होणारा ताण कमी करावा.

पिकात तणांचा प्रादुर्भाव कमी राहील याची काळजी घ्यावी.

माती परीक्षण अहवालानुसार सेंद्रिय, रासायनिक व जैविक खतांचा वापर करावा.

रोगग्रस्त पिकाचा खोडवा घेऊ नये.

(लेबलक्लेम शिफारस आहे.)

गवताळ वाढ

हा रोग बेण्याद्वारे व किडीद्वारे पसरणाऱ्या फायटोप्लाझ्मा या अतिसूक्ष्म विषाणूमुळे होतो.

को ४१९, कोसी ६७१, कोएस ०२६५ व को ८६०३२ या जातींमध्ये रोगाचे प्रमाण जास्त आढळते.

महाराष्ट्रात या रोगाचे प्रमाण १० टक्क्यांपर्यंत आहे.

पीक वाढीच्या सर्व अवस्थेत रोगाचा प्रादुर्भाव आढळतो.

रोगाचा प्रसार मुख्यत्वेकरून दूषित बेण्यामार्फत व किडीद्वारे होतो.

लक्षणे

या रोगामुळे पिकाच्या सुरवातीच्या काळात ऊस बेटात प्रमाणापेक्षा जास्त फुटवे दिसतात. बेटास गवताच्या ठोंबाचे स्वरूप येते. बेटांत फुटव्यांची संख्या कधी-कधी १०० पेक्षा जास्त आढळते. रोगामुळे उसाच्या पानामध्ये हरितद्रव्य कमी प्रमाणात तयार होत असल्याने पाने पिवळी किंवा पांढरी पडतात.

रोगग्रस्त बेटात गाळपालायक ऊस तयार होत नाहीत. रोगग्रस्त उसावरील पाने अरुंद व आखूड होतात. पूर्ण वाढ झालेल्या उसास रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास, पोंग्यातील पाने पिवळी पडतात. कांड्यावरील डोळ्यांतून पिवळसर पांगशा फुटतात. रोगट ऊस नंतर पोकळ पडतो व वाळतो.

गवताळ वाढ रोगामुळे ५ ते २० टक्क्यांपर्यंत ऊस उत्पादनात घट येते. खोडवा पिकात रोगामुळे जास्त प्रमाणात बेटे पिवळी पडून मरतात. रोगाचे प्रमाणदेखील सुरवातीच्या काळात जास्त आढळते. रोगग्रस्त खोडवा पिकातील उसांची संख्या कमी झाल्याने उत्पादनात घट येते.

नियंत्रण

बेणे मळ्यातील रोगमुक्त बेणे लागवडीसाठी निवडावे.

बेणेमळ्यासाठी मूलभूत बेणे तयार करण्यासाठी लागवडीपूर्वी बेण्यास बाष्प उष्ण हवा प्रक्रिया ५४ अंश सेल्सिअस तापमानास १.५ तास मिनिटे करावी.

उसाची उगवण झाल्यानंतर नियमितपणे ऊस पिकाची पाहणी करून रोगग्रस्त बेटे काढावीत. ती त्वरित जाळून नष्ट करावीत. शक्यतो हा बेटे निर्मूलनाचा कार्यक्रम सामूहिक पद्धतीने राबविल्यास रोगाचे नियंत्रण प्रभावीपणे करता येईल.

बेणे छाटण्यावेळी वापरलेला कोयता अधूनमधून उकळत्या पाण्यात बुडवावा.

उसावरील रस शोषण करणाऱ्या किडींचा बंदोबस्त वेळीच करावा. जेणेकरून रोगाचा प्रसार होणार नाही.

रोगाचे प्रमाण २० टक्के त्यापेक्षा जास्त असल्यास, त्या पिकाचा खोडवा घेऊ नये. पिकाची फेरपालट करावी.

डॉ. गणेश कोटगिरे, ८७८८१५३३३२

डॉ. ए. डी. कडलग, ८२७५०३३८२३

(ऊसरोग शास्त्र विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.), पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com