Team Agrowon
ऊस पिकामध्ये बदलत्या वातावरणामुळे चाबूक काणी या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. रोगाचा प्रादुर्भाव पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत होऊ शकतो.
पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत रोगाचा प्रादुर्भाव होतो. लागण ऊसापेक्षा खोडवा उसात रोगाचे प्रमाण जास्त आढळते.
रोगामुळे लागवडीच्या पिकामध्ये २९ टक्के; तर खोडवा पिकात ७० टक्क्यांपर्यंत उत्पादनामध्ये नुकसान होते. त्यासाठी वेळीच नियंत्रणासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
रोगग्रस्त उसाच्या शेंड्यामधून चाबकासारखा चकचकीत चांदीसारखे पातळ आवरण असलेला व शेंड्याकडे निमुळता झालेला १ ते १.५ मीटर लांबीचा पट्टा बाहेर पडतो.
या पट्ट्यावरील आवरण तुटल्यानंतर आतील काळा भाग दिसतो. तो भाग म्हणजेच या रोगाचे बीजाणू.
साधारणतः १० ते १२ सें.मी. लांब पट्ट्यात ५० ते ५५ कोटी बीजाणू असतात. हे बीजाणू हवेद्वारे विखुरतात व निरोगी उसाचे डोळ्यावर पडतात. हे बीजाणू रोगाचा प्रसार करतात.
रोगट बेटातील ऊस कमी जाडीचे राहतात. पाने अरुंद व आखूड राहतात. कधी कधी बेटात जास्त फुटवेदेखील आढळतात.
उभ्या उसास रोगाची लागण झाल्यास काणीयुक्त पांगशा फुटतात. कालांतराने रोगट बेटे व ऊस वाळून जातात. त्यामुळे ऊस उत्पादनावर व साखर उताऱ्यावर विपरीत परिणाम होतो.