
Pune News: गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात नांगरणीची इतर शेतीकामे खोळंबली आहेत. शुक्रवारी (ता. २३) सकाळी आठपर्यंत जिल्ह्यात बहुतांश तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात संततधार पाऊस झाला. काही ठिकाणी रात्री सुरू झालेला पाऊस पहाटेपर्यंत सुरू होता. त्यामुळे अनेक ठिकाणी फळपिकांचे नुकसान झाले आहे.
पुरंदर तालुक्यातील सासवड येथील राजेवाडीत वादळी वाऱ्याने शेवग्याचे नुकसान झाले. सणस मळा परिसरात झालेल्या पावसाने संपत गोविंद सणस यांच्या शेतातील शेवग्याची झाडे उन्मळून पडल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या झाडांना सध्या मोठ्या प्रमाणात शेंगा लागल्या होत्या. फुलांचा बहरही आला होता, ज्यामुळे चांगल्या उत्पन्नाची आशा होती. मात्र वादळी वाऱ्याने जवळपास २०० झाडे उन्मळून पडल्याने नुकसान झाले आहे.
बारामतीमध्ये संततधार पाऊस गुरुवारी (ता. २२) रात्रीपासूनच सुरू झाला. शुक्रवारी (ता. २३) देखील पहाटेपासून पाऊस कायम आहे. ऐन मे महिन्यात बारामतीकरांना रेनकोट व छत्री बाहेर काढावी लागली. शहरातील अनेक रस्त्यांवर अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचून राहिलेले होते.
आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार येथे मे महिन्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे वेळ नदीवर असलेले दहा कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याने तुडुंब भरले आहेत. तळ गाठलेल्या ६०० हून अधिक विहिरींना दहा फुटांपर्यंत पाणी आले. नदीकाठच्या विहिरींच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली. बंद पडलेल्या कूपनलिकेला पाणी आले आहे. पण या भागातील पिण्याच्या पाण्याचे टँकर मात्र अजूनही सुरूच आहेत.
कुरवंडी, थुगाव, भावडी, कोल्हारवाडी, कारेगाव, पेठ व पारगाव तर्फे खेड या भागातील शेती पडणाऱ्या पावसावरच अवलंबून असते. दरम्यान, चारा उपलब्ध नसल्याने गुरांसाठी दूरवरच्या भागातून विकत चारा शेतकऱ्यांना आणावा लागतो. पण या वर्षी वरुणराजाची कृपा झाली. गुरुवार (ता. १५) ते गुरुवार (ता. २२) या कालावधीत दररोज पाऊस पडला. यामुळे वेळ नदीला पूर आला. नदीवरील बंधारे पाण्याने भरले आहेत.
खेड तालुक्यातील वाशेरे येथील भोतेवाडीत वादळी पावसाने दोन अक्षरशः थैमान घातले. वादळात वस्तीवरील सुमारे वीस ते पंचवीस घरावरील व गोठ्यांवरील कौले, पत्रे उडाले. आठ ते दहा झाडे उन्मळून पडली. काही विजेचे खांब कोसळले तर काही जागेवरच वाकले. शेताची बांधबंदिस्ती वाहून गेली.
वस्तीवरील सुमारे पस्तीस कुटुंबांनी मंगळवारी (ता. २०) सायंकाळी वादळी पावसामुळे रात्र अक्षरशः जीव मुठीत धरून काढली. खेड तालुक्यात गेल्या आठवड्याभरापासून मॉन्सूनपूर्व पावसाची दररोज हजेरी लागत आहे. तालुक्याचा पश्चिम पट्टा पावसाने अक्षरशः धुऊन काढला आहे. यात शेतीसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वाशेरे परिसरात वादळी पावसाने थैमान घातले.
उंब्रज परिसरात ढगफुटीसदृश पाऊस
जुन्नर तालुक्यातील उंब्रज परिसरात झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे केळी बागांचे तसेच इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. दत्तात्रय प्रभाकर हांडे, बाळासाहेब प्रभाकर हांडे, जयश्री शशिकांत हांडे, तान्हाजी बाळशीराम हांडे, बाबूराव भीमाजी नलावडे, विशाल वसंत शिंगोटे, पोपट वामन चौधरी, प्रणित हांडे, प्रणय हांडे या उंब्रज आणि काळवाडी येथील शेतकऱ्यांच्या २० एकर क्षेत्रातील केळी बागांचे २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले, ओतूरचे मंडल कृषी अधिकारी प्रवीण नंदकुळे, तलाठी नितीन लांडे, सहायक सुनील आल्हाट, पोलिस पाटील राहुल हांडे यांनी घटनास्थळी येऊन नुकसान झालेल्या केळी बागांची पाहणी केली. या वेळी सरपंच हिरामण शिंगोटे, सुनील वामन, तान्हाजी हांडे उपस्थित होते. लवकरात लवकर शेतकऱ्यांची झालेली नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
घरकुलांचे मोठे नुकसान
वादळाच्या तडाख्यातून शासकीय योजनेतून बांधलेली घरकुले सुद्धा सुटली नाहीत. घरकुलांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वाऱ्याचा वेग एवढा होता की काही पत्रे सुमारे चारशे फूट दूर अंतरावर जाऊन पडले. बहुतेकांच्या घरावरील छप्पर उडाल्याने घरातील अन्नधान्यासह किमती वस्तू भिजल्या. परिसरातील विजेचे खांब जमीनदोस्त झाल्याने दोन दिवसांपासून वीज गायब आहे. अनेक खांब वाकले आहेत.
शुक्रवारी (ता. २३) सकाळी आठपर्यंत झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये
भोर- ४९
गिरीवन- २८
बारामती - २१.५
एनडीए - १७.५
तळेगाव-ढमढेरे १४
पाषाण - १३.५
चिंचवड - १२
हवेली - ११.५
शिवाजीनगर - १०.५
हडपसर - १०
वडगाशेरी - १०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.