Cotton Farming : प्रतिकूल परिस्थितीत उत्पादनात सातत्य

Cotton Cultivation : कापूस हे महाजन यांचे प्रमुख पीक आहे. मका, दादर ज्वारी व हरभरा ही पिके देखील ते विविध हंगामात घेतात. त्यांची शेती बागायती असली, तरी मागील काही वर्षे पाऊसमान कमी असल्याने पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
Cotton Farming
Cotton FarmingAgrowon

Cotton Farming Management :

शेतकरी नियोजन

पीक : कापूस

शेतकरी : सुनील दगडू महाजन

गाव : अकुलखेडे, ता. चोपडा, जि. जळगाव

कापूस क्षेत्र : पाच ते सहा एकर

अकुलखेडे (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील सुनील दगडू महाजन यांच्या कुटुंबाची अकुलखेडे शिवारात सहा एकर तर चहार्डी (ता. चोपडा) शिवारात चार एकर काळी कसदार जमीन आहे. अकुलखेडे गावशिवार चंपावती नदीच्या लाभक्षेत्रात येते. महाजन यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले असून, वयाच्या विसाव्या वर्षापासून ते शेतीत कार्यरत झाले. नाला खोलीकरण व जलसंधारणाच्या अन्य कामांमध्ये ते सक्रिय असतात.

प्रतिकूल स्थितीत नियोजनाचा प्रयत्न

कापूस हे महाजन यांचे प्रमुख पीक आहे. मका, दादर ज्वारी व हरभरा ही पिके देखील ते विविध हंगामात घेतात. त्यांची शेती बागायती असली, तरी मागील काही वर्षे पाऊसमान कमी असल्याने पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

जलसाठे मुबलक नाहीत. तीन कूपनलिका आहेत. कमी पाऊसमानाचा परिणाम यंदाच्या कापूस शेती नियोजनावरही झाला आहे. दरवर्षी आठ ते १० एकरांत त्यांचे पूर्वहंगामी कापूस पीक असते. परंतु यंदा क्षेत्र कमी करावे लागणार असून ते पाच ते सहा एकरांपर्यंत ठेवण्याचा विचार आहे.

Cotton Farming
Cotton Seed : अकोल्यात कपाशीच्या बियाण्यासाठी शेतकरी रस्त्यावर

व्यवस्थापनातील बाबी

कापूस शेती व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी सांगायच्या तर हरभरा, बाजरी, पपई ही बेवड पिके कापसासाठी महत्त्वाची असल्याचे महाजन सांगतात. मागील रब्बीत काबुली हरभरा घेतलेल्या क्षेत्रात कापसाची यंदा लागवड असेल. काळी कसदार जमीन असल्याने सिंचन व्यवस्थापनावर अधिक लक्ष केंद्रित करून काम करावे लागणार आहे.

या जमिनीत पाणी अधिक झाल्यास ते तुंबून राहणार नाही याची काळजी घेतली जाते. उताराचे शेत लागवडीसाठी निवडण्यात येते. आधीचे पीक द्विदलवर्गीय म्हणजे हरभरा आहेत. पण पीक अवशेषही जमिनीत गाडण्यात येतात. त्यानंतर ट्रॅक्टरद्वारे पूर्वमशागत केली जाते. जमीन सुमारे अडीच महिने तापू दिली जाते.

ती भुसभुशीत करून घेण्यात येते. लागवडीसाठी बीजी टू वाणाची निवड केली जाते. कमी कालावधीचा वाण निवडला जातो. सुमारे १०० ते ११० दिवसांत त्याची वेचणी करता येते. त्याची बोंडे वजनदार, मऊ व वेचणीला सुकर असतात. लागवड मे अखेरीस किंवा एक जूनपूर्वी करण्यावर भर असतो. लागवडीचे अंतर पाच बाय अडीच फूट असते.

ठिबक सिंचनाच्या मदतीने पाणी दिले जाते. पावसाची परिस्थिती ओळखून पिकास सुरुवातीला दररोज एक तास पाणी दिले जाते. पीक १० ते १२ दिवसांचे झाल्यानंतर दररोज अर्धा तास सिंचन केले जाते. पाऊस लांबल्यास सिंचन सुरूच ठेवले जाते. नत्र, स्फुरद, पालाश व सूक्ष्मअन्नद्रव्यांचे एकरी प्रमाण कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसारर ठेवले जाते.

Cotton Farming
Cotton Crop Management : कापूस पिकातील उर्वरित अवशेषांचे व्यवस्थापन

उत्पादन

शत्रूकीड व मित्रकीटक यांची ओळख करून त्यानुसार निंबोळी अर्क व जैविक कीडनाशकांचा वापर केला जातो. गुलाबी बोंड अळी ही अलीकडील वर्षांतील मोठी समस्या असल्याने त्याबाबत पिकाचे सतत निरीक्षण केले जाते. डोमकळ्या काढून टाकल्या जातात.

एकरी पाच कामगंध सापळे लावले जातात. रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी पिवळे व निळे चिकट सापळे लावले जातात. यामुळे फवारणीवरील खर्च काही प्रमाणात वाचतो. काडी-कचरा दूर करून स्वच्छ कापूस साठविण्यावर भर असतो.

यामुळे दर चांगला मिळविता येतो. महाजन सांगतात की कापूस शेतीतील हवामान विषयक समस्या वाढल्या आहेत. मजुरांचा तुटवडा निर्माण झाला आहे. फवारण्या वेळेवर होणे कठीण झाले आहे. तरीही प्राप्त प्रतिकूल परिस्थितीत चांगले नियोजन करून एकरी आठ ते दहा क्विंटलपर्यंत उत्पादनात सातत्य ठेवले आहे.

ज्यावेळी अन्य शेतकऱ्यांना हेच उत्पादन चार ते पाच क्विंटल मिळते त्या वेळीही माझे उत्पादन स्थिर प्रमाणात असते असे महाजन सांगतात. अलीकडील काळात क्विंटलला सहा हजारांपासून ते कमाल ११ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला आहे.

सुनील महाजन ९८५०१७७४९१

(शब्दांकन : चंद्रकांत जाधव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com