Cotton Crop Management : कापूस पिकातील उर्वरित अवशेषांचे व्यवस्थापन

Article by Vilas Chavan, Ms. Sindhu Rathod : कापूस हे जगातील सर्वात महत्त्वाचे तंतू पीक असून, शेतकऱ्यांसाठी नगदी पीक आहे. त्यात जगात सर्वाधिक वापरले जाणारे नैसर्गिक फायबर आहे.
Cotton Farm
Cotton FarmAgrowon

विलास चव्हाण, कु. सिंधू राठोड

Cotton Farming : कापूस हे जगातील सर्वात महत्त्वाचे तंतू पीक असून, शेतकऱ्यांसाठी नगदी पीक आहे. त्यात जगात सर्वाधिक वापरले जाणारे नैसर्गिक फायबर आहे. बागायती व कोरडवाहू अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांसह त्यांचे कुटुंबीय असे सुमारे २५० दशलक्ष लोक उपजीविकेसाठी कापूस व त्याच्या उपउत्पादनांवर अवलंबून आहेत.

कापूस लागवडीखालील क्षेत्रात (१२.७७ दशलक्ष हेक्टर) भारत जगात पहिल्या क्रमांकावर असून, २८.५० दशलक्ष गाठी उत्पादनासह जगातील सर्वात मोठा कापूस उत्पादक देशही ठरतो. उत्पादनामध्ये भारतानंतर चीन (२७.२५ दशलक्ष गाठी),

अमेरिका (२०.०२ दशलक्ष गाठी), ब्राझील (१२.०० दशलक्ष गाठी) आणि पाकिस्तान (८.०० दशलक्ष गाठी) असे क्रमांक येतात. भारतातील प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात आणि तेलंगणा ही राज्ये एकूण कापूस उत्पादनाच्या सुमारे ६०.३ टक्के लागवडीसह आघाडीवर आहेत. कमी अधिक प्रमाणात देशभरात सर्वत्र कापसाची लागवड केली जाते.

कापसाचे आर्थिक महत्त्व:

कपाशी वनस्पतीचे बहुतांश सर्व भाग उपयुक्त आहेत. कापसापासून कापड उद्योगात सुती कापड निर्मितीतील मूलभूत कच्चा माल (फायबर किंवा लिंट) उपलब्ध होतो. बियाण्यावरील लहान तंतुमय पदार्थ व सेल्युलोज हेप्लॅस्टिक, स्फोटके आणि अन्य उत्पादनामध्ये वापरले जाते. त्यापासून उच्च गुणवत्तेचे कागदही बनवले जातात.

पॅडिंग गाद्या, फर्निचर आणि ऑटोमोबाइल कुशनसाठी उपयुक्त ठरते. कपाशी बियाण्यामध्ये (सरकी) १५-२०% तेल, २०% प्रथिने आणि ३.५ टक्के स्टार्च असते. सरकीपासून मिळालेले तेल मानवी आहारासह विविध कारणांसाठी वापरले जाते. सरकी पेंडीमध्ये ४१ टक्के कच्चे प्रथिने आणि ७८ टक्के एकूण पचण्यायोग्य पोषक (टीडीएन) असतात. यात ०.१५ - ०.२५ टक्के कॅल्शिअम, ०.९५ - १.७१ टक्के फॉस्फरस, लायसीन १.७६ - २.१३ टक्के आणि थ्रेओनिन १.२४ - १.५८ टक्के सारखी आवश्यक अमिनो आम्ले असतात. त्यामुळे सरकीची पेंड पशुखाद्य म्हणून उपयोगी ठरते.

कापूस झाड वाळल्यानंतरही त्यात ६.६ टक्के नायट्रोजन, २-३ टक्के फॉस्फेट आणि १-२ टक्के पोटॅश असतात. त्यांचा भुगा करून जमिनीत गाडल्यास ही अन्नद्रव्ये मिळण्यासोबतच जमिनीचा पीएच कमी होतो. त्यातून नत्र हळूहळू उपलब्ध होते. या पऱ्हाटीचा मातीमध्ये समावेश केल्याने पुढील पिकाच्या उत्पादनात सरासरी १० टक्के वाढ झाल्याचे प्रयोगाचे निष्कर्ष आहेत.

Cotton Farm
Cotton Crop Management : कपाशीतील वाढ नियंत्रण, पाते-बोंड गळ व्यवस्थापन

कापसाचे अवशेषांचे (पऱ्हाटी) व्यवस्थापन

सामान्यतः शेतकरी कपाशीची वाळलेली झाडे व पऱ्हाटी जाळून टाकतात. त्यातून दरवर्षी सुमारे ६८३ मेट्रिक टन सेंद्रिय घटक जाळले जातात. कापसाची काढणी पूर्ण झाल्यानंतर पऱ्हाटी व अवशेषांच्या व्यवस्थापनासाठी मजुरांअभावी पुढील पर्यायांचा वापर वाढत आहे.

सामान्यतः पिकामध्ये जनावरे चरण्यासाठी सोडली जातात. ती उरलेली बोंडे, पाने खाऊन टाकतात. त्यामुळे गुलाबी बोंड अळीच्या (पेक्टिनोफोरा गोसिपिएला) सुप्तावस्था नष्ट होण्यास मदत होते.

पारंपरिक पद्धतीमध्ये कुऱ्हाड, लोखंडी चिमटे यांच्या साह्याने पऱ्हाटी कापून, तोडून किंवा उपटून उन्हामध्ये वाळविल्या जातात. त्यात चांगले कॅलरी मूल्य (३८२७ कॅलरी प्रति ग्रॅम) असल्याने घरगुती जळण म्हणून वापर केला जातो. इंधन म्हणून १५ टक्के वगळता कापसाचे अवशेष वापरले जातात.

वायू प्रदूषण उत्सर्जन तीव्रतेच्या (पीएम २.५) बाबतीत ऊस (१२), मका (११.२), तांदूळ (९.३) आणि गहू (८.५) नंतर कापूस तिसऱ्या स्थानावर (९.८) आहे. काही देशांमध्ये कापसाच्या पऱ्हाटीचे रूपांतर ब्रिकेटमध्ये देखील केले जाते.

रोटाव्हेटर किंवा यांत्रिक पऱ्हाटी श्रेडरमधून पऱ्हाटीचा भुगा करून जमिनीत गाडला जातो. वाळल्यानंतर जाळतात.

पऱ्हाटी जाळण्याची कारणे व निर्माण होणाऱ्या समस्या :

विद्यमान पीक, पीक काढणी आणि पुढील हंगामातील पिकांची पेरणी यामध्ये कमी कालावधीचा अंतर असल्यामुळे कापसाची पऱ्हाटीचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकऱ्यांना वेळ मिळत नाही. पुढील पिकाच्या पेरणीसाठी जमीन लवकर तयार करण्यासाठी पऱ्हाटी जाळणे शेतकऱ्यांना सोपे वाटते.

पऱ्हाटीमध्ये व्यापक प्रमाणात सेंद्रिय कर्ब, कार्बन : नत्र गुणोत्तर आणि उच्च लिग्नोसेल्युलोज असतात. त्यांच्या विघटनास ४-६ महिन्यांचा कालावधी लागतो. त्याच प्रमाणे विशेषत: पऱ्हाटी काढणे कष्टप्रद, वेळखाऊ आणि खर्चिक आहे. पऱ्हाटी काढणीसाठी साधारण रु. ४३७५ प्रति हेक्टर इतका खर्च येऊ शकतो.

पऱ्हाटी जाळल्यामुळे पर्यावरणातील प्रदूषण वाढते. या ज्वलनातून कार्बन डायऑक्साइड, नायट्रस ऑक्साइड, अमोनिया आणि अस्थिर सेंद्रिय संयुगे इ. हरितगृह वायूंचे उत्सर्जन होते. त्यामुळे तापमानामध्ये वाढ आणि हवामान बदलाच्या समस्या जाणवतात.

शेतातच पऱ्हाटी जाळल्यामुळे उष्णता निर्माण होऊन मातीतील उपयुक्त सूक्ष्मजीव, कीटकही मरतात.

पऱ्हाटी मध्ये सुमारे ६७.३-७० टक्के होलोसेल्युलोज, २४.३-२८.२ टक्के लिग्निन आणि ५.९-८.३ टक्के राख असते. ते ५१ टक्के कार्बन, ४.९ टक्के हायड्रोजन, ०.६२-१ टक्का नत्र, ०.६१-०.६८ टक्का पालाश, ०.०८-०.१ टक्का स्फुरद व अन्य सूक्ष्म अन्नद्रव्ये (०.४३ टक्का सीए, ०.१५ टक्का एस आणि ०.१२ टक्का मिलिग्रॅम, ३२४ पीपीएम एफई, १४७ पीपीएम एमएन, २७ पीपीएम झेन, ९ पीपीएम क्यू आणि १.६ पीपीएम एमओ) असतात. आपण ती जाळून वाया घालवतो.

Cotton Farm
Cotton Crop Management : कापूस पिकात पातेगळ वाढली

पर्यावरणपूरक पऱ्हाटी व्यवस्थापनासाठी उपलब्ध यंत्रे :

दोन रांगांतील पऱ्हाटी खेचण्याचे यंत्र
ट्रॅक्टरचलित अपरूटर
ट्रॅक्टरचलित स्लॅशर
ट्रॅक्टर ओढलेले व्ही-ब्लेड (V पास)
डिस्क नांगर/डिस्क हॅरो (पऱ्हाटी कापून शेतात पसरणे)
रोटाव्हेटर (पऱ्हाटी बारीक करून शेतात पसरविणे)

बहूपीक श्रेडर व त्याचे प्रात्यक्षिक :

ही ट्रॅक्टरचलित मशिन शेतात विविध पिकांच्या लाकडे व अन्य अवशेषांचे लहान तुकडे तुकडे करते. ड्युअल-क्लचसह कोणत्याही ४५ एचपी क्षमतेच्या ट्रॅक्टरद्वारे मशिन चालवता येते. ३ पॉइंट लिंकेजशी जोडून आणि ड्राइव्ह शाफ्टद्वारे ५४०/१००० आरपीएमसह चालविले जाऊ शकते.
शक्तिमान मल्टी क्रॉप श्रेडरमध्ये फीडिंग आणि श्रेडिंग प्रणाली असते.

प्रथम, फीडिंग सिस्टिममध्ये पऱ्हाटी कापण्यासाठी डिस्क कटरसह दोन फीडर ड्रम आणि दोन प्रेशर रोलर ड्रम आहेत. त्यात अवशेष ओढून पुढे ढकलण्यासाठी एक स्प्रिंग-लोडेड स्विंग प्रकारही उपलब्ध आहे. श्रेडिंग प्रणालीमध्ये सहा ब्लेड असलेले फ्लायव्हील असून, ते १६०० फेरे प्रति मिनीट या वेगाने फिरते.

फ्लायव्हीलच्या परिघावर बसवलेले पॅडल कापलेल्या पिकाला अतिरिक्त लिफ्ट देतात. तो भुगा शेतात समप्रमाणात पसरला जातो. हेवी-ड्यूटी फ्लायव्हील विशेषतः सील आणि वंगणांनी संरक्षित केलेले बेअरिंग ओलावा, घाण आणि कचरा बाहेर ठेवतात. ४ ते ५ लिटर डिझेलमध्ये १.५ ते २ तासात एक एकर कापसाचे क्षेत्र कापता येते.

बहूपीक श्रेडरचे फायदे

कमीत कमी इंधनामध्ये पऱ्हाटीचे लहान तुकडे, भुगा केला जातो. हेक्टरी २ टन पऱ्हाटीपासून जमिनीला १२.४ ते २० किलो नत्र, १.६ किलो स्फुरद, आणि १२.२ ते १३.६ किलो पालाश मिळू शकतो.

पऱ्हाटी जमिनीत गाडल्यानंतर जमिनीची सुपीकता आणि पाणी धारणक्षमता वाढते.

पऱ्हाटीचा भुगा केला जात असल्यामुळे त्यातील विविध किडींच्या सुप्तावस्थाही नष्ट होतात सध्या कपाशी पिकामध्ये गुलाबी बोंड अळीच्या तीव्र प्रादुर्भावामागे पिकांच्या अवशेषामध्ये अळीचा जीवनक्रम पूर्ण होणे ही मोठी समस्या दिसत आहे. तीही यामुळे कमी होते.

या पिकांच्या भुश्शांचा वापर नैसर्गिक आच्छादनाप्रमाणे विविध पिकामध्ये करता येतो. त्यामुळे मातीची धूप कमी करणे, मातीचे तापमान नियंत्रित करणे आणि विघटनानंतर मातीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढणे असे अनेक फायदे होताना दिसून येतात.

या पीक अवशेषांचा वापर जनावरांसाठी चारा म्हणून करता येतो.

लगदा व कागद, हार्ड बोर्ड, फलक व पेटी, सूक्ष्म स्फटिकीय सेल्युलोज आणि अळिंबीच्या उत्पादनासाठी विविध उद्योगामध्ये या पीक अवशेषांचा वापर करता येतो.

सेंद्रिय खत निर्मिती :

पऱ्हाटीच्या पारंपारिक कंपोस्टिंग प्रक्रियेस ३ ते ६ महिन्यांचा कालावधी लागतो. या प्रक्रियेत मायक्रोबियल कंसोर्टियम (Bio culture/EM Solution) वापर केल्यास कंपोस्टिंग जलद होण्यास मदत होते. त्यातून ओली पऱ्हाटी ४५ दिवसांत, तर कोरडी पऱ्हाटी ६० दिवसांत सेंद्रिय खतामध्ये रूपांतरित केली जाते. याच प्रक्रियेमध्ये गांडुळांचा वापर केल्यास गांडूळ खताची उपलब्धता होते. नत्र : स्फुरद : पालाशचे प्रमाण शेणखतामध्ये ०.५ : ०.२-०.४ : ०.३-०.५ असते, तर पऱ्हाटीच्या सेंद्रिय खतामध्ये तेच १.४३ : ०.७८ : ०.८२% इतके जास्त असल्याचे दिसून येते. त्याचा पुढील पिकाच्या वाढीवर चांगली परिणाम दिसून येतो.

पऱ्हाटीच्या पुनर्वापराचे फायदे

पऱ्हाटी जाळण्यामुळे माती व पर्यावरणावर फार विपरीत परिणाम होतात. ज्वलनातून निर्माण होणाऱ्या हरितगृह वायूंमुळे जागतिक तापमान वाढीच्या समस्येमध्ये भरच पडत आहे. अशा वेळी पऱ्हाटीपासून पशुखाद्य निर्मिती, कंपोस्टिंग, जैवइंधन (बायोचार तयार करणे आणि जैव-तेल) आणि आच्छादन करणे यासाठी वापर करावा. यामुळे मातीची सुपीकता वाढविण्यासोबतच पर्यावरणासाठीही मोठा फायदा होईल.

विलास चव्हाण, ९४२२३५६६६८
(वरिष्ठ अधिकारी, कॉटन कनेक्ट साउथ आशिया)

कु. सिंधू राठोड, ८६९८४८०८७७
(पी.एच.डी. विद्यार्थिनी, मृद्‍ व कृषी रसायन विज्ञान विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com