Indian Politics: गोंधळलेले सरकार अन विरोधकही...

Government Crisis: कायदा सुव्यवस्था राखणे, गुंडापासून सज्जनांचे रक्षण करणे, उद्योजक, शेतकरी, महिलांना सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करणे सरकारचे पहिले कर्तव्य असते. तेवढेच सोडून सरकार नको त्या उद्योगात नाक खुपसत बसले आहे. दुसऱ्या बाजूला विरोधकांकडे काही कार्यक्रम नाही, त्यामुळे तेही सत्ताधाऱ्यांच्या अजेंड्यावर व्यक्त होण्यापलीकडे जात नाहीत.
Politics
PoliticsAgrowon
Published on
Updated on

अनंत देशपांडे

Governance Failure: सध्याची देश आणि महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रातील अस्थिर परिस्थिती लक्षात घेतली तर एक प्रकारचा गदारोळ उडवला जातोय की काय, असे वाटू लागले आहे. काँग्रेसच्या लकवा सरकारला कंटाळून मतदारांनी मोठ्या अपेक्षेने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान केले. नितीन गडकरींचे काम सोडता मोदी सरकारला गेल्या दहा वर्षांत लक्षणीय असे काही करता आले नाही. आपल्या नाकर्तेपणाकडे मतदारांचे लक्ष जाऊ नये आणि तरीही सत्ता अबाधित ठेवता यावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मुद्दाम तर गोंधळ उडवून देत नाहीत ना? अशी शंका येऊ लागली आहे. विधान भवन किंवा लोकसभेसारख्या प्रतिष्ठित सभागृहात लोकप्रतिनिधी मारामाऱ्या करतात.

कार्यकर्त्यांचा स्तर गुंडाच्या पातळीपर्यंत घसरला आहे. नेते एकमेकांशी चर्चा करण्याचे सोडून शत्रूसारखे वागत आहेत. नेते भाषा, प्रांत, पक्ष, जाती, धर्म इत्यादी अप्रस्तुत प्रश्न तापवून तरुणांची माथी भडकवत आहेत. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या, लिहिणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जाईल, अशी भीती वाटते. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचा धाक दाखवून विरोधी पक्ष हतबल केले जात आहेत. विरोधकांकडे काही कार्यक्रम आणि अजेंडा नाही त्यामुळे तेही सत्ताधाऱ्यांच्या अजेंड्यावर व्यक्त होण्यापलीकडे जात नाहीत. शहर असो की गाव क्षुल्लक करणावरून खून पाडले जात आहेत. कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. वर्षानुवर्षे न्याय मिळू शकत नाही असे खुद्द सरन्यायाधीशच बोलू लागले आहेत.

Politics
Indian Politics: किसमें कितना है दम!

उद्योग उभे करण्याची क्षमता असलेले हजारो अतिश्रीमंत उद्योजक देश सोडून कायदा सुव्यवस्था सक्षम असलेल्या देशात उद्योग उभारत आहेत. तिथल्या तरुणांना रोजगार उपलब्ध होत आहेत. अतिश्रीमंत लोकांचा परदेशात जाणारा लोंढा थांबायला तयार नाही. जिथे स्वतःचे भांडवल असलेले उद्योजक देश सोडत आहेत, तेथे नवतरुणांनी काय विचार करावा ? बुद्धिमान आणि होतकरू तरुणाला विचारा, तो स्पष्ट म्हणतो जिथे राज्यकर्तेच अराजकाला पोसतात तिथे उद्योग कसे उभे राहणार ? उद्योग निर्माण होत नसतील तर रोजगार कसे निर्माण होतील ? त्यामुळे बुद्धिमान तरुण देश सोडून परदेशात स्थायिक होण्याला प्राधान्य देत आहेत. बेकार तरुणांना हाताशी धरून अराजक निर्माण केले जात आहे. देव, देऊळ आणि मशीद याशिवाय सुपारीबाज मीडियाला काही दिसत नाही.

देशात उद्योग, व्यवसाय उभे करण्यातील अडथळे संपुष्टात आले नाही. उद्योगावरील कायद्याचा जाच कमी झालेला नाही. सहज सुलभ वित्तपुरवठा उपलब्ध होत नाही. सुटसुटीत कर रचना निर्माण करणे जमलेले नाही. न्याय मिळण्यातील विलंब टाळता आलेला नाही. नोटबंदी सारख्या निर्णयापासून सरकारच्या लहरी कारभाराचा लोकांना अंदाज येत नाही. कामगार कायदे लवचीक करता आलेले नाहीत. सरकारी बाबूंची हप्तेखोरी थांबत नाही. साधी वाटणारी कामेसुद्धा कठीण होऊन बसली आहेत.

काँग्रेसला कंटाळून मतदारांनी भाजपाला सत्तेत बसवले. अकरा वर्षे कारभार केल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काँग्रेसच्याच नावाने खडे फोडत असतात. काँग्रेसला जमत नाही म्हणून तर मोठ्या अपेक्षेने तुम्हांला निवडून दिले. गेल्या दहा वर्षात तुम्ही काय केले ते सांगायची वेळ आलीय. सत्ताधारी संयमी असावा लागतो, पण मोदी मात्र वारंवार विरोधी पक्षांवर गुरगुरतात. नरसिंह राव हे काँग्रेस पक्षाचे पंतप्रधान असूनही त्यांनी जवाहरलाल नेहरू यांचे आर्थिक धोरण, ज्या धोरणामुळे देशाला १९९० मध्ये दिवाळखोरी अनुभवावी लागली, त्या समाजवादी अर्थकारणाचा त्याग केला. अगदी विपरीत दिशेला जाऊन ‘खाऊजा’चे धोरण स्वीकारण्याचे धाडस दाखवले. नरेंद्र मोदींनी नरसिंह राव यांचा खुलेकरणाचा अजेंडा टाकून दिला आणि नेहरूंचा ‘हिंदू ग्रोथ रेट’ अर्थकारणाचा समाजवादी अजेंडा स्वीकारला.

Politics
Indian Politics: ‘महाराष्ट्रा’साठी अद्याप ‘दिल्ली’ दूर !

सामान्यांची जावे कोठे ?

सरकारच्या दिवाळखोर अजेंड्यावर नाराज अतिश्रीमंत उद्योजक आणि बुद्धिवान कर्तबगार तरुण देश सोडतात ,कारण त्यांना तो पर्याय उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी त्यांची शेती सोडून जावे कोठे ? एकामागे एक येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीशी तोंड देण्याचे बाळकडू शेतकऱ्यांना लहानपणापासून मिळते. त्याने निसर्गाशी झगडून चांगले उत्पादन घेतले तर सरकार बाजारभाव पाडायला टपूनच बसले आहे. दहा वर्षानंतर शेतकऱ्यांनी सरकारला जाब विचारला पाहिजे. भाव पाडू सरकारा, सांग तुझे करायचे काय ? शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या सरकारचे अपयश आणखी रुंद करतात.

भारतीय संविधानात शेतकऱ्यांना व्यवसाय करण्याचा, व्यापार उदीम करण्याचा संपत्ती जमवण्याचा, तिची विल्हेवाट लावण्याचा मूलभूत अधिकार होता. संविधानाच्या नेहरूजींनी दिवसा ढवळ्या चिंधड्या उडवल्या, त्याबद्दल संविधान बचाववाले शब्द काढत नाहीत. नेहरूंनी तयार केलेला जमीन धारणा कायदा आणि आवश्यक वस्तूंचा कायद्याने शेतकऱ्यांचे दिवाळे काढले, त्यांना कर्जाच्या दरीत ढकलले. शेतकऱ्यांवरील काँग्रेसनिर्मित जीवघेणा सापळा नरेंद्र मोदी उखडून फेकतील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी तिसऱ्यांदा निवडून दिले. त्याऐवजी नरेंद्र मोदी शेतकरी लुटीचा सापळा आणखी मजबूत करत आहेत. लोकांचे प्रश्न सोडवण्याचे सोडून हिंदू- मुसलमान दुहीचे विष पेरले जात आहे. उद्या तुमच्या शेजारी बांगलादेशी मुसलमान आला तर काय कराल ? असा भ्रामक प्रश्न विचारला जात आहे. सातत्याने भीतिदायक अजेंडा चालवला जातो आहे. उपाशी मरा, आत्महत्या करा पण हिंदू जनतेने एकत्र यावे आणि आम्हांला मतदान करावे, असा प्रचार केला जातो.

खरं म्हणजे धैर्यवान असणे, क्षमाशीलता बाळगणे, मनावर नियंत्रण ठेवणे, चोरी न करणे, अंतर्बाह्य शुद्ध असणे, इंद्रियावर नियंत्रण ठेवणे, बुद्धीची पूजा करणे, ज्ञानार्जनात आयुष्य वेचणे, असत्याचा त्याग करून सत्याची कास धरणे आणि राग न करता प्रेमाने वागणे अशा दहा लक्षणांनी युक्त माणूस किंवा समाज धार्मिक समजला गेला आहे. गांधीजींच्या धर्माची संकल्पना हीच आहे. या अर्थाने गांधीजी खरे धार्मिक होते. या व्याख्येत कोणा देवाधर्माचे नाव नाही. जो माणूस आणि समाज वरील दहा गुणांना आपल्या जीवनाचा आधार मानत असेल तो माणूस आणि समाज धार्मिक समजला गेला आहे. धर्माचे दहा आधार सोडून केवळ देवधर्माचे नाव घेऊन आणि मंदिर, मशीद, चर्च इत्यादी श्रद्धेच्या आड दडून माणसात आणि समाजात द्वेष निर्माण करणे म्हणजे हिंदुत्व नाही. तरुणांनी आपली माथी भडकवून न घेता आपल्या बापाच्या पायातील बेड्या तोडण्यासाठी संघर्ष केला पाहिजे.

९४०३५४१८४१

(लेखक शेतीप्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com