Climate Change : हवामान बदलाची अशीही शिक्षा

Reality of Climate Change : कलीमुल्लाह म्हणतात, ‘‘मी हे सर्व आम्र वैभव गेली ७५ वर्षे संभाळले आहे, माझ्या मुलांनी सुद्धा मला यात भरपूर मदत केली आहे, आजही करत आहेत; पण त्यांच्या मुलांना यात फारसा रस उरलेला नाही. यास मुख्य कारण आहे ते म्हणजे हवामान बदलाचा वाढता प्रभाव!
Climate Change
Climate ChangeAgrowon

Impact of Climate Change : ‘अॅग्रोवन’ हे कृषी दैनिक हातात पडताच माझी पहिली नजर जाते ते त्यात प्रसिद्ध झालेल्या शेतकऱ्यांच्या यशोगाथांवर. गेल्या काही वर्षांपासून या दैनिकाने ही परंपरा जोपासली आहे हे विशेष! अनेक यशोगाथांमध्ये माळरान, खडकाळ रानामध्ये पाणी जिरवून, साठवून फळबाग उभारल्याची यशस्वी उदाहरणे आहेत, तसेच पारंपरिक ज्ञानाबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानास महत्त्व दिलेले आढळते. अशा विविध कृषी निगडित यशोगाथा ॲग्रोवनमध्ये सातत्याने प्रसिद्ध होत असतात.

उत्तर प्रदेशमधील लखनौपासून ३४ कि.मी. दूर मलिहाबाद येथील पद्मश्री कलीमुल्लाह खान यांची आंब्याची ‘अब्दुला नर्सरी’ आणि त्यातही एक आंब्याचे झाड ज्यावर कलीमुल्लाह यांनी ३५० पेक्षा अधिक कलमे केली आहेत.

थोडक्यात, जेमतेम सातवी शिकलेल्या ८४ वर्षे वयाच्या काळ्या मातीमधील या खऱ्या कृषी शास्त्रज्ञाने त्याच्या बागेमधील पाच पिढ्या पाहिलेल्या एका आंब्याच्या झाडावर ३५० च्या वर विविध प्रकारचे आंबे घेण्याचा विक्रम केला आहे. प्रत्येक कलमास देश विदेशामधील महान हस्तींची नावे देण्यात आली आहेत.

तुम्हास येथे प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर, माजी राष्ट्रपती ए. पी. जे अब्दुल कलाम, सुपरस्टार अमिताभ बच्चन एवढेच काय पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा आंब्याच्या नावाच्या रूपात भेटतील. आपण निर्माण केलेल्या आपल्याच आम्रवृक्षाच्या या जिवंत प्रयोगशाळेत अनेक दशके मधुर रसाळ फळांच्या शेकडो यशोगाथा रचणाऱ्या कलीमुल्लाह यांना या पूर्वी देखील मी अॅग्रोवनमध्ये शब्दबद्ध केलेले आहे. मात्र मागील दोन-तीन वर्षांपासून त्यांच्या अब्दुला नर्सरीमध्ये हवामान बदलाच्या प्रभावामुळे होत असलेल्या नकारात्मक बदलामुळे आज ते दुःखी आहेत.

ते म्हणतात, ‘‘गेली ७० वर्षे मी फक्त आम्रवृक्ष सेवा करीत आहे, तेही पर्यावरणास कसलीही हानी न पोहोचविता, सेंद्रिय पद्धतीनेच मग मला हवामान बदलाची ही अशी शिक्षा का? कलीमुल्लाह म्हणतात, ‘‘माझ्या मलिहाबादमध्ये आज मीच एकटाच काय तर कुणाचीच आंब्याची फळांनी लगडलेली बाग नसून आज येथे फक्त आम्र वृक्षांचे जंगल तयार झाले आहे.’’ ते पुढे म्हणतात, ‘‘या फळबागेचे रूपांतर जंगलामध्ये होण्यास तीन मुख्य कारणे आहेत - ती म्हणजे बदलते हवामान, घटणारे भूजल आणि वाढती उष्णता!

Climate Change
Climate Change : हवामान बदलात तगणारी पीकवाण, तंत्रज्ञान, यंत्रे हवीत

पूर्वी मलिहाबाद भागात एवढी आंब्याची झाडे होती, ज्याची मोजमाप करणे सुद्धा कठीण होते. येथील लोक सांगतात, ‘‘प्रत्येक झाडावर पानापेक्षाही फळांची संख्याच जास्त असे म्हणून येथील शेतकरी अर्धाच आंबा उतरवत आणि उरलेली फळे झाडावर तशीच राहत असत. आज मात्र फळे कमी आणि पाने जास्त दिसत आहेत.’’ कलीमुल्लाह पुढे म्हणतात, ‘‘आमच्या येथील आंबा झाडांनी रासायनिक फवारणी काय असते हे माहीत नव्हते, मात्र आज सगळीकडेच विषारी कीडनाशकांच्या फवारण्या सुरू आहेत.

त्यामुळे मोहर गळून जातो, लहान आंबे खाली पडतात. झाडाची प्रतिकार शक्ती कमी होत आहे, फांद्यांवर, पानांवर, मोहरावर विषारी फवारणी झेलण्यापेक्षा नकोच ते आंबे असे म्हणून झाडेही उत्पादन कमी देत आहेत.’’ कलीमुल्लाह म्हणतात, ‘‘आम्र वृक्षाची बाग वैज्ञानिक पद्धतीने दोन झाडांत सन्माननीय अंतर ठेवूनच करावयास हवी तरच ती खरी बाग.

आज येथील आंबा उत्पादक दोन आंब्यामधील अंतर खूपच कमी करून झाडांमध्येच मूलद्रव्यांसाठी भांडण लावत आहेत. त्यामुळे फळ उत्पादन घसरले असून फळांचा आकार सुद्धा लहान झाला आहे. थोडक्यात बागेचे रूपांतर जंगलामध्ये करण्यात येत आहे. झाड डेरेदार पानांनी भरलेले आढळते मात्र फळे कमी ती सुद्धा पानांमागे लपलेली दिसतात.

आंब्याच्या झाडावरील लहान कीटक हे मित्राचे काम करतात, हे मी कित्येक वर्षापासून पाहत आहे. पण आज आम्ही त्यांना शत्रू समजून फवारण्या करून मारत आहोत. ते पुढे म्हणतात, ‘‘पुर्वी आमच्या भागात नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये खूप थंडी पडत असे. आता ती जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत पुढे जात आहे. थंडी पडल्यावर आंब्यास मोहोर येतो आणि ती कमी झाल्यावर लगेच फळ धारणेस सुरुवात होते.

कारण रसदार आंबा हा उन्हाळ्यातील मधुर फळ आहे. संपूर्ण जगावरच पाणी संकट आहे मग भारत त्यात मलिहाबाद अपवाद कसा असेल? पूर्वी या गावात पाण्याने भरलेल्या अनेक विहिरी होत्या आणि पाणी जेमतेम २५ फुटावरच होते.

आज ते ८० ते १०० फूट खोल गेले आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे पानांचा आकार लहान होतो. पूर्वी पाने सुद्धा रसदार असत आज ती शुष्क वाटतात. पूर्वीच्या तुलनेत आज प्रत्येक झाडास एक चौथाई हिस्साच पाणी मिळते म्हणूनच आंब्याच्या रसदारपणावर सुद्धा परिणाम झाला आहे.

Climate Change
Climate Change Policy : हवामान बदल धोरण अजेंड्यावर कधी येणार?

कलीमुल्लाह म्हणतात, ‘‘मी हे सर्व आम्र वैभव गेली ७५ वर्षे संभाळले आहे, माझ्या मुलांनी सुद्धा मला यात भरपूर मदत केली आहे, आजही करत आहेत पण त्यांच्या मुलांना यात फारसा रस उरलेला नाही. यास मुख्य कारण आहे ते म्हणजे हवामान बदलाचा वाढता प्रभाव! ते पुढे म्हणतात, ‘‘हवामान बदलात कमी झालेली थंडी आणि वाढते उष्णतामान या मानवनिर्मित नैसर्गिक संकटास आज मी माझ्या मुलांसह सामोरे जात आहे कारण मला माझी ही बाग टिकवून ठेवावयाची आहे.

जमिनीत ओलावा टिकून राहावा म्हणून मी सतत मल्चिंग करत असतो. फळांना उन्हाचा तडाखा बसू नये म्हणून त्यावर सावली तयार करतो कारण प्रत्येक आम्रवृक्ष माझ्या कुटुंबाचा एक सदस्य आहे. मात्र येणाऱ्‍या तरुण पिढीला, नातवांना हे पटत नाही.’’

किती सत्य बोलत होते कलीमुल्लाह. आज हा आंबा उत्पादक शेतकरी एकटाच नसून अनेक शेतकरी हवामान बदल, वादळी पाऊस, गारपीट यामुळे उध्वस्त होत आहेत. वाडवडिलांचे हे हाल तरुण पिढी पाहू शकत नाही कारण हवामान बदलाचे शिक्षण त्यांना देण्यास आम्हीच काय शासन, कृषी विद्यापीठे सुद्धा कुठे तरी कमी पडत आहेत.

हवामान बदलाचे चटके आपण सहज झेलू शकतो पण ते झेलण्याची, पचविण्याची जी ताकद आपणांमध्ये आहे ती तशीच आपल्या तरुण पिढीमध्ये येणे गरजेचे आहे. जोपर्यंत हवामान बदलाचा प्रभाव या नवीन पिढीस समजणार नाही, त्यांच्या वेदना कळणार नाहीत, तोपर्यंत घरामधील वृद्धांनी झेललेले संकट, दुःख त्यांना कसे कळणार? शेत, जमिनी, फळबागा तुमचे तुम्ही निस्तरा, आम्ही नोकरीच्या मागे लागतो असे म्हणून कसे चालेल? तरुणांनीच

हवामान बदल, त्यातील चढ-उतार याकडे सकारात्मक विचारशैलीने पाहून उपाय शोधावयास हवेत.

(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com