Climate Change Policy : हवामान बदल धोरण अजेंड्यावर कधी येणार?

Climate Change Issue : वातावरण बदलाच्या सातत्याने वाढत्या संकटाचा आपल्या जीवन, जीविका, अन्नसुरक्षा आणि आर्थिक उत्पादकतेवरचा परिणाम रोखायचा असेल तर सरकारने हवामान बदल धोरणाला मुख्य अजेंडावर आणणे आवश्यक आहे. नाहीतर सूर्य देवाच्या ह्या कोपात आपला विनाश अटळ आहे.
Climate Change
Climate Change Agrowon

गिरीश पाटील

The Climate Change Crisis : आपला देश उष्णतेच्या तीव्र लाटांचा सामना करीत आहे. दर वर्षाचे रेकॉर्ड तोडत, यावर्षी देशातील अनेक भागांमध्ये तापमान ५० अंश सेल्सिअसपर्यंत देखील पोहोचले आहे. या अति उष्णतेचा मानवी आरोग्यावर, वीज आणि पाण्याच्या पुरवठ्यावर आणि महत्त्वाचं म्हणजे कृषी उत्पादकतेवर, विनाशकारी परिणाम होत आहे. या लाटेने सगळ्यात जास्त प्रभावित गट आहे शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा, कारण शेतीमधली पिके ही अनुकूल हवामानावर अवलंबून असतात आणि मजुरांना तळपत्या उन्हामध्ये धोकादायक परिस्थितीत काम करावे लागत आहे.

गेले दोन महिने देशात निवडणुकीचे वारे आहे. बेरोजगारी, महागाई अशा अनेक प्रश्नांची चर्चा जरी या निवडणुकीत होत असली तरी या सगळ्याच्या परिणामांमध्ये वाढ करत असलेला घटक म्हणजे वातावरण बदल. गेल्या दशकभरामध्ये तीव्र दुष्काळ, उष्णतेच्या लाटा आणि मुसळधार पाऊस, संपूर्ण देश अनुभवतो आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार, सरासरी वार्षिक उष्णतेचे दिवस गेल्या सहा दशकात जवळपास तिप्पट झाले आहेत. उष्णतेच्या लाटांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या मते याचे मुख्य कारण हा निसर्गातील मानवी हस्तक्षेपामुळे होत असलेले हरितगृह वायू उत्सर्जन (ग्रीन हाऊस गॅस इमिशन) आहे. यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचे संकट अधिक गडद होत आहे.

Climate Change
Climate Change : वातावरण बदलामुळे अन्नसुरक्षेवर प्रश्‍नचिन्ह

भारत हवामानाच्या दृष्टीने संवेदनशील देश आहे. सरकारी अभ्यासानुसार, विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून देशातील सरासरी तापमान ०.७ अंश सेल्सिअस ने वाढले आहे. तापमानातले थोडेसे बदल देखील उष्णतेच्या लाटा, दुष्काळ, पूर आणि हिम नद्या वितळण्यासारख्या घटनांमध्ये कारणीभूत ठरत आहे. देशाच्या विशाल भूभागावर आज त्याचे परिणाम दिसून येत आहेत. गेल्या वर्षी, सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे अचानक मुसळधार पाऊस झाला, पुढे हिमनदीचा तलाव फुटला आणि जवळपासच्या प्रदेशांना पूर आला. कितीतरी लोकांचा मृत्यू झाला. या सगळ्यामागे वातावरण बदलाचे संकट कारणीभूत आहे.

भारतातील उष्णकटिबंधीय हवामान असलेल्या प्रदेशांमध्ये, तापमान वाढलेले असल्याने हवेत आर्द्रता टिकून राहते. त्यामुळे पाऊस कमी होतो. शिवाय जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा तो जवळपास महिन्यात किंवा एका आठवड्यात पडणारा पाऊस काही तासात कोसळतो, या तीव्र स्वरूपात व अनियमित होणाऱ्या पावसामुळे, पुराची तीव्रता वाढली आहे. या हवामान बदलाच्या संकटाचा सगळ्यात जास्त परिणाम शेतकऱ्यांवर होतोय. देशाचे पोट भरणारे हात त्यांचेच असल्याने, आपण हे लक्षात घेतले पाहिजे की हवामान बदलाचा परिणाम हा फक्त शेतकऱ्यांवरच नाही तर शेतीवर आधारित सबंध व्यवस्थेवर होणार आहे.

शेती हा भारताचा कणा आहे. २०२१ मध्ये इतर क्षेत्रांच्या बरोबरीने शेतीने तब्बल ४३ टक्के कामगारांना रोजगार दिला आहे. राष्ट्रीय जीडीपीमध्ये तब्बल १९ टक्के योगदान दिले आहे. २५० दशलक्षांहून अधिक शेतकरी व मजूर हे शेतीतून त्यांची उपजीविका कमावतात. सरकारी अंदाजानुसार फक्त २०२२ या वर्षात उष्णतेच्या लाटांमुळे संपूर्ण भारतात साडेतीन अब्ज डॉलरहून अधिक किमतीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. १.५ अब्ज लोकसंख्या असलेले या देशांमध्ये अन्नसुरक्षेच्या दृष्टीने शेतीकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. कारण २०२३ च्या ग्लोबल हंगर इंडेक्सनुसार १२५ पैकी आपण १११ व्या क्रमांकावर आहोत. देशात एक मोठा वर्ग आहे जो अजूनही सरकारी मोफत धान्यावर अवलंबून आहे.

प्रत्येक पिकाची उष्णता सहन करण्याची विशिष्ट क्षमता असते. मात्र, सातत्याने वाढत असलेल्या तापमानामुळे अनेक ठिकाणी लागवड केलेल्या पिकांचे लक्षणीयरीत्या नुकसान होत आहे. फुलांच्या व धान्य भरण्याच्या अवस्थेत उष्णतेचा ताण हा हानिकारक ठरत आहे. २०२२ सालच्या उष्णतेच्या लाटांमुळे वायव्य भारतातील गव्हाच्या उत्पादनात अंदाजे दहा ते पंधरा टक्क्यांची घट झाली होती. पश्चिम बंगाल सारख्या तांदळाचे प्रचंड उत्पादन करणाऱ्या राज्यांमध्ये सुद्धा उष्णतेच्या लाटेमुळे उत्पादनामध्ये दहा टक्क्यांनी घट होऊ शकते,

Climate Change
Climate Changes : बदलत्या हवामानात लागवड तंत्रही बदला

असा अभ्यास नुकताच समोर आला आहे. तापमानाच्या अतिरेकाचा फुलांच्या फळधारणेमध्ये तसेच भाजीपाल्याच्या परिपक्वतेमध्ये व्यत्यय येतो, ज्यामुळे टोमॅटो, बटाटे किंवा अगदी आंब्यासारख्या फळांची उत्पादकता देखील कमी झाली आहे. शेतीसाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो जमिनीचा ओलावा मात्र वाढत्या उष्णतेने दुष्काळाची तीव्रता वाढते आहे. मातीतला ओलावा लवकर संपत असल्यामुळे, पिकांची पाण्याची मागणी वाढत आहे. ही वाढती मागणी पुरवण्यासाठी उपलब्ध असलेल्या जलसंसाधनांवर ताण वाढतो आहे. सातत्याने खालावत असलेली भूजल पातळी हा आणखी कळीचा मुद्दा आहे

शेतकऱ्याचे पशुधन देखील उष्णतेमुळे अडचणीत आले आहे. या अति उष्णतेचा गाई, म्हशी, शेळ्या, कोंबड्यांमध्ये, त्यांचे प्रजनन दर कमी होणे, जन्माचे वजन कमी होणे, मांस किंवा दुधाचे उत्पादन कमी होणे तसेच मृत्यूदर वाढणे, अशा परिणामांचा सामना पशुपालक शेतकऱ्यांना करावा लागत आहे. केवळ शेतीच नव्हे तर उष्णतेच्या लाटांमध्ये काम करणारे शेतमजूर बांधकाम कामगार रस्त्यावरील विक्रेते यासह बाहेरच्या कामात गुंतलेल्या मजुरांवर देखील हे मोठे संकट आहे.

उच्च तापमान दीर्घकाळ राहिल्याने उष्णतेच्या संबंधित आजार, उत्पादकता कमी होणे आणि काम करण्याच्या वेळेमध्ये कमी होण्याचे प्रमाण वाढत आहे. दीर्घकाळ सूर्यप्रकाशात काढण्यासाठी कामगारांना अधिक ब्रेक घेणे किंवा शिफ्ट कमी करणे भाग पडत आहे. एका अभ्यासानुसार उष्णतेच्या लाटांमुळे २०३० पर्यंत भारतामध्ये कृषी कामगारांचे ९.४ टक्के, उद्योग कामगारांचे ५.२९ टक्के, बांधकाम कामगारांचा ९.४ टक्के, तसेच इतर सेवा कामगारांचे १.४८ टक्के कामाचे तास कमी होतील, असा अंदाज आहे.

वातावरण बदलाच्या संकटाला तोंड द्यायचे असेल तर धोरणांच्या स्तरावर मूलभूत पावले उचलणे गरजेचे आहे. काही मोजक्या शहरांमध्ये हिट ॲक्शन प्लॅन बनवले गेले असून त्याची चांगली अंमलबजावणी देखील होत आहे. मात्र राष्ट्रीय स्तरावर हिट ॲक्शन प्लॅन, अर्ली वॉर्मिंग सिस्टीम तसेच स्थानिक पातळीवर आवश्यक पायाभूत सुविधांची निर्मिती करणे गरजेचे आहे.

बदलत्या वातावरणात तग धरतील अशा पिकांच्या जाती विकसित करणे, सिंचनातील कार्यक्षमता सुधारणे, कृषी वनीकरणाचा अवलंब करणे तसेच शेतकऱ्यांना जोखीम विमा प्रदान करण्याबाबत तातडीने पावले उचलले गरजेचे आहे. वातावरण बदलाच्या या सातत्याने वाढत्या संकटाचा आपल्या जीवन, जीविका, अन्नसुरक्षा आणि आर्थिक उत्पादकतेवरचा परिणाम रोखायचा असेल तर सरकारने हवामान बदल धोरणाला मुख्य अजेंडावर आणणे आवश्यक आहे. नाहीतर सूर्य देवाच्या ह्या कोपात आपला विनाश अटळ आहे.

(लेखक जल बिरादरीचे राष्ट्रीय युवा संयोजक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com