Climate Change : हवामान बदलात तगणारी पीकवाण, तंत्रज्ञान, यंत्रे हवीत

Joint Agrisco 2024 : ‘जॉइंट ॲग्रेस्को’निमित्त कृषी विद्यापीठांकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा
Climate Change
Climate ChangeAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
PDKV, Akola : अकोला ः हवामान बदलाच्या काळात शेतकरी सर्वार्थाने सक्षम होणे गरजेचे आहे. त्याला प्रामुख्याने शेतीसाठी अशा परिस्थितीत टिकाव धरणारे पीकवाण, तंत्रज्ञान हवे आहे. उद्या (ता. ७)पासून अकोल्यात ‘जॉइंट ॲग्रोस्को’ सुरू होत आहे. त्या निमित्त चारही कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञ एकत्रित बसून विविध पीकवाण, संशोधन, तंत्रज्ञान व इतर तपशिलांवर चर्चा करणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर हवामान बदलात तगणारे पीकवाण, तंत्रज्ञान, यंत्रे हवीत आदी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

गेल्या काही वर्षांत खरीप हंगामाचे चित्र बघितले तर पाऊस उशिरा येत असल्याने पेरण्या लांबणे, दुबार-तिबार पेरणी करावी लागणे, पावसात मोठा खंड पडणे, काही तासांतच ढगफुटीसदृश पाऊस पडणे, पिकांवर कीड-रोगांचे हल्ले, अशा विविध घटना घडत आहेत. शेतकऱ्यांना तापमान वाढीसह अनियमित आणि कमी कालावधीत होणारा पाऊस हे प्रश्‍न भेडसावत आहेत. या वर्षी सर्वसामान्य तापमानवाढीसह जमिनीचेही तापमान वाढल्याचे दिसून आले. या तापमान वाढीचे दुष्परिणाम हे नवे संकट उभे ठाकते आहे. खरीप हंगामात उशिरा येणारा पाऊस संपूर्ण हंगामाच्या उत्पादकतेवर परिणाम करतो आहे. मूग-उडीद या कडधान्यवर्गीय पिकांची लागवड दरवर्षी कमी होत चालली आहे. पिकांच्या उत्पादकतेत घट होत आहे. बदललेल्या पीक पद्धतींमुळे जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण होतो. गारपीट आणि अवेळी पावसामुळे उभ्या पिकांचे नुकसान होत आहे. हा अनुभव गेले वर्षभर शेतकरी घेत आहेत. यंदा संपूर्ण हिवाळा तसेच उन्हाळ्याच्या महिन्यांमध्येही पावसाने नुकसान केल्याचे प्रकार घडले. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी ‘जॉइंट ॲग्रोस्को’तून ठोस काहीतरी बाहेर यावे, अशी आशा व्यक्त होत आहे.

Climate Change
Bamboo Production : हवामान बदलात बांबू उत्पादनाचे महत्त्व वाढले

वातावरण बदलाचा फटका शेती आणि शेतकऱ्यांना बसतो आहे. अशा परिस्थितीत तग धरणारे शेती पिकांच्या वाणांवर संशोधन होणे गरजेचे आहे. या वर्षीचा वातावरणाचा फटका बसलेले पीक म्हणजे तूर हे उदाहरण ताजे आहे. असे प्रकार वारंवार घडत आहेत.
- डॉ. प्रफुल्ल लहाने, प्रयोगशील शेतकरी, गुंजखेड, जि. बुलडाणा

हवामान बदलाच्या काळात राज्यातील कृषी विद्यापीठात संशोधन व तंत्रज्ञानविषयक एक वेगळा विभाग निर्माण करावा. विविध अनुभव घेतलेल्या शेतकऱ्यांना सहभागी करून चर्चा घडवून आणावी. फक्त कागदावरच काम न करता वास्तवात ते यायला हवे, यादृष्टीने जोर द्यावा. यामध्ये कामाची जबाबदारी निश्‍चित करावी. पीकवाण, तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जावे.
- वसंत पाटील, शेतकरी, वडी, ता. नांदुरा, जि. बुलडाणा

गेली काही वर्षे हवामानाच्या पॅटर्नमध्ये बदल झाला आहे. या वर्षी तर तापमानाने उच्चांक गाठला आहे. त्याचे परिणाम शेतीवर पडत आहेत. या संकटातून दिलासा मिळण्यासाठी कृषी विद्यापीठातून नवीन संशोधन हेच आता वाचवू शकेल. त्यादृष्टीने शेतकऱ्यांना अवर्षण, अतिवृष्टी, अतिथंड हवामान सहनशील वाणाचे संशोधन, तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी संशोधन व्हावे.
- गजानन ढवळे, हळद, उत्पादक, शिरपूर जैन, जि. वाशीम

हवामान बदलात प्रतिकारक हवामान अनुकूल शेती करण्यासाठी तंत्रज्ञान आवश्‍यक आहे. विद्यापीठांमध्ये देशभर यादृष्टीने काम सुरू आहे. परंतु एकच तंत्रज्ञान अशा परिस्थितीत कामाला येणार नाही, याचा विचार करावा लागेल. संशोधनानंतर येणाऱ्या अनुभवातून पुढे जावे लागेल. हवामान बदलाचा वेग अधिक आहे. कधी तापमान वाढीचा मुद्दा उभा राहतो, कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळाला सामोरे जावे लागते. विविध प्रकारचे किडरोगही शेतीपिकांवर येत आहेत. अशा स्थितीत वाण, तंत्रज्ञान, यंत्रे द्यावे लागतील.
- डॉ. व्यंकट मायंदे, माजी कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com