
Dairy Farming Crisis: हवामान बदलामुळं पशू चाऱ्याच्या खर्चात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे लहान दूध उत्पादक शेतकऱ्यांचं उत्पन्न १५-२५ टक्क्यांपर्यंत घटू शकतं, असा इशारा पंजाब कृषी विद्यापीठाच्या संशोधन अहवालात देण्यात आला आहे. त्यामुळे हवामान बदलाचं संकट अधिक गंभीर होऊ लागल्याचं दिसत आहे.
हवामान बदलामुळे दुग्धव्यवसायाला झळ बसू लागली आहे. चारा पिकांची टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे पशुखाद्याच्या टंचाई चिंता वाढवणारी ठरत आहे. परिणामी दूध उत्पादकता धोक्यात येईल, असं या अहवालात सांगण्यात आलं आहे.
या संशोधन अहवालानुसार, कोरडवाहू शेतीचं क्षेत्र अधिक असलेल्या महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात राज्यात चाऱ्यांची उपलब्धता डोकेदुखी ठरू शकते. कारण मॉन्सूनचा पॅटर्न बदलत आहे. त्याचा परिणाम चाराऊ जमिनीच्या क्षेत्रावर होऊ लागला आहे. तसेच वाढत्या तापमानामुळे चाऱ्याची गुणवता कमी होऊ लागली आहे. त्याचा परिणाम दुभत्या जनावरांच्या आरोग्यावर होत असल्याचा धोका वर्तवण्यात आला आहे.
चारा टंचाईमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना महागड्या पशुखाद्यावर अवलंबून राहावं लागू शकतं. दुधाला मात्र किफायतशीर दर मिळत नाही, त्यामुळे छोटे दूध उत्पादक शेतकरी या व्यवसायातून बाहेर पडत असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
ग्रामीण भागात शेतीला पूरक म्हणून दुग्धव्यवसाय केला जातो. त्यातून ग्रामीण भागातील नागरिकांचं पोषणही होतं. परंतु दूध व्यवसायात उत्पन्नाची हमी मिळत नसल्याने या व्यवसायाकडे शेतकरी पाठ फिरवत आहेत. पुढील काळात त्यातून अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा गंभीर इशाराही संशोधन अहवालात दिला आहे.
तापमान वाढीचा दुभत्या जनावरांवर परिणाम होतो. जनावरांना उष्णतेचा ताण सहन करता येत नाही. त्यामुळे तापमान ३० सेल्सियसपेक्षा अधिक होतं, त्यावेळी दुभत्या गाय आणि म्हशींच्या शरीराचं तापमान देखील वाढतं. त्यामुळे जनावरांच्या आहारात घट होते. परिणामी जनावरांची दूध उत्पादकता आणि पुनरुत्पादन क्षमता कमी होते. त्यामुळे महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानसारख्या राज्यात अति उष्णतेमुळे दूध उत्पादनात १० ते ३० टक्क्यांपर्यंत घटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
वाढत्या उष्णतेचा परिणाम
देशात वाढत्या उष्णतेमुळे चाराऊ जागा कमी झाल्या आहेत. दुसरीकडे पशुखाद्यासाठी लागणाऱ्या मालाच्या किंमतीत वाढ झाली आहे. परिणामी पशूखाद्य किंमतीत वाढल्या आहेत. त्यातून दूध उत्पादकांचा खर्च वाढून नफा कमी झाल्याचं निरीक्षण या संशोधन अहवालात नोंदवण्यात आलं आहे.
जनावरांच्या आरोग्याला धोका
हवामान बदलाचा फटका शेती क्षेत्राला सर्वाधिक बसत आहे. त्यामुळे शेती संलग्न व्यवसायावर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. तापमान वाढीमुळे जनावरांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. जनावरांची पचनसंस्था कमकवुत होते. त्यामुळे स्तनदाह, श्वसन संक्रमण, खूरकुज आदि रोगाचा प्रादुर्भाव बळवतो, असंही या संशोधन अहवालात दावा करण्यात आला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.