
डॉ. विशाल गमे
नुकताच (२३ मार्च) ७५ वा जागतिक हवामान दिन साजरा करण्यात आला. या वर्षी जागतिक हवामान संघटनेने ‘क्लोजिंग अर्ली वॉर्निंग गॅप टुगेदर’ हे घोषवाक्य ठरवले होते. हवामानातील तीव्र स्थिती किंवा संभाव्य आपत्तींसंबंधी लवकरात लवकर इशारा देण्यामधील अडचणी दूर करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.
हवामानातील बदल आणि तापमानातील होणारी वाढ हा सध्या जागतिक पातळीवरील चर्चेचा विषय आहे. वातावरणातील बदलांमुळे अवेळी पाऊस, गारपीट, कडाक्याची थंडी, अति उष्णतेची लाट, अचानक येणारे जोराचे पाऊस, त्यामुळे उद्भवणारे ओले दुष्काळ किंवा पावसाअभावी पडणारे कोरडे दुष्काळ या सर्व बाबींची पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.
अशा कोणत्याही आपत्तीचा योग्य काळ आधी व लवकर इशारा मिळाल्यास मानवी जीवितहानी व वित्तहानी टाळणे शक्य होऊ शकते. त्याच प्रमाणे शेतीमधील नुकसान कमी करणे शक्य होणार आहे. त्यातूनच हवामानातील विविध घटकांचा पिकांवरील अनिष्ट परिणाम कमी करता येईल आणि शेती शाश्वततेकडे नेणे शक्य होईल. आजच्या आपल्या लेखामध्ये हवामानातील विविध घटकांचा (उदा. पाऊस, तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश, वाऱ्याचा वेग, बाष्पीभवन) पिकावर नेमका कसा परिणाम होतो, याची माहिती घेऊ.
पाऊस
हवामानातील विविध घटकांपैकी पाऊस हा पीक वाढीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कोरडवाहू शेतीमध्ये तर संपूर्ण पीक उत्पादन हे पावसांवर अवलंबून असते. बागायती शेतीही पावसाच्या जमिनीमध्ये भूजलाच्या स्वरूपात साठलेल्या किंवा वाहत्या पाण्याच्या प्रमाणावर अवलंबून असते. त्यामुळे कमी व अनियमित पडणाऱ्या पावसाचे विपरीत परिणाम शेतीच्या उत्पादनावर झाल्याशिवाय राहत नाहीत.
पावसाळ्यात होणारा पाऊस शक्य तितक्या पद्धतीने जमिनीत साठविण्याचा प्रयत्न करावा. पीक पद्धती ही पावसाच्या प्रमाणानुसार ठरवलेली असावी. त्यामुळे पावसाने होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण कमी राहण्यास मदत होते. ज्या ठिकाणी खूप कमी पाऊस व अनियमित पाऊस पडतो त्या ठिकाणी कमी पावसावर येणारी पिके घ्यावीत.
उदा. खरीप हंगामात बाजरी, सूर्यफूल, मटकी, मूग, उडीद व रब्बी हंगामात रब्बी ज्वारी, हरभरा, करडई अशी पिके घ्यावी. अवेळी, अपुऱ्या अवकाळी व मुसळधार पावसामुळे जमिनीचा सुपीक थर वाहून जातो. हा जमिनीचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. सुपीक मातीअभावी शेतीची उत्पादनक्षमता कमी होते.
तापमान
पावसानंतरचा महत्त्वाचा घटक म्हणजे तापमान आहे. हवामानातील बदलत्या तापमानामुळे पिकांच्या वाढीच्या अवस्थेत विविध प्रकारचे अडथळे येतात. त्याचा पिकांच्या वाढीवर परिणाम दिसून येतो. एखाद्या हंगामात अपेक्षित उष्ण किंवा थंड तापमानापेक्षा अचानक बदल होऊन वेगळेच वातावरण राहिल्यास त्याचे विपरीत परिणाम पिकांच्या उत्पादनावर होतात.
उष्ण हवामानात येणाऱ्या पिकांच्या अवस्थेमध्ये थंडी पडली तर बराच वेळा जोमाने वाढणारी पिके मरतात किंवा त्यांची वाढ खुंटली जाते. पिकामध्ये तापमानानुसार रोग किडीच्या प्रादुर्भावावरही परिणाम दिसून येतात. एकंदरीत तापमान खूप कमी झाल्यास वनस्पतींची पाने, फुले कोमेजतात. फळांवर डाग पडतात. तसेच जास्त तापमानामध्ये वनस्पतींची पाने करपतात.
फुले - फळे करपून गळून पडतात. काही वेळा पिकांची वाढ खुंटते, तर काही तीव्र स्थितीमध्ये संवेदनशील अवस्थेत असलेली रोपे मरतात. परिणामी एकूण रोपांची संख्या कमी होऊन उत्पादनात मोठी घट होते. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनात वाढ होऊन भूजल पातळीत घट होते. सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येतो.
आर्द्रता
वातावरणात असलेल्या पाण्याचे प्रमाण म्हणजे हवेतील आर्द्रता होय. वातावरणातील व जमिनीतील आर्द्रता वनस्पतींच्या वाढीस पोषक असते. सर्वसाधारणपणे वातावरणातील आर्द्रता ३० ते ४० टक्के असल्यास वनस्पतींची वाढ उत्तम होते. वनस्पतींच्या वाढीसाठी जमिनीतील ओलावा किंवा आर्द्रता ही महत्त्वाची असून, त्याचा परिणाम अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर होतो. जमिनीतील आर्द्रता ही सर्वसाधारणपणे ४० ते ६० टक्के या प्रमाणात (वाफसा) असल्यास सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. उपलब्धता झाल्यामुळे पिकांची वाढ उत्तमरीत्या होते.
सूर्यप्रकाश
सूर्यप्रकाशाचा वापर करून वनस्पतींची पाने अन्न तयार करतात. प्रकाश संश्लेषणाच्या या प्रक्रियेवरच सर्व शेती अवलंबून असते. पिकांना आवश्यक असलेल्या सूर्यप्रकाशाच्या कालावधीनुसार पिकांचे काही प्रकार पडतात. ज्या पिकांना १२ तासांपेक्षा जास्त सूर्यप्रकाश लागतो, त्या पिकांना लांब दिनमानाची पिके म्हणतात., तर ज्या पिकांना १२ तासांपेक्षा कमी सूर्यप्रकाश गरजेचा असतो, त्यांना आखूड दिनमानाची पिके म्हणतात.
काही पिकांच्या बाबत वाढीवर सूर्यप्रकाशाच्या कालावधीचा कोणताही परिणाम होत नाही, अशा पिकांना दिनमान तटस्थ पिके म्हणतात. वातावरणात तापमान आणि आर्द्रता या घटकांच्या तुलनेमध्ये सूर्यप्रकाशाचा रोगांच्या प्रादुर्भाव आणि वाढीवर फारसा परिणाम होत नाही. मात्र वनस्पतीला मिळणारा सूर्यप्रकाश आणि अंधाराचा कालावधी यावर रोगाची वाढ अवलंबून असते.
वाऱ्याचा वेग
वाऱ्याचा वेग हा आजूबाजूच्या भौगोलिक परिस्थितीवर आणि समुद्रसपाटीपासूनच्या उंचीवर अवलंबून असतो. अनेक वनस्पती परागीभवनासाठी किंवा बियांची एका जागेवरून दुसऱ्या जागेवर वाहून रुजण्यासाठी वाऱ्यावर अवलंबून असतता. जमिनीतील ओलावा कमी होण्यास कारणीभूत ठरणारा बाष्पीभवनाचा वेगही वाऱ्याच्या वेगावरच ठरतो.
बाष्पीभवन
जमिनीतून होणारे पाण्याच्या ओलाव्याचे बाष्पीभवन हे तापमान आणि वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असते. त्याच प्रमाणे वनस्पतींनी शोषलेले पाणीही बाष्पोत्सर्जनामुळे बाहेर फेकले जाते. त्यामुळे पिके जमिनीतून आणखी पाणी खेचून घेतात. या प्रक्रियेमध्ये अन्नद्रव्येही शोषली जातात. त्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण हे पिकांच्या वाढीवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करत असते. बागेतील बाष्पीभवनाचा दर लक्षात घेऊन सिंचनाचे प्रमाण ठरवता येते.
बदलत्या हवामानानुसार पीक व्यवस्थापन
पिकांचे नियोजन हे जमीन, पाणी आणि हवामान या तीन घटकांवर अवलंबून असते. आपल्याकडे हवामानानुसार शेतीसाठी खरीप, रब्बी आणि उन्हाळी असे तीन हंगाम समजले जातात. त्या त्या हंगामामध्ये उत्तम वाढू शकणारी पिकेही बहुतांश ठरलेली आहेत. हवामानाशी समरस होणारी पिके घेतल्यास उत्पादनाची शाश्वती वाढते. अर्थात गेल्या काही दशकांमध्ये नियमित हंगामामध्ये अचानक काही हवामान बदल दिसून येऊ लागले आहे. त्याचे विपरीत परिणाम पिकांच्या उत्पादनावर दिसत आहेत.
हवामान आधारीत कृषी सल्ले ः अचानक झालेल्या या हवामानातील चढ-उताराचा किंवा बदलांचा पिकावर परिणाम होऊन उत्पादनात घट होते. हे टाळण्यासाठी हवामान विभागामार्फत हवामानाचे अंदाज दिले जातात. त्यावर आधारीत कृषी सल्ले व शिफारशी विद्यापीठांमार्फत दिले जातात. अशा सल्ल्यांचा वापर शेतकऱ्यांनी नक्की करावा. अलीकडे काही व्यावसायिक पिकांमध्ये शेतकरी स्वतःही स्वयंचलित हवामान केंद्रे बसवत आहेत. त्याचा फायदा पिकांच्या व्यवस्थापनामध्ये नक्कीच होताना दिसतो.
बदलत्या हवामानानुसार पीक उत्पादन तंत्र : भौगोलिक परिस्थितीत नुसार जमिनीचा प्रकार, सिंचन व्यवस्था तसेच हवामानातील विविध घटकांनुसार विविध पीक तंत्र विकसित करणे गरजेचे आहे.
माती व जल संधारण : कोरडवाहू क्षेत्रात मातीचे व पाण्याचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे ठरते. त्यासाठी मृदा व जल संधारणाच्या विविध पद्धतीचा अवलंब करता येतो. जलसंधारणाच्या विविध उपायांमुळे पावसाचे पाणी अधिक प्रमाणात मुरून जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. बांधबंदिस्तीमुळे अचानक आलेल्या मोठ्या पावसामध्येही सुपीक माती वाहून जाणे रोखले जाते.
खत व पाणी व्यवस्थापन : बदलत्या हवामानानुसार पिकांच्या खत व पाणी व्यवस्थापनामध्ये योग्य त्या सुधारणा करण्याची गरज आहे. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय खतांचा भरपूर वापर करण्याची गरज आहे. केवळ रासायनिक खतांवर अवलंबून राहण्याऐवजी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनावर भर द्यावा लागणार आहे. पाणी व्यवस्थापनासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतींचा अवलंब करण्याची आवश्यकता असते.
कृत्रिम बुद्धिमतेचा वापर : अलीकडे खत आणि पाणी व्यवस्थापनासाठी विविध सेन्सर्सचा वापर केला जातो. त्याद्वारे निर्णय घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमतेचाही वापर होऊ लागला आहे. अद्याप हे तंत्रज्ञान पहिल्या टप्प्यात उसासारख्या काही मोजक्याच पिकांसाठी विकसित होत असले तरी सर्व पिकांमध्ये तितकेच उपयोगी ठरणार आहे. शेकडो वर्षातील हवामानाचे पॅटर्न अभ्यासून सध्याच्या वातावरणावरून संभाव्य वातावरणाविषयी अचूक माहिती उपलब्ध होणार आहे. त्याचे व्यवस्थापनासाठी नक्कीच फायदे होतील.
स्वयंचलित हवामान केंद्रे आणि त्या आधारित उपलब्ध होणारे सल्ले हे सर्वसामान्यांच्या आवाक्यात असणे गरजेचे आहे. अन्यथा ही माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याची जबाबदारी शासन व त्यांच्या अंतर्गंत संस्थांनाच पेलावी लागणार आहे.
- डॉ. विशाल गमे, ९४०३९२९६१७
(साहाय्यक प्राध्यापक, कृषी विद्या विभाग, मराठा विद्या प्रसारक समाज, कर्मयोगी दु. सि. पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.