
Nagpur News: ‘‘सरकारमधील मंत्र्यांनी त्यातही राज्याचे कृषिमंत्री असलेल्या व्यक्तींनी तंत्रज्ञानाच्या बाबतीत अपप्रचार न करता संपूर्ण माहिती घेऊन आणि शहनिशा करूनच वक्तव्य करावे,’’ असा सल्ला शेती प्रश्नाचे ज्येष्ठ अभ्यासक विजय जावंधिया यांनी दिला आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना लिहिलेल्या पत्रातून श्री. जावंधिया यांनी हा सल्ला दिला आहे. देशातील कापूस उत्पादकता वाढीच्या संदर्भात कोइमतूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी (ता.११) झालेल्या बैठकीला केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान उपस्थित होते.
या वेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी महाराष्ट्रातील सुमारे ५० टक्के लागवड क्षेत्र हे अनधिकृत एचटीबीटी (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) बियाण्याखाली आले असल्याचे जाहीरपणे सांगितले. या पार्श्वभूमीवर श्री. जावंधिया यांनी श्री. कोकाटे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले, ‘‘शेतकऱ्यांना या बियाण्यांमुळे फायदा होत असल्यानेच ते चोरून या बियाण्यांचा वापर करून लागवड करीत असल्याची शक्यता आपल्या वक्तव्यातून वर्तविली गेली.
त्याच वेळी आपण एचटीबीटीला मान्यता देण्याची विनंती केंद्रीय कृषिमंत्र्यांना केली. याला समर्थन म्हणून तुमच्याद्वारे अमेरिका, ब्राझील या प्रगत देशांमध्ये बीजी-७ पर्यंतचे तंत्रज्ञान वापरात असल्याबाबत सांगितले. परंतु अशा प्रकारचे कोणतेही तंत्रज्ञान कापूस उत्पादक देशांमध्ये अद्यापपर्यंत उपलब्ध नाही. तंत्रज्ञानविषयक चर्चा करताना त्याबाबतची पुरेशी माहिती घेऊनच बोलणे अपेक्षित असते.
त्यातही मंत्रिमंडळातील आणि विशेषतः कृषिमंत्र्यांनी अशा बाबतीत अधिक सजग असण्याची गरज आहे. परंतु तज्ज्ञांकडून माहिती न घेता कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा ऐकीव माहितीच्या आधारे आपल्याद्वारे हे वक्तव्य करण्यात आले. शासकीय कार्यक्रमातून तरी अशा प्रकारचा अपप्रचार होऊ नये याकरिता खबरदारी घेतली जावी,’’ असेही जावंधिया यांनी पत्रात नमूद केले आहे.
काही शेतकरी संघटनांनी तर एचटीबीटी तंत्रज्ञान हे गुलाबी बोंड अळी प्रतीकारक असल्याचाही अपप्रचार चालविला आहे. त्याबाबतही शासनस्तरावरून जागृती करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.