Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदी फडणवीस

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यशानंतर भाजपने विधिमंडळ पक्षनेतेपदी अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांची निवड केली.
Mahayuti
MahayutiAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यशानंतर भाजपने विधिमंडळ पक्षनेतेपदी अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांची निवड केली. आज (ता. ५) सायंकाळी पाच वाजता आझाद मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य नेते आणि साधुसंतांच्या उपस्थितीत भव्य शपथविधी सोहळा होणार आहे.

शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार शपथ घेणार हे निश्‍चित झाले असताना एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील सहभागाबाबत मात्र संदिग्धता आहे. तसेच किती मंत्री शपथ घेणार याबाबत बुधवारी सायंकाळपर्यंत स्पष्टता नव्हती.

विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीत भाजपला पाठिंबा दिलेल्या सहयोगी पक्षांसह अपक्ष आमदारांची उपस्थिती होती. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव सुचविले. त्यास आशिष शेलार, अशोक उइके, दिलीप बोरसे, योगेश सागर, गोपीचंद पडळकर, संभाजी निलंगेकर, पंकजा मुंडे यांनी अनुमोदन दिले.

Mahayuti
Maharashtra Politics : महायुतीच्या गोंधळात शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष

या वेळी फडणवीस यांनी पाच वर्षांपूर्वी युती तोडून आलेल्या महाविकास आघाडीवर टीका केली. सत्तेत येऊनही सरकार बनवू न शकल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली. दरम्यान, आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू केली असून, जवळपास ४० हजारांहून अधिक व्यक्तींची आसन व्यवस्था केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अति महत्त्वाच्या व्यक्ती येणार असल्याने सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. अति महत्त्वाच्या व्यक्तींकरिता पासेसची व्यवस्था करण्यात आली आहे. शपथविधी सोहळ्यासाठी तीन व्यासपीठांची तयारी केली असून भाजप कार्यकर्त्यांना खास टी-शर्ट तयार केल्याचेही सांगण्यात येत आहे.

बुधवारी सकाळी १० वाजल्यापासून विधिमंडळात भाजप आमदार येण्यास सुरुवात झाली. त्याबरोबरच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, निरीक्षक म्हणून आलेले केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचेही आगमन झाले. त्यानंतर प्रथम भाजप कोअर कमिटीची बैठक झाली.

Mahayuti
Maharashtra CM Selection : मुख्यमंत्री आज ठरणार

या बैठकीत गटनेतेपदी नियुक्तीबाबत चर्चा झाली. त्यानंतर भगवे फेटे परिधान केलेल्या आमदारांची मध्यवर्ती सभागृहात बैठक झाली. बैठकीच्या सुरुवातीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमिका मांडली. त्यानंतर विजय रुपाणी यांनी गटनेते पदासाठी प्रस्ताव सादर करावा अशी विनंती केली.

त्यानंतर चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्यास अन्य आमदारांनी अनुमोदन देत एकमताने फडणवीस यांची निवड करण्यात आली. ते म्हणाले, ‘‘राज्यातील जनतेने मोठा जनादेश आपल्याला दिलेला आहे. या जनादेशातून आनंद आहे, पण जबाबदारी वाढली आहे.

आपल्या लाडक्या बहिणी, भाऊ, शेतकरी, युवा समाजातील दलित, वंचित, ओबीसी, आदिवासी या सर्वांनी जो जनादेश दिला आहे, त्या जनादेशाचे सन्मान राखण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे. त्यामुळे आपली प्राथमिकता आपण सुरू केलेल्या योजना आणि आपण दिलेली आश्‍वासने पूर्ण करणे याला असेलच.

सोबत महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी आपल्या सर्वांना सातत्याने कार्यरत राहायचे आहे. २०१९ मध्ये देखील जनतेचा कौल आपल्याला मिळाला होता. पण दुर्दैवाने तो हिसकावून घेण्यात आला. आणि जनतेसोबत एक प्रकारे बेइमानी त्या काळात झाली. आता आपण नवीन सुरुवात करतो आहोत.’

‘आपल्याला प्रचंड त्रास दिला’

महाविकास आघाडीवर टीका करताना ते म्हणाले, ‘‘सुरुवातीच्या अडीच वर्षांत ज्याप्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्रास देण्यात आला. आपल्या नेत्यांना, आमदारांना त्रास देण्यात आला. अशाही परिस्थिती अडीच वर्षांत आपला एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही याचा अभिमान आहे. सर्व आमदार, नेते संघर्ष करत होते. या संघर्षामुळेच २०२२ मध्ये पुन्हा आपले सरकार तयार झाले. त्यातूनच आज महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. भाजपला १३२ आणि पाच मित्र पक्ष असे मिळून १३७ जागा मिळाल्या. एक प्रकारचा इतिहास लिहिला गेला आणि हा इतिहास अभूतपूर्व असा आहे.’’

आमदारांत उत्साह

गेल्या पाच वर्षांच्या राजकीय वनवासानंतर भाजप मोठ्या बहुमताने सत्तेत आल्याने आमदारांत उत्साह होता. भगवे फेटे परिधान केलेल्या आमदारांच्या घोषणाबाजीने विधान भवन दणाणून गेले. २०१९मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात विरोधात आणि महायुती सरकारच्या काळात १०५ आमदार असूनही केवळ १० मंत्रिपदांवर समाधान मानावे लागले होते. या वेळी अधिक मंत्रिपदाची अपेक्षा असल्याने आमदार लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करीत होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com