Maharashtra CM Selection : मुख्यमंत्री आज ठरणार

Political Party Meeting : गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तास्थापनेच्या घोळावर आज (ता. ४) पडदा पडण्याची शक्यता आहे. भाजपच्या गटनेता निवडीची बैठक विधान भवनात सकाळी १० वाजता होणार असून, मुख्यमंत्रिपदाचा निर्णय या बैठकीत होणार आहे.
Mahayuti
MahayutiAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तास्थापनेच्या घोळावर आज (ता. ४) पडदा पडण्याची शक्यता आहे. भाजपच्या गटनेता निवडीची बैठक विधान भवनात सकाळी १० वाजता होणार असून, मुख्यमंत्रिपदाचा निर्णय या बैठकीत होणार आहे.

या बैठकीसाठी भाजपने गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मुंबईत दाखल झाले आहेत. आमदारांशी औपचारिक चर्चेनंतर गटनेता निवड होणार आहे.

दरम्यान, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने ते ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. मात्र तासाभरात उपचार घेऊन ते बाहेर पडले. त्यानंतर ‘वर्षा’ या सरकारी निवासस्थानी प्रथमच त्यांनी आमदारांशी चर्चा केली.

निकाल लागल्यानंतर झालेल्या बैठकीनंतर शिंदे हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेले काही दिवस एकांतवासात होते. मात्र या आजारपणामागे भाजपवर दबावतंत्राचा वापर केल्याचे बोलले जात आहे. भाजपने या दबावाला न झुगारता शपथविधीची तयारी सुरू केली आहे.

Mahayuti
Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरून उद्या पडदा उठणार?; भाजपचे निरीक्षक राज्याच्या दौऱ्यावर

मंगळवारी सकाळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन यांच्यासह शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ आणि गुलाबराव पाटील यांनी आझाद मैदानाची पाहणी केली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि अनिल पाटील या नेत्यांनीही उपस्थिती लावली. तत्पूर्वी गिरीश महाजन यांनी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी सोमवारी रात्री भेट घेऊन दीड तास चर्चा केली होती. महाजन हे वरिष्ठांचा निरोप घेऊन गेल्याचे समजते.

भाजपची आज बैठक

एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीत नेतृत्व केल्याने सत्ता आल्यानंतर प्रथम मुख्यमंत्रिपदावर दावा केला होता. मात्र भाजपचे बहुमत असल्याने त्यांनी शिंदे यांच्या दबावाला न जुमानता शिंदे यांच्या मागण्यांकडे पूर्ण दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यावरील दावा सोडला. मुख्यमंत्रिपद मिळणार नसेल तर मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाविना गृहमंत्रिपद आणि नगरविकासह अन्य खाती मिळावीत यासाठी शिंदे यांनी आग्रह केला.

मात्र त्याकडेही भाजपने काणाडोळा केल्याने शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. हवे ते खाते मिळत नाही आणि इच्छुकांची मोठी यादी या कात्रीत शिंदे अडकल्याने त्यांनी आमदारांना भेटणेही टाळले आहे.

मंगळवारी दुपारी अचानक त्यांनी ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर काही वेळातच ते तेथून बाहेर पडले. त्यानंतर ‘वर्षा’ निवासस्थानी दाखल झाल्यानंतर त्यांच्या आमदारांची बैठक घेतली. सत्तास्थापनेच्या पार्श्‍वभूमीवर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

Mahayuti
Indian Politics : भविष्यातील नवी समीकरणे

शिंदे आजारी; शिवसेना अस्वस्थ

काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे हे आजारी असल्याने गेल्या चार-पाच दिवसांपासून त्यांचा आमदारांशी आणि प्रमुख नेत्यांशीही संपर्क होत नाही. दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर यांच्यासह अन्य जवळच्या नेत्यांनाही शिंदे यांची नेमकी भूमिका माहीत नव्हती. उपमुख्यमंत्रिपदावरून श्रीकांत शिंदे यांच्या नावाची सुरू असलेली चर्चा त्यांनीच पोस्ट करून पूर्णविराम दिला.

गृहमंत्रिपदावर आडून बसलेल्या शिवसेनेत आता नरमाईचा सूर ऐकायला मिळत आहे. शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, दीपक केसरकर यांनी सावध प्रतिक्रिया देत शिंदे घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असल्याचे सांगितले. शिंदे हे आमदारांना भेटतच नसल्याने शिवसेनेत अस्वस्थता आहे.

अजित पवार दिल्लीत

सत्तास्थापनेचा कालावधी जवळ येईल तसा घडामोडींना वेग आला असून, अपेक्षित खात्यांसाठी तीनही पक्षांत रस्सीखेच सुरू आहे. अजित पवार यांनी खातेवाटपाआधी दिल्लीत धाव घेतली असून, अमित शहा यांच्याशी चर्चा करण्यासाठी सोमवारपासून थांबून आहेत. मात्र मंगळवारी सायंकाळपर्यंत त्यांची भेटच झाली नाही.

मात्र सत्तास्थापनेच्या शर्यतीत शांतपणे राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत जुळवून घेतल्याचे समोर आले आहे. पवार यांचे भाजपशी चांगले सूर जुळल्याने शिंदे यांच्या दबावतंत्राकडे ढुंकून न पाहण्याचे धोरण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ठरविल्याचे समजते.

फडणवीस यांची टीम आघाडीवर

शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी भाजपने केली असून, सरकारी यंत्रणेऐवजी भाजपच्या नेत्यांनी ही संपूर्ण यंत्रणा ताब्यात घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर, मोहित कंबोज यांच्यासह फडणवीस यांचे निकटवर्तीय जोमाने कामाला लागले आहेत.

गेल्या दोन दिवसांत दोन वेळा त्यांनी आझाद मैदानाची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. दोन दिवसांपूर्वी सहकारी दोन्ही पक्षांना सोबत न घेता पाहणी केली, तर मंगळवारी सहकारी पक्षातील निवडक नेत्यांना सोबत घेऊन पाहणी केली. फडणवीस यांची गटनेता म्हणून निवड होईल, हे निश्चित असल्याने त्यांनी टीम जोरात कामाला लागली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com