
सतीश कुलकर्णी
Jaggery Production Pune : पुणे येथील औषधी कंपनीमध्ये रिसर्च केमिस्ट असलेल्या ओंकार भिऊंगडे यांनी पारंपरिक गूळ उत्पादन प्रक्रियेतील रसायने काढून टाकण्यासाठी संशोधन केले आहे. त्यांच्या या संशोधनामुळे गूळ बनविण्याच्या प्रक्रियेची केवळ कार्यक्षमताच वाढली असे नाही, तर मिळणारा गूळ संपूर्ण सेंद्रिय आणि औषधीही बनतो. त्यांना नुकतेच सेंद्रिय आणि औषधी गूळ निर्मिती प्रक्रियेचे ‘जर्मन युटिलिटी पेटंट’ ही मिळालेले आहे.
महाराष्ट्रामध्ये गूळ उत्पादन, व्यवसाय आणि बाजारपेठ म्हणूनही कोल्हापूर परिसर प्रसिद्ध आहे. या भागातील गूळ उत्पादनांचा रंग, चव आणि दर्जा याची ख्याती सर्वत्र पसरलेली आहे. मात्र गुळाचा दर्जा चांगला मिळावा आणि प्रक्रिया वेगवान होण्यासाठी अनेक गुऱ्हाळघरामध्ये गूळ उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये अनेक रसायनांचा वापर केला जातो. मात्र, बऱ्याच ठिकाणी गुळवे अशिक्षित असल्यामुळे या रसायनांचे प्रमाण कमी अधिक होण्याची शक्यता असते. मुळातच आरोग्यासाठी व पर्यावरणासाठी हानिकारक मानली जाणारी ही रसायने आणखी घातक ठरण्याची शक्यता असते. ही समस्या ओळखून त्यावर मात करण्यासाठी ओंकार ईश्वर भिऊंगडे यांनी संशोधन केले आहे. मूळचे ते माद्याळ (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील शेतकरी कुटुंबातील असले तरी सध्या ते पुण्यामध्ये एका खासगी औषध निर्माण कंपनीमध्ये रिसर्च केमिस्ट या पदावर कार्यरत आहेत.
पारंपरिक गूळ उत्पादनात या रसायनांचा होतो वापर
गूळ उत्पादनामध्ये उष्णता ऊर्जा कार्यक्षमता अधिक मिळविण्यासाठी गूळ उत्पादक ऑर्थोफॉस्फेरिक ॲसिड, हायड्रोसल्फेट, सोडिअम बेंझोनेट या सारख्या रसायनांचा वापर करतात. गुळाचा रंग सुधारण्यासाठी अन्नदर्जाचे रंग किंवा रासायनिक रंगही वापरले जातात. गुळाला विशिष्ट चव मिळण्यासाठी काही गंध, स्वाद (इसेन्स) वापरले जाते.
या साऱ्या घटकांमध्ये गूळ अतिगोड बनण्याचा धोका असतो. काही वेळा गूळ तोंडात टाकताच पहिल्यांदा गोड लागत असला तरी काही वेळात तोंड कडसर होऊन जाते. या रसायनांना वनस्पतिजन्य घटकांचा पर्याय शोधण्यासाठी ओंकार भिऊंगडे यांनी स्वतःच्या राहत्या घरातच छोटी प्रयोगशाळा उभारली. आयुर्वेदीक महत्त्व जाणून आपल्याकडे आढळणाऱ्या औषधी व नैसर्गिक वनस्पती या प्रक्रियेमध्ये उपयुक्त ठरू शकतील, या दिशेने काम सुरू केले.
यातून त्यांनी केवळ गूळ बनविण्याची प्रक्रियाच रसायनमुक्त केली असे नाही, तर त्यातील औषधी गुणधर्मही वाढवले. या संपूर्ण प्रक्रियेसाठी व प्रारूपाच्या पेटंटसाठी त्यांनी जर्मनीमध्ये अर्ज सादर केला होता. त्याला नुकतीच (१८ मार्च २०२५) मान्यता मिळाली असून, त्याचे अधिकृत प्रमाणपत्रही प्राप्त झाले आहे. भारतातील पेटंटसाठीही अर्ज दाखल केलेला आहे. या संशोधनाच्या गुळाच्या प्रयोगशाळेतील तपासण्यांसाठी व आर्थिक निधीसाठी रोहित श्यामराव बोडके यांचीही मदत झाली आहे. ते औषध निर्माण कंपनीमध्ये ‘लॅब केमिस्ट’ म्हणून कार्यरत आहेत.
सेंद्रिय व औषधी गूळ निर्मिती प्रक्रियेची ही आहेत वैशिष्ट्ये
पारंपरिक पद्धतीच्या गुळासारखीच उत्तम गोड चव आणि तोंडात टाकताच विरघळण्याची क्षमता या सेंद्रिय आणि औषधी गुळामध्ये आहे. मात्र त्याच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये परंपरेने वापरली जाणाऱ्या रसायने पूर्णपणे काढून टाकली आहे. त्यामुळे या नवी शून्य रसायन असलेली उत्पादन प्रक्रिया तयार केली.
सर्वसाधारणपणे गूळ बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये टप्पे पुढीलप्रमाणे असतात.
उसाचा रस गरम करत असताना त्यातील मळी व अन्य तरंगते घटक काढून टाकण्याची म्हणजेच शुद्धीकरणाची प्रक्रिया (clarification) केली जाते. त्यासाठी बहुतांश गुऱ्हाळात हायड्रोस (शा. नाव - हायड्रोजन सल्फाईड) भुकटी वापरली जाते. मात्र भिऊंगडे यांनी कोरफड, बीटरूट यांच्या प्रक्रियेतून मिळवलेल्या पदार्थांचा वापर केला आहे. त्यामुळे रस शुद्धीकरणाची ही प्रक्रिया वेगाने होते.
उसाचा रस गरम होण्याच्या प्रक्रियेमध्ये काही पोषक घटक नष्ट होत असतात. तेही योग्य मिश्रणामध्ये वापरलेल्या या पदार्थामुळे होत नाहीत. पारंपरिकरीत्या गूळ बनविण्याची प्रक्रिया वेगाने व्हावी व इंधनामध्ये बचत व्हावी या उद्देशाने सामान्यतः ओर्थो फॉस्फोरीक ॲसिडचा वापर केला जातो. या रसायनांलाही भिऊंगडे यांनी पर्याय शोधला आहे. त्यात जास्वंद, अश्वगंधा, लिंबाची मुळे यासारख्या आणखी काही घटकांचा समावेश केला आहे. (ही पेटंटेड प्रक्रिया असल्यामुळे सर्वच माहिती व प्रक्रिया सविस्तर देणे शक्य नाही.) पण या सुधारीत प्रक्रियेमध्ये एकाही रसायनाचा वापर केला जात नाही. उलट नैसर्गिक, औषधी घटकांचा वापर केला जात असल्याने संपूर्ण गूळ हा सेंद्रिय व औषधी होतो.
- ओंकार भिऊंगडे
९३२६५३९८६०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.