
FCI Rice : केंद्र सरकारने २०२४-२५ साठी २८ लाख टन अतिरिक्त तांदूळ इथेनॉल निर्मितीसाठी वापरास मंजूरी दिली आहे. त्यामुळे २०२४-२५ (नोव्हेंबर ते ऑक्टोबर) वर्षात इथेनॉल निर्मितीसाठी तांदळाचा वापर ५२ लाख टनांवर पोहचला आहे. परंतु इथेनॉलसाठी वापरण्यात येणाऱ्या तांदळाच्या किमती मात्र जैसे थे ठेवण्यात आल्या आहेत.
इथेनॉल निर्मितीसाठी महामंडळ तांदळाच्या वाटपाला सक्षम प्राधिकरणाने मंजुरी दिल्याचं अन्न मंत्रालयाने मागील आठवड्यातच अधिसूचनेत स्पष्ट केलं होतं. तसेच हा तांदूळ ठराविक दरानं म्हणजेच २२.५० रुपये प्रतिकिलो दराने दिला जाणार आहे.
यामध्ये २४ लाख टन पूर्वीचा तर २८ लाख टन नव्यानं मंजूर केलेल्या तांदळाचा समावेश आहे. म्हणजेच एकूण ५२ लाख टन तांदूळ इथेनॉल निर्मितीसाठी मंजूर करण्यात आला आहे. या तांदळाचा वापर १ नोव्हेंबर २०२४ ते ३१ ऑक्टोबर २०२५ च्या दरम्यान करण्यात येणार आहे. त्यासाठी भारतीय अन्न महामंडळामार्फत उपलब्ध होणाऱ्या तांदळाच्या साठ्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं अन्न मंत्रालयाने सांगितलं आहे.
इथेनॉल निर्मितीसाठी तांदळाचे दर प्रतिकिलो २२.५० रुपये कायम ठेवण्यात आले आहेत. तर भारतीय अन्न महामंडळाने यापूर्वी २४ लाख टन तांदूळ इथेनॉल निर्मितीसाठी कंपन्यांना मंजूर केला होता. परंतु इथेनॉल उत्पादक कंपन्यांनी आतापर्यंत त्यापैकी १० टनांपेक्षा कमी तांदूळ उचलला आहे.
केंद्र सरकारने यंदाच्या इथेनॉल उत्पादन वर्षात पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रण १८ टक्क्यांच्या पुढे घेऊन जाण्याचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. पुढील वर्षासाठी तर यामध्ये २ टक्के वाढ म्हणजे २० टक्क्यांपर्यंत पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचं निश्चित करण्याचा सरकारचा मानस आहे. यंदाच्या इथेनॉल निर्मिती वर्षात नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान इथेनॉल मिश्रणाचं प्रमाण १८.५ टक्क्यांपेक्षा जास्त नोंदवलं गेलं आहे.
दरम्यान, भारतीय अन्न महामंडळाच्या एक टन तांदळापासून ४७० लिटर इथेनॉल तयार होण्याचं गृहीत धरलं. तर ५२ लाख टन तांदळापासून सुमारे २४५ कोटी लिटर इथेनॉल तयार होऊ शकतं. त्यासाठी सरकारला १० हजार कोटी रुपयांचं अनुदान द्यावं लागणार आहे.
तसेच २०२५-२६ मध्ये तांदळाचा प्रतिकिलो अंदाजे खर्च ४१.७३ किलो आहे. तर इथेनॉल निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या तांदळाचे दर प्रतिकिलो २२.५० रुपये निश्चित करण्यात आले आहेत. म्हणजे सरकारला प्रतिकिलो १९.२३ रुपये अनुदान द्यावे लागणार आहे.
जर इथेनॉल उत्पादक कंपन्यांनी ५२ लाख टन तांदूळ उचलला तर त्यासाठी कंपन्यांना भारतीय अन्न महामंडळाला ११ हजार ७०० कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. तर इथेनॉल तेल कंपन्यांना विकून त्यातून कंपन्यांना अंदाजे १४ हजार ३०० कोटींचे उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.