
राहुल वडघुले
Grapevine Disease Prevention: द्राक्ष पिकामध्ये अनेक बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. यामध्ये मुख्यत: डाऊनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू, ॲन्थ्रॅकनोज, जीवाणूजन्य करपा इत्यादी महत्त्वाच्या रोगांचा प्रादुर्भाव सर्व द्राक्ष विभागात दिसून येतो. तसेच थ्रीप्स, मिलिबग, स्टेम बोरर, तुडतुडे, स्पोडोप्टेरा अशा अनेक किडींचा प्रादुर्भाव देखील आढळतो. या कीड-रोगांच्या प्रादुर्भावामुळे द्राक्ष बागेत उत्पादन खर्च वाढतो.
बहुतांश वेळा कीड-रोगाची योग्य ओळख न पटल्यामुळे नियंत्रणासाठी रासायनिक फवारणी करून देखील अपेक्षित परिणाम मिळत नाही. त्यामुळे फवारणीवरील खर्च विनाकारण वाढतो. त्यासाठी द्राक्ष पिकातील विविध कीड-रोगांच्या लक्षणांविषयी माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे द्राक्ष काडीवर येणारा ‘बोट्रोडीप्लोडीया’ हा काडी मर रोग. या विषयी आजच्या लेखात माहिती घेऊ.
रोगाची माहिती
रोगाचे नाव : बोट्रोडीप्लोडीया काडी मर रोग
रोगाचे कारण : हा रोग बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतो.
डिव्हीजन : Ascomycota
शास्त्रीय नाव : Botryodiplodia theobromae
परजीवी प्रकार : Facultative Parasite
यजमान पिके : हा रोग विविध ५०० वनस्पतींवर आढळून येतो. आंबा, पपई, लिंबू, पेरू, केळी, काजू, ड्रॅगनफ्रुट इत्यादी.
पोषक वातावरण : तापमान २० ते ३० अंश सेल्सिअस, ८० ते ९० टक्के अति आर्द्रता, पाऊस किंवा काड्यांवर ओलावा असावा लागतो. बागेमध्ये पाणी साचून राहणे असे वातावरण रोगासाठी पोषक असते.
हा रोग एप्रिल छाटणीनंतर बागेमध्ये येतो, असा समज.
काय आहे ‘बोट्रोडीप्लोडीया’
एप्रिल छाटणीनंतर सबकेन केल्यानंतर काडी परिपक्व होणे गरजेचे असते. काडी परिपक्व होत असताना, काडीच्या रंगात हिरवा-गुलाबी-पांढरा-राखाडी असे बदल होत जातात. काडीचा रंग छाटणी केलेल्या भागापासून ते सबकेनच्या पुढे पूर्णपणे राखाडी होतो, तेव्हा काडी परिपक्व झाली असे म्हणता येते. परंतु असे न होता काडी सबकेनच्या अगोदरच राखाडी होण्याचे थांबते. ज्या ठिकाणी ती थांबते, तेथील राखाडी भागाची कडा गर्द तपकिरी झाल्याचे आढळून येते. पुढील काडी तशीच पांढरी राहते. अशा प्रकारची लक्षणे दिसून आल्यानंतर द्राक्ष उत्पादक याला ‘बोट्रोडीप्लोडीया’ असे म्हणतात.
गैरसमज
या रोगाबाबत अनेक गैरसमज दिसून येतात. या रोगासाठी पोषक वातावरण आवश्यक असते. वरील लक्षणे ज्यावेळी बागेत दिसून येतात, त्यावेळी पोषक वातावरणाची स्थिती नसते. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता ही कमी असते.
हे टाळावे...
या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बुरशीनाशक व जीवाणूनाशकांचा ड्रीपद्वारे वापर केला जातो. मात्र या उपाययोजनांचे दुष्परिणाम बागेत कालांतराने दिसून येतात. जसे की, जमिनीतील मित्रबुरशी ट्रायकोडर्मा, मायकोरायझा, बिव्हेरिया, मेटाऱ्हायझिम इत्यादींचा नाश होऊ शकतो. फॉस्फरसचे शोषण कमी होऊ शकते.
रोगाची कार्यपद्धती जाणणे महत्त्वाचे..
रोगाचा पिकावर प्रादुर्भाव झाल्यानंतर त्या रोगाचे पिकावर होणारे परिणाम माहिती असणे आवश्यक आहे. बुरशीजन्य रोग पिकाला दोन प्रकारे नुकसान करतात.
पिकांच्या पेशी जिवंत ठेवून त्यामधून पोषक घटक घेणे.
पिकांच्या पेशी मारून त्या सडल्यानंतर त्यातून पोषक घटक घेणे.
या दोन्ही क्रियांमध्ये बुरशी मृत झाल्यानंतर प्रादुर्भाव झालेला भाग देखील मरतो. म्हणजेच ‘बोट्रोडीप्लोडीया’चा प्रादुर्भाव झालेली एप्रिल छाटणी नंतरची काडी मरणे क्रमप्राप्त आहे. तेव्हाच आपण या रोगाला बुरशीजन्य रोग म्हणू शकतो.
एप्रिल छाटणीनंतर काडी अर्धी राखाडी होण्याची कारणे
वेलीवरील जास्त काड्या.
कमी प्रमाणात केलेली विरळणी.
वाढलेले तापमान
पाण्याचा ताण
कर्बोदके कमी असणे
पोटॅश या अन्नद्रव्याची कमतरता.
उपाययोजना
ही समस्या टाळण्यासाठी,
काड्यांची संख्या मर्यादित ठेवावी.
काड्यांची वाढ नियंत्रित ठेवणे.
पाण्याचा ताण पडू देऊ नये.
पोटॅश या अन्नद्रव्याचे चांगले व्यवस्थापन करणे.
प्रक्षेत्रावर घेतलेली निरीक्षणे
२०२४-२०२५ वर्षात घेण्यात निफाड (जि. नाशिक) येथे घेण्यात आलेली निरीक्षणे,
१३ जुलै, २०२४ रोजी सदर प्रकार असलेल्या काड्या द्राक्ष बागेत आढळून आल्या. त्या ठिकाणी मार्किंग करून ठेवण्यात आले. त्यावर कोणतीही रासायनिक उपाययोजना करण्यात आली नाही.
६ सप्टेंबर २०२४ रोजी दुसऱ्यांदा निरीक्षण केले असता, कोणतीही उपाययोजना न करता संपूर्ण काडी राखाडी झालेली आढळून आली.
२९ ऑक्टोबर २०२४ रोजी त्याच काड्यांचे निरीक्षण केल्यानंतर ऑक्टोबर छाटणीनंतर या काड्यावर चांगल्या प्रकारे घड निर्मिती होऊन घड तयार झाल्याचे आढळून आले.
निष्कर्ष
एप्रिल छाटणीनंतर आढळलेला प्रकार हा जर रोग असता तर,
काडी ऑक्टोबर छाटणीपर्यंत पूर्णपणे जळून गेली असती.
ऑक्टोबर छाटणीपर्यंत अशा काड्या पूर्ण राखाडी झाल्या नसत्या.
ऑक्टोबर छाटणीनंतर त्यावर घड निर्मिती झाली नसती. अर्थातच घडाची चांगली वाढ झालेली दिसून आली नसती.
सारांश
वरील निष्कर्षांवरून असे दिसून आले की, एप्रिल छाटणीनंतर दिसणारी काडी अर्धी राखाडी होणे (काडीवर रिंग तयार होणे) हा कोणताही रोग नसून ती शरीरशास्त्रीय समस्या आहे. त्यामुळे त्यावर कुठल्याही बुरशीनाशकांचा वापर करू नये.
- राहुल वडघुले, ९८८११३५१४०, (लेखक कृषी रसायन क्षेत्रातील कंपनीमध्ये तांत्रिक अधिकारी आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.