
बोर्डो मिश्रणाचा इतिहास
मोठ्या प्रमाणात वापरले गेलेले जगातील पहिले बुरशीनाशक म्हणून बोर्डो मिश्रण ओळखले जाते. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात (१८८१ मध्ये) फ्रान्समध्ये बोर्डो मिश्रणाचा शोध लागला. द्राक्ष पिकावर प्रादुर्भाव करणारा ॲफीड वर्गातील फैलोक्सझेरा नावाचा कrटक फ्रान्समध्ये जास्त नव्हता. मात्र त्याच्या प्रादुर्भावाने १८५० पासूनच मेक्सिको आणि उत्तर अमेरिकेच्या दक्षिण भागात धुमाकूळ घातला होता.
या किडीच्या नियंत्रणासाठी स्थानिकरrत्या उपलब्ध जंगली द्राक्षांचा रूट-स्टॉक म्हणून वापर सुरू झाला होता. हाच रूट स्टॉक फ्रान्समध्ये बोटीद्वारे नेण्यात आला. आता वाफेच्या इंजिनावर चालणाऱ्या बोटींचा वापर सुरू झाल्याने अमेरिका ते फ्रान्स प्रवासाचा वेळ कमी झाला होता.
त्याचमुळे कदाचित रूट-स्टॉकबरोबर फैलोक्सझेरा कीडही फ्रान्समध्ये जिवंत पोuaचली. १८६३ पर्यंत फ्रान्समध्ये त्याचा उद्रेक होऊन बऱ्याच द्राक्ष बागा नष्ट झाल्या. म्हणूनच फ्रान्समध्ये रूट-स्टॉकचा वापर वाढला आणि फैलोक्सझेरा नियंत्रणात आला. याच रूट-स्टॉक बरोबर अमेरिकेतून केवडा रोगाची (Downy Mildew) बुरशी फ्रान्समध्ये आली.
अमेरिकेमध्ये फारसा नुकसानकारक नसलेल्या केवडा रोगाने फ्रान्समधील अनुकूल हवामानात मात्र रौद्र रूप धारण केले. त्याच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशके माहीतच नव्हती. काही वर्षातच केवडा रोगामुळे फ्रान्सच्या वाइन उद्योगाला अवकळा आली. बुरशीनाशक उपलब्ध नसताना केवडा काय धुमाकूळ घालू शकतो, हे आपल्या महाराष्ट्रातील द्राक्ष बागायतदारांना नक्कीच माहीत आहे.
फ्रान्स येथील बोर्डो विद्यापीठातील वनस्पतिशास्त्राचे प्राध्यापक पी.एम.ए. मिलरडेट (P M A Millardet) केवडा प्रादुर्भाव असलेल्या द्राक्ष बागांची पाहणी करत होते. त्यांचे लक्ष रस्त्याच्या बाजूला असलेल्या काही द्राक्षाच्या वेलींकडे गेले. या वेलींवर केवडा अजिबात नव्हता. त्यावर कसलेतरी निळ्या रंगाचे रसायने शिंपडलेले दिसत होते.
त्याविषयी त्या बागायतदाराकडे चौकशी केली असता रस्त्यावरून जाणारे येणारे द्राक्ष काढून खातात, त्याला अटकाव व्हावा म्हणून रंगीत, कडू आणि विषारी असे कॉपर सल्फेट व चुना मिसळून शिंपडल्याचे त्यांनी सांगितले. प्रो. मिलरडेच यांच्या डोक्यात चक्रे सुरू झाली. त्यांनी अर्नेस्ट डेव्हिड या तांत्रिक संचालकाला बरोबर घेत.
विद्यापीठाच्या जवळच असलेल्या डौझॅक कुटुंबीयांच्या द्राक्षबागेत प्रयोग सुरू केले. या प्रयोगामधून १८७८ मध्ये बोर्डो मिश्रणाचा शोध लागला. प्रो. मिलरडेट यांनी बोर्डो मिश्रणाचे वेगवेगळे फॉर्म्युले तपासले. यापैकी फवारणीसाठी जास्त वापरात आले ते १ टक्के (कॉपर सल्फेट १ किलो : चुन्याचे द्रावण १ किलो : पाणी १०० लिटर ) हा फॉर्म्युला. द्राक्ष वेली किंवा झाडांचे बुंधे रंगविण्यासाठी १०% बोर्डो मिश्रण वापरले जाते.
बोर्डो मिश्रणाचा शोध लागल्यानंतर केवड्याच्या नियंत्रणासाठी संपूर्ण युरोपमध्ये भरपूर वापर झाला. त्यामुळे संपूर्ण वाइन इंडस्ट्री वाचली असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. इतिहासात कुप्रसिद्ध असलेल्या आयरिश दुष्काळात स्थानिकांचे मुख्य अन्न असलेल्या बटाटा पिकाचेही लेट ब्लाईट या बुरशीजन्य रोगामुळे मोठे नुकसान होत होते.
या रोगापासून पिकाचा बचाव करण्यासाठीही बोर्डो मिश्रण वापरले गेले. याच काळात झालेल्या बोर्डो मिश्रण वापराच्या अतिरेकाचे कालांतराने वाईट परिणाम दिसू लागले. सगळ्यात जास्त वाईट परिणाम मातीवर झाले कारण फवारलेले बोर्डो मिश्रण शेवटी मातीतच जाणार. मातीतील सूक्ष्म जिवाणू , गांडूळ इ. कमी झाल्याने माती हळूहळू मृत झाली.
झाडेही मातीतून कॉपर शोषू लागल्याने झाडांवरही दुष्परिणाम दिसू लागले. काही ठिकाणी शेतकऱ्यांना वरच्या थरातील संपूर्ण माती बदलावी लागल्याचीही नोंदी आहेत. त्यावेळी तर दुसरे बुरशीनाशकच उपलब्ध नव्हते. मात्र आज अनेक बुरशीनाशके उपलब्ध असतानाही द्राक्ष बागायतदार विशेषतः खरड छाटणीनंतर बोर्डो मिश्रणाचा भरपूर उपयोग करतात.
कारण बोर्डो मिश्रण हे पावसाच्या दिवसात चांगले काम करणारे, तुलनेने स्वस्त आणि मस्त असे एकमेव बुरशीनाशक आहे. पावसाळ्यात याचा उपयोगही योग्यच आहे. मात्र त्याचा अतिरेक होऊन बोर्डो मिश्रणाचे वाईट परिणाम आपल्या वाट्यास येऊ नयेत, या पुढील मुद्द्यावर काम करणे अत्यावश्यक आहे.
बोर्डो असे काम करते?
कॉपर सल्फेट हे बुरशी व जिवाणूंचा नाश करते. ते अॅसिडिक असल्यामुळे द्राक्षासाठी हानिकारक (टॉक्सिक) ठरू शकते. मात्र चुन्यामध्ये मिसळल्यानंतर ते उदासीन (न्यूट्रल) होते. त्यामध्ये चुना थोडा जास्त टाकल्यास त्याचा क्युपरिक हायड्रॉक्साईड हे गुंतागुंतीचे संयुग बनतो. हा अल्कधर्मीय असून, द्राक्षवेलींवर फवारल्यास टॉक्सिक नाही.
हा पदार्थ पानांवर फवारणी केल्यानंतर पाणी सुकल्यानंतर पानांना चिकटून बसतो. त्यानंतर येणाऱ्या पावसानेही धुवून जात नाही. पानावर पाणी पडल्यानंतर त्यातून Cu+२ हे आयन्स हळूहळू बाहेर पडतात आणि बुरशी, जिवाणूंचा नाश करतात. म्हणूनच अल्कधर्मीय बोर्डो मिश्रण पाऊस व रोग येण्याआधी फवारणे फायद्याचे आहे.
आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर टाळण्याची रणनीती
खरड छाटणीनंतरच्या रोगनियंत्रणाच्या रणनीतीमध्ये आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर संपूर्णपणे टाळणे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण वापरल्या जाणाऱ्या आंतरप्रवाही बुरशीनाशकांच्या विरुद्ध रोगाच्या बुरशीमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होण्याचा धोका असतो. बागेमध्ये केवडा बुरशी कार्यरत असताना त्याचे लक्षावधी बीजाणू बागेत असतात. निसर्गाच्या नियमाप्रमाणे यापैकी एक किंवा दोन बीजाणूमध्ये वापरलेल्या बुरशीनाशकास स्वभावतः प्रतिकार करण्याची शक्ती असते.
सर्वसाधारणपणे या एक किंवा दोन बीजाणूंना बागेत रोगाचा प्रादुर्भाव करण्याची संधी मिळेलच याची शक्यता कमी असते. पण जेव्हा बुरशीनाशकाच्या वापरानंतर प्रतिकारशक्ती नसलेले लाखो बीजाणू मरतात. मात्र प्रतिकारशक्ती असलेल्या एक दोघांना प्राधान्य मिळते. सुरुवातीला एक दोनच डाग दिसतील, पण त्या डागातून हजारो लाखो बीजाणू तयार होतील. आता हे बीजाणू बुरशीनाशकाला न जुमानणारे असतील. त्यामुळे रोगाच्या प्रादुर्भावात वाढ होईल. या परिस्थितीत पूर्वी प्रभावी असणारे बुरशीनाशक आता काम करणार नाही.
हे लक्षात येऊन दुसरे बुरशीनाशक फवारण्याआधीच बागेचे बरेच नुकसान झालेले असते. या क्रियेला इंग्रजीमध्ये `सिलेक्शन प्रेशर` तयार होणे म्हणतात. नियमाप्रमाणे जेवढे जास्त प्रभावी बुरशीनाशक, त्याच्या विरोधात तेवढेच जोरदार सिलेक्शन प्रेशर तयार होते. मागील हंगामात असे प्रतिकार शक्ती असलेले बीजाणू बागेत असतील तर त्यांचा नाश करण्याची संधी खरडछाटणीनंतर असते.
त्याचा फायदा घेतला पाहिजे. आंतरप्रवाही नसलेल्या बुरशीनाशकांच्या विरुद्ध सिलेक्शन प्रेशर बनत नाही. ही आंतरप्रवाही नसलेली बुरशीनाशके आंतरप्रवाही बुरशीनाशकांना प्रतिकारशक्ती निर्माण झालेल्या व न झालेल्या दोन्ही प्रकारच्या बीजाणूंना एकाच पद्धतीने मारून टाकतात.
बोर्डो मिश्रण हे एक बऱ्याच रोगाच्या बुरशांना प्रभावीपणे मारणारे व आंतरप्रवाही नसलेले बुरशीनाशक आहे. त्यामुळे ते नक्कीच उपयुक्त आहे. फळाच्या छाटणीनंतर आंतरप्रवाही बुरशीनाशके वाढत्या फुटीवर आंतरप्रवाही होऊन प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी वापरली जातात. यावेळी त्यांना प्रतिकार करणारी रोगाची बुरशी बागेत नसावी म्हणून खरड छाटणीनंतर आंतरप्रवाही बुरशीनाशक फळाच्या छाटणीपर्यंत वापरायचे नाही हे सुचविले जाते.
बोर्डोचे कार्य आणि वापर पद्धती :
बोर्डो मिश्रण पानांवर फवारल्यानंतर त्यातील कॉपर पाने शोषून घेतात. सर्व साधारणपणे कोवळी आणि वाढती पाने फवारलेली रसायने जास्त शोषून घेतात. असा विचार केल्यास वाढत्या व कोवळ्या फुटीवर बोर्डो मिश्रण फवारल्यास त्यातील पाने कॉपर जास्त शोषून घेतील. अशी पाने करपलेली दिसतात. करपलेली पाने दिसली तर ती `टॉक्सिसिटी` असल्याचा समज करून घेणे चुकीचे आहे.
नवीन फुटी जोमाने न वाढणे, पाने छोटी राहणे हा सुद्धा पानांनी कॉपर शोषून घेतल्याचे परिणाम आहेत. याहूनही महत्त्वाचे म्हणजे छाटणीनंतर ४५ ते ६५ दिवसांपर्यंत डोळ्यांमध्ये सुप्त घड तयार होत असतो. कॉपरच्या शोषणामुळे हा घड छोटा किंवा गोळीघडसुद्धा होऊ शकतो.
म्हणूनच खरड छाटणीनंतर काडीवरील १० ते १२ पाने चांगली जून होऊन त्यावर काळोखी येईपर्यंत बोर्डो मिश्रणाची फवारणी शक्यतो टाळावी. अगदी जरूर पडलीच तर मॅंकोझेब, झायरम यासारख्या बुरशीनाशकाचा वापर करावा. यावेळी अपवाद म्हणून स्ट्रॉब्युलरीन (strabularin) जातीतील आंतरप्रवाही बुरशीनाशकाची एखादी फवारणी घेऊ शकता. या फवारणीने नवीन फुटीची वाढ जोमाने होते. पानांचा आकार व सुप्त घड मोठे बनतात.
ज्या ठिकाणी नवीन बाग लावण्यासाठी रूट-स्टॉक लावला असेल तर तेथे पावसाच्या दिवसात बोर्डो मिश्रण फवारणे विसरू नये. रूट-स्टॉकवर या दिवसातच तांबेरा वाढून मोठ्या प्रमाणात पानगळ होते. असे पान गळ झालेले रूट-स्टॉक कमजोर राहतात. म्हणूनच रूट-स्टॉकवरील तांबेरा नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रणाची फवारणी हा सर्वात चांगला उपाय आहे.
जैविक नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा सारखी बुरशी किंवा बॅसिलस सारख्या जिवाणूंचा वापर केला जातो. हे दोन्हीही पावसाळ्यात वातावरणात जास्त आर्द्रता असताना चांगले काम करतात. मात्र पावसाच्या दिवसात आपण बोर्डो मिश्रणाचा वापरही करतो. बोर्डो मिश्रणाची फवारणी केलेल्या बागेत जैविक नियंत्रण बिलकूल काम करणार नाही.
कारण बोर्डो मिश्रण बुरशी व जिवाणू दोघांनाही मारून टाकते. याचमुळे बागेच्या जवळपास वाढणारी तणे मला जैविक नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची वाटतात. पावसाळ्यात बागेच्या जवळपासच्या खाली जमिनीवर भरपूर तणे वाढतात. त्यातील काही मोठ्या पानांची तणे व छोटी मोठी झाडेही भुरी रोगामुळे पांढरी झालेली असतात. (उदा. लांडगा - शा. नाव ः झान्तिअम स्ट्रूमॅरिअम, Xantium strumarium). या सर्व पानांवर वाढणाऱ्या भुरीचा उपयोग जैविक नियंत्रणाच्या बुरशी किंवा जिवाणू बागेच्या परिसरात वाढविण्यासाठी आपण करू शकतो.
आता काहींना ही भुरी आपल्या द्राक्षावर तर येणार नाही ना, ही शंका येईल. पण एक बाब लक्षात घ्या. भुरीची बुरशी ही यजमान विशिष्ट ( HOST SPECIFIC) आहे . म्हणजेच एका विशिष्ट झाडावर वाढणारी भूरी त्याच झाडावर किंवा त्या झाडाच्या कुटुंबातील दुसऱ्या प्रजातींवर येते. म्हणजे द्राक्षावर वाढणारी भुरी सर्वसाधारण तणांवर येणार नाही आणि तणांवर वाढणारी भुरी द्राक्षावर येणार नाही. आपल्या भागात जंगली द्राक्षे ही तण म्हणून वाढत नाहीत. ती असतील तर त्यावरील भुरी आपल्या द्राक्ष पिकावर आली असती.
द्राक्षाच्या भुरीवर वाढणारा ट्रायकोडर्मा हा मात्र तणांच्या भुरीवर वाढतो. तिथे वाढून त्याचे बीजाणू हवेद्वारे आजूबाजूला नक्की पसरू शकतात. त्यामुळे आपल्या बागेत ज्या बाजूने हवा येते, त्या बाजूच्या तणावर भुरी दिसल्यास त्यावर ट्रायकोडर्माची नक्की फवारणी घेत राहावे. तिथे ट्रायकोडर्मा चांगल्या प्रकारे वाढून त्याचे बीजाणू बागेतील भुरी नियंत्रणास नक्कीच मदत करतील.
हा तणांवर नैसर्गिकरीत्या वाढलेला ट्रायकोडक्मा पावडर किंवा द्रावण फॉर्म्युलेशनमधील ट्रायकोडर्मापेक्षा कधीही जास्त ताकदवान असतो. त्यामुळे कमी बीजाणूंमध्येही त्याचा प्रभाव अधिक असू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे द्राक्ष बागेप्रमाणे आपण तणांवर बुरशीनाशकांच्या फवारण्या केलेल्या नसतील.
त्यामुळे त्यावर भुरीही लवकर येईल आणि अशा ठिकाणी भुरी व त्यावर ट्रायकोडर्मा वाढवणे ही रणनीती नक्कीच प्रभावी ठरेल असे वाटते. तणांवर लवकर दिसणारी भुरी आपल्यासाठी बागेच्या संरक्षणाचा इशाराच समजायला हरकत नाही. हा इशारा समजून फवारण्यांचे धोरण ठरवता येईल.
बोर्डो मिश्रण फवारलेल्या बागेत फळांच्या छाटणीआधी कमीतकमी ३० दिवस पुन्हा बोर्डो मिश्रण फवारणे टाळावे. सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये परतीच्या मॉन्सूनचा पाऊस होतो. यावेळी शेंड्याला नवीन फुटी येतात. सर्वसाधारणपणे याच फुटींवर सर्व रोग येतात. बोर्डो मिश्रणाचे अवशेष बागेत सर्व पानांवर असतात, त्यामुळे बागेत जैविक नियंत्रण कार्यरत राहणार नाही.
पण नव्याने आलेल्या फुटीवर बोर्डोचे अवशेष नसल्यामुळे या नवीन फुटींवर केलेली जैविक नियंत्रकांची फवारणी उत्तम काम करू शकेल. अशावेळी बागेत फळाच्या छाटणीपर्यंत बुरशीनाशकाच्या फवारण्या केलेल्या नसल्या तर बागेमध्ये फळाच्या छाटणीपर्यंत जैविक नियंत्रणाच्या बुरश्या चांगल्या प्रमाणात वाढतील. त्याचा फायदा फळाच्या छाटणीनंतर अनुभवता येईल.
कितीही ताकदवान असलेल्या एखाद्या बुरशीनाशकाचे परिणाम प्रतिकूल स्थितीमध्ये मिळतीलच याची काही शाश्वती नसते. मात्र या लेखामधील रणनीती व `थेंबे थेंबे तळे साचे` या प्रमाणे केलेल्या कामांचे नक्कीच चांगले परिणाम मिळतील, असे वाटते.
- डॉ. एस. डी. सावंत, ९३७१००८६४९
(लेखक राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे माजी संचालक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.