
Mango Orchard Management : आंबा बागेमध्ये दर्जेदार व अधिक उत्पादन मिळण्यासाठी झाडांना चांगला आणि नियमित मोहर येणे गरजेचे असते. आंबा वाणांच्या प्रकारानुसार मोहोर येण्याबाबतीत अनेक प्रकारच्या समस्या दिसून येतात. काही वाणांना एक वर्षाआड फळधारणा होते. उदा.दशहेरी, लंगडा इ. तर काही वाणांना अनियमित फळधारणा होते.
उदा. हापूस या वाणात अतिशय अनियमित फळधारणा होत असल्याचे दिसते. मात्र काही वाण अतिशय नियमित फळधारणा देणारे आहेत. उदा. दक्षिणेतील नीलम, तोतापुरी आणि अलीकडे निघालेले रत्ना, सिंधू, आम्रपाली, मल्लिका, सोनपरी यासारखे संकरित वाण.
मात्र महाराष्ट्रामध्ये कोकण वगळता सर्वत्र व अधिक प्रमाणात लागवडीखाली असलेला केसर ही वाण दरवर्षी नियमित फळधारणा देतो. मात्र त्याचे प्रमाण एका वर्षी जास्त, तर दुसऱ्या वर्षी कमी असे थोडेसे अनियमित असते. त्यामुळे नियमित व भरपूर फळधारणा होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असते. त्यासाठी आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया बारकाईने समजून घेऊ.
आंबा मोहर प्रक्रिया
आंब्यामधील मोहर निर्मिती प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची असते. सर्वसाधारणपणे बागायतदार मोहोर आल्यापासून बागेची काळजी घेतात. पण मोहोर व्यवस्थित येण्यासाठी त्या आधी किमान तीन ते साडेतीन महिने आधी काडीने पक्वता गाठलेली असावी लागते.
काडीची पक्वता कशाला म्हणतात?
काडीमध्ये नत्राच्या प्रमाणात कर्बोदकांचे (कार्बोहायड्रेट) प्रमाण अधिक असावे. तसेच एक संजीवक ‘फ्लोरीजीन’चे प्रमाण काडीत भरपूर असावे लागते.
काडी पक्वतेसाठी किती वेळ लागतो?
पालवी आल्यानंतर आंब्याच्या झाडावरील काडीच्या पक्वतेचा लागणारा कालावधी वाणनिहाय वेगवेगळा असतो. उदा. हापूस वाणामध्ये नवीन पालवी (नवती) आल्यानंतर मोहर येण्यासाठी सात ते आठ महिने लागतात, तर केसर वाणामध्ये नवीन काडीला सुमारे तीन ते साडेतीन महिन्यांत पक्वता येते. नीलम, तोतापुरी यांसारख्या वाणांमध्ये मात्र नवीन आलेल्या काडीवरही मोहर येऊ शकतो.
मोहर लवकर येण्याचे फायदे
आपण केसर वाणाबाबत चर्चा करत आहोत. आपल्या केसर आंबा बागेत लवकर म्हणजे नोव्हेंबरमध्ये मोहोर आल्यास एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात फळ काढणी सुरू होऊ शकते. गेल्या काही वर्षांच्या अनुभवावरून या एप्रिलच्या सुरुवातीस येणाऱ्या आंब्यांना १७५ ते २०० रुपये प्रति किलो दर मिळतो.
तो दुसऱ्या आठवड्यात दीडशेपर्यंत घसरतो आणि एप्रिल अखेरीस १०० रुपये होतो. तो कमी होत २० मे पर्यंत ७० रुपये आणि मे च्या शेवटी अगदी ३० ते ३५ रुपये प्रति किलोपर्यंत खाली येतो. त्यामुळे मोहर लवकरात लवकर (दहा ते पंधरा नोव्हेंबर) येऊन एप्रिलच्या सुरुवातीला फळे आणणे फायदेशीर ठरू शकते. त्यासाठी करावयाच्या व्यवस्थापनाची माहिती घेऊ.
छाटणी ः
फळांच्या काढणीनंतर लगेच पंधरा ते वीस मे ला छाटणी घ्यावी. या वर्षी बहुतेक शेतकऱ्यांनी छाटणी घेतलेली आहे. छाटणी घेतलेल्या शेतकऱ्यांना बागेत १२ ते १५ जूनपर्यंत छान पालवीसुद्धा आलेली आहे. आता ही पालवी लवकर पक्व करण्यासाठी ०:५२:३४ हे खत सात ग्रॅम प्रति लिटर आणि ०:०:५० सात ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे दोन फवारण्या घ्याव्यात.
हमखास मोहरासाठी व्यवस्थापन
आंबा झाडास मोहर येण्यासाठी त्याचा जोमदारपणा तात्पुरता कमी करावा लागतो. कारण झाडांमध्ये जिबरेलिन्स (जीए) या संप्रेरकांचे प्रमाण जास्त असल्यास झाड पालवीकडे जाते. या संप्रेरकाचे प्रमाण कमी केल्यास ते झाड आपोआप नवीन मोहराकडे जाते. त्यामुळे पॅक्लोब्युट्राझोल या वाढनियंत्रकाचा वापर करण्याची गरज भासते. हा वापर योग्यपणे केल्यास आंब्याला हमखास व भरपूर मोहर येतो, हे अनेक प्रयोगात दिसले आहे.
गेल्या काही वर्षांपासून कोकणाव्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये अतिघन आंबा लागवड वाढत आहे. यातील अनेक शेतकरी बागेत तिसऱ्या वर्षीपासूनच पॅक्लोब्युट्राझोलचा वापर करू लागल्याचे चित्र दिसते. पॅक्लोब्युट्राझोल हे वाढनियंत्रक झाडांतर्गत तयार होणाऱ्या जिबरेलिन्सच्या निर्मितीला तात्पुरता अडथळा निर्माण करते.
त्यामुळे झाडाच्या जोमदार वाढीला अडथळा निर्माण होतो आणि काडी ही पुनरुत्पादनाकडे वळते. वाढ नियंत्रक न दिलेल्या झाडाच्या तुलनेत वाढनियंत्रक दिलेल्या झाडांना ८२ ते ८५ टक्के अधिक मोहर येतो आणि आंबा उत्पादनात २.६० ते २.८६ पटीने वाढ प्रयोगात दिसली आहे.
वाढ नियंत्रक वापरलेल्या बागेची मशागत :
वाढ नियंत्रकाचा वापर केलेल्या बागेत मोहोर लवकर व अधिक प्रमाणात येतो. तो चांगला पोसण्यासाठी बागेला नियमित सिंचन आणि शिफारशीपेक्षा सव्वा ते दीड पट अधिक खतमात्रा देणे आवश्यक असते. आलेला मोहर, फुले आणि फळांच्या संरक्षणासाठी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे कीडनाशकांच्या फवारणीचे नियोजन करावे.
झाडावरील फळे काढण्याच्या सहा ते आठ महिने आधी झाडाला जमिनीतून वाढ नियंत्रक दिलेले असते, त्यामुळे फळे काढण्याच्या वेळेपर्यंत त्याचा झाडांतर्गत अंश अत्यल्प राहिल्याचे दिसते. जागतिक संघटनेने ठरवून दिलेल्या ०.०५ मिलिग्रॅम प्रति किलो पातळीपेक्षा कितीतरी कमी म्हणजे ०.०१ ते ०.०३ मिलिग्रॅम प्रति किलो अंश शिल्लक राहू शकतात. त्यामुळे निर्यातीसह खाण्यासाठीही ते धोकादायक नसते. अशा प्रकारे वाढनियंत्रकांचा वापर करून आपण नियमित, अधिक आणि दर्जेदार उत्पादन घेऊ शकतो.
वाढ नियंत्रक वापरण्याची पद्धत
अतिघन पद्धतीने लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी पॅक्लोब्युट्राझोलचा वापर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शिकून घेऊन शिफारशीप्रमाणेच केला पाहिजे. योग्य वेळी, योग्य मात्रेमध्ये आणि योग्य पद्धतीने दिलेल्या वाढनियंत्रकांचा उत्तम परिणाम मिळू शकतो. झाडाचा जीवनकालावधी, त्यांची उत्पादकता आणि फळांची प्रतीवर प्रतिकूल परिणाम होणार नाही.
योग्य वेळ : आंबा बागेमध्ये पॅक्लोब्युट्राझोल झाडांना वर्षातून एकदा म्हणजेच जुलैअखेर ते ऑगस्ट पर्यंत देता येते. जुलैच्या शेवटपर्यंत पाऊस बरा झाला आणि उन्हाळ्यातील बागेला देण्यासाठी पाण्याची व्यवस्था झाली तर वीस ते पंचवीस जुलैलाच त्याचा वापर करावा. या वर्षी असा पाऊस बहुतांश ठिकाणी झालेला आहे.
मात्र आपल्या भागामध्ये पुरेसा पाऊस झालेला नसल्यास आणि उन्हाळ्यात पाणी देण्याची व्यवस्था होऊ शकत नसल्यास ऑगस्ट अखेरपर्यंत चांगल्या पावसाची प्रतीक्षा करावी. त्यानंतर बागेसाठी सिंचन पुरवू शकू, याची खात्री झाल्यानंतरच ऑगस्ट अखेरपर्यंत पॅक्लोब्युट्राझोलचा वापर करता येईल. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये संपूर्ण मोहर बाहेर येऊ शकतो. मात्र वाढ नियंत्रक दिलेल्या बागेस उन्हाळ्यात पाणी कमी पडल्यास झाडांना ताण (शॉक) बसून झाडांच्या फांद्या वाळणे किंवा पूर्ण झाड वाळणे असे प्रकार होऊ शकतात, हे लक्षात ठेवावे.
योग्य मात्रा : सुरुवातीला बाजारात आलेल्या काही उत्पादनामध्ये पॅक्लोब्युट्राझोल या मूळ रसायनाचे प्रमाण २३ टक्के होते. मात्र अलीकडे बाजारामध्ये विविध कंपन्यांचे हेच वाढ नियंत्रक कमी अधिक तीव्रतेचे उपलब्ध आहे. आपण खाली दिलेली मात्रा ही पॅक्लोब्युट्राझोल (२३ टक्के) या तीव्रतेनुसार देत आहे.
झाडाचा विस्तार किंवा व्यास मीटरमध्ये मोजून घ्यावा. त्यासाठी उत्तर- दक्षिण आणि पूर्व - पश्चिम व्यास मोजावा, त्याची सरासरी काढावी. प्रत्येक रनिंग मीटरला तीन मि.लि. या प्रमाणात पॅक्लोब्युट्राझोल द्यायचे, हे साधे गणिती सूत्र लक्षात ठेवावे. उदा. दक्षिण उत्तर व्यास दोन मीटर आणि पूर्व पश्चिम व्यास हा तीन मीटर असल्यास त्याची सरासरी २ अधिक ३ भागिले २ म्हणजेच अडीच मीटर येते. अडीच मीटर व्यासासाठी प्रति रनिंग मीटर तीन मिली या सूत्राप्रमाणे साडेसात मि.लि. पॅक्लोब्युट्राझोल द्यावे लागेल.
यापेक्षा कमी दिल्यास अपेक्षित परिणाम मिळत नाही. मात्र एखाद्या झाडास प्रमाणापेक्षा जास्त दिले गेल्यास नवीन पालवी गुच्छामध्ये, आखूड येते. झाडाच्या फांद्यातून तसेच काही ठिकाणी अगदी खोडातूनही मोहोर येतो. मात्र अशी लक्षणे दिसल्यास दुसऱ्या वर्षी त्या झाडास वाढनियंत्रक देऊ नये किंवा अर्धी मात्रा द्यावी.
देण्याची पद्धत : बागेतील तणांचा बंदोबस्त केल्याची खात्री करावी. एकदा झाडाच्या विस्तारानुसार मात्रा निश्चित करावी. आंबा झाडाच्या बुंध्याभोवती खते देण्यासाठी सामान्यतः एक आळे केलेले असते. त्याचा आत साधारणपणे एक फुटावर दुसरे एक वर्तुळ करावे. त्या वर्तुळाच्या परिघावर साधारणपणे २५ ते ३० सेंटिमीटर अंतरावर कुदळीने बारा पंधरा सेंटिमीटर खोलीचे लहान लहान खड्डे खोदावेत.
आपण उदाहरणामध्ये निश्चित केलेली मात्रा साडेसात मि.लि. आहे. ती तीन लिटर पाण्यात मिसळून द्रावण करावे. हे द्रावण आपण खोदलेल्या छोट्या खड्ड्यामध्ये समप्रमाणात ओतावे. खड्डे लगेच ओंजळभर शेणखताने बुजवून घ्यावेत. किंवा खोडाभोवती वीतभर अंतरावर लहान आळे करून द्रावण ओतल्यास हे झाडास योग्य प्रकारे मिळू शकते.
साधारणपणे जुलै, ऑगस्ट या पावसाळी महिन्यांत वाढ नियंत्रक वापरण्याची शिफारस असली तरी पावसामुळे वापरलेले रसायन वाहून जाणार नाही, हे पाहावे. द्रावण देतेवेळी बाग वाफशात असावी. आंब्याची घन किंवा अतिघन लागवड केलेली असल्यास आणि चांगली जोमदार वाढ झालेल्या झाडांच्या वयाच्या चौथ्या वर्षी विस्ताराप्रमाणे वाढ नियंत्रकाचा वापर करता येईल. मात्र वाढ चांगली झालेली नसल्यास वाढ नियंत्रक देणे टाळावे.
- डॉ. भगवानराव कापसे, ९४२२२९३४१९ लेखक निवृत्त फळबाग शास्त्रज्ञ आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.