Team Agrowon
बागेतील खराब, डाग पडलेली फळे, आकाराने लहान किंवा वेडीवाकडी फळे आताच काढून टाकावीत. गुच्छामध्ये चार - पाच फळे आलेली असल्यास त्यातील चांगली दोन किंवा फार तर तीनच फळे ठेवावीत.
फळाच्या बाजूला मोहराचा फळधारणा न झालेला दांडा कैचीने अलगद कापून टाकावा. पुढे तेच शेजारच्या फळांना घासून फळांवर डाग पडतात.
काही प्रमाणात फळमाशीचा प्रादुर्भाव जाणवू शकतो. तो टाळण्यासाठी फळ काढणीच्या ४५ दिवस आधी पुढील उपाययोजनांवर भर द्यावा.
दर आठवड्याला गळून पडलेली प्रादुर्भावग्रस्त फळे गोळा करून नष्ट करावीत. मिथाईल युजेनॉलचे सहा संरक्षक सापळे प्रति एकरी लावावेत.
फळकाढणीच्या तीन आठवडे आधी डेल्टामेथ्रीन अर्धा मिलि अधिक ॲझाडिरेक्टीन (१० हजार पीपीएम) दोन मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
प्रति रक्षक सापळा पाचपेक्षा अधिक फळमाश्या आढळल्यास डेल्टामेथ्रीन दोन मिलि अधिक गूळ ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात चांगल्या प्रकारे मिसळून विषारी आमिष म्हणून बागेमध्ये फवारणी करावी. (ॲग्रेस्को शिफारस).
अतिघन लागवडीच्या बागेत फळांना हाताने बॅगिंग करणे शक्य होते. बॅगिंग करताना तारखेच्या खुणा करून ठेवल्यास काढणीच्या वेळी एकाच पक्वतेची फळे समजून येतात. एकाच पक्वतेच्या फळांची काढणी सोपी होते.