Book Review : चिरंतन वेदनेचा दस्तावेज – ‘झळ’

विदर्भातल्या कोरडवाहू शेतक-यांच्या प्रश्नांना हात घालणारी आणि कुठेही कृतक न वाटणारी ही कादंबरी आहे. मुख्य म्हणजे कृषिव्यवस्थेतल्या गंभीर दुखण्यांबद्दल बोलताना 'झळ' कुठेही भावनावश होत नाही.
Book Review
Book ReviewAgrowon
Published on
Updated on

-बालाजी सुतार

सुभाष किन्होळकर (Shubhash Kinohalkar) यांची 'झळ' ही कादंबरी (Novel) मागच्या आठवड्यात वाचली. वर्षभरापूर्वी हातात आलेली ही कादंबरी वाचणं आजवर राहून गेलं होतं याचा पश्चात्ताप झाला असला तरी उशिरा का होईना एक अस्सल लेखन वाचायला मिळाल्याच्या आनंदही आहे.

विदर्भातल्या कोरडवाहू शेतक-यांच्या प्रश्नांना हात घालणारी आणि कुठेही कृतक न वाटणारी ही कादंबरी आहे. मुख्य म्हणजे कृषिव्यवस्थेतल्या गंभीर दुखण्यांबद्दल बोलताना 'झळ' कुठेही भावनावश होत नाही. लेखकाने खूप तटस्थतेने केलेले हे निवेदन आहे. विश्वनाथ खरात नावाच्या एका अल्पभूधारक शेतक-याच्या उमेदीपासून चालू होणारी ही कादंबरी क्रमाक्रमाने त्याच्या सबंध भोवतालाच्या कहाणीला आपल्यापुढे मांडत कुणबीक हा केवढा जीवघेणा झगडा असतो याची खोलवर कल्पना देत पुढे जात राहते.

शेतीचे एकुणात असलेले प्रश्न, त्यातून अधिक टोकदार असे अल्पभूधारकांचे प्रश्न, शेतमजुरांचे आणखी वेगळे प्रश्न, खाजगी सावकारीचे जबर धोकादायक जहरी पाश, शासनव्यवस्थेने, बाजारव्यवस्थेने करून ठेवलेली कडेकोट कोंडी अशा अनेक पदरांना उलगडत ही कादंबरी क्षणाक्षणाने शेतीशी संबधित असंख्यांच्या आत्मघाताकडे घेऊन जाणा-या प्रवासाला वाचकांसमोर मुखर करते. कष्टांचं आणि जबर जिद्दीचंच अवजार वापरून विश्वनाथ खरात कोरडवाहू वावर कसत असतो. शेती सगळी पावसावर आधारलेली.

पाऊस कधीच वेळेवर न येणारा, आलाच तर शेतक-याच्या सहनशक्तीचा आणि पिकांमधल्या जीवनशक्तीचा कडेलोट झाल्यावर येणारा, मालकीची विहीर असलेल्या कुणाकडून पाणी घ्यावं तर शेतक-यांमध्येही ‘माणूस’ म्हणून असलेल्या हेव्यादाव्यांना, डावपेचांना बळी जावं लागणं, विहिरीसाठी काही सरकारी अनुदान मिळवावं म्हणून प्रयत्न करावेत

Book Review
Abdul Sattar : सत्तार यांना उपमुख्यमंत्र्यांची क्लीन चीट

तर तलाठ्यापासून चालू होऊन स्थानिक पुढारी आणि वरिष्ठ अधिका-यांपर्यंतच्या लोकशाही व्यवस्थेने जन्म घातलेल्या सरंजामशहांकडून केली जाणारी पाशवी लूट; या असल्या झगड्यातून वाट काढत लढत झगडत पुढे जाणारा विश्वनाथ खरात एकेदिवशी धीर सोडून मृत्यूला सामोरा जातो, त्या विषम विवश अपरिहार्य संघर्षातले क्षण, सावकारीच्या कर्जात गळ्यापर्यंत अडकून विहिरीत जीव देऊन मोकळा होणारा पोपट नावाचा शेतकरी किंवा मळणीयंत्रात जाऊन कोपरापर्यंत हात तुटलेला सोनू जाधव नावाचा शेतमजूर किंवा शेतक-यांचा समस्यांचा वापर आपल्या राजकीय स्वार्थासाठी करणारे कथित शेतकरी पुढारी अशा अनेक समांतर कथांना ही कादंबरी कवेत घेते तेव्हा क्षयाने बाधित झालेल्या आपल्या कृषीसंस्कृतीचे विदारक दर्शन वाचकांना घडायला लागते.     

‘झळ’ हा एक अस्वस्थ करणारा वाचनानुभव आहे. औरंगाबादच्या 'साक्षात' प्रकाशनाने प्रकाशित केलेली ही कादंबरी शेतकरी, शेतक-यांच्या नावावर राजकारण करणारे राजकीय पक्ष, नेते आणि शेतीशी आपलं काही नातं आहे, असं मानणारे शहरी सुखवस्तू अशा सगळ्यांनीच मुद्दाम मिळवून वाचावा असा एका चिरंतन वेदनेचा ललित दस्तावेज आहे.

---0---

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com