Solapur News : उन्हाच्या वाढत्या तडाख्याने सोलापूर जिल्ह्यात जनावरांसह पिकांची चांगलीच होरपळ होत असून, आधीच पाणीटंचाईचे संकट ग्रामीण भागावर ओढावले असताना, त्यात आता वाढत्या उन्हाची भर पडली आहे. विशेषतः सांगोल्यातील डाळिंब आणि माळशिरस, करमाळा, माढा भागातील केळी क्लस्टरला या उन्हाचा मोठा तडाखा बसला आहे. या दोन्ही क्लस्टरचे सुमारे ५० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
जिल्ह्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सूर्य आग ओकत असून, तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील तापमान सरासरी ४० अंशांवर आहे. वाढत्या उन्हाने अंगाची लाही लाही होत आहे, नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा अनुभव येत आहे. मागच्या आठवड्यात ३० एप्रिलला सोलापूरचे तापमान सर्वाधिक म्हणजे ४४ अंश सेल्सिअस इतके होते. त्यानंतर ४ एप्रिलला तापमान ४३.७ अंशावर पोहोचले.
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ५ एप्रिलला तापमान तब्बल ४४.४ अंशांवर पोहोचले. या हंगामातील हे रेकॉर्ड ब्रेक तापमान ठरले. या सगळ्यात माणसांची अवस्था बिकट झालीच आहे, पण ग्रामीण भागात जनावरे आणि पिकांची नुसती होरपळ सुरू आहे.
या आधीच यंदा कमी पाऊसमानामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचे सर्व स्रोत आटले आहेत. त्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता वाढत असताना, त्यात आता तीव्र उन्हाची भर पडत आहे. त्याचा फटका भाजीपाला, ऊसासह केळी, डाळिंब या पिकांना बसत आहे.
पिकाचे असे होत आहे नुकसान...
जिल्ह्यातील करमाळा, माढा, माळशिरस या भागातील केळी क्लस्टर या उन्हामुळे धोक्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण ७७१० हेक्टरवर केळी क्षेत्र आहे. त्यातले सर्वाधिक ६० टक्के क्षेत्र करमाळा आणि माळशिरस तालुक्यात विस्तारले आहे. त्यात करमाळ्यात ३१४७ हेक्टर आणि माळशिरसमध्ये २११७ हेक्टर आहे. पण या भागातील केळीच्या वाढीवर परिणाम होत आहे.
पाने करपणे, चरका लागणे अशी लक्षणे केळीत दिसत आहेत. उशिरा लागवड केलेल्या केळी बागेतील घड वाढीच्या अवस्थेत आहेत. पण वाढत्या उन्हामुळे त्याच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. केळीची अन्नद्रव्य घेण्याची क्षमता कमी होत आहे. विशेषतः करमाळा तालुक्यातील केळी क्लस्टरला सर्वाधिक उजनी धरणाच्या पाण्याचा उपयोग होतो, पण धरणही आता उणेपातळीत पोहोचले आहे. त्यामुळे पाणीही मिळत नाही. केळीच्या या क्लस्टरमधील जवळपास ५० टक्के क्षेत्राला उन्हाचा फटका बसला आहे.
द्राक्ष, डाळिंबावरही परिणाम
सांगोला, मंगळवेढा पट्ट्यात डाळिंबाचे सर्वाधिक क्षेत्र आहे. जवळपास ३० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र एकट्या सांगोल्यात आहे. अलीकडच्या काही वर्षांत विविध कीड-रोगाने डाळिंब क्षेत्र घटले असताना, त्यात आता पाणीटंचाई आणि या वाढत्या उन्हानेही पुन्हा एकदा डाळिंब बागांवर नैसर्गिक आपत्तीची कुऱ्हाड कोसळली आहे. उन्हाने डाळिंबाच्या फळावर चट्टे पडत आहेत. फुलकळ्या, फुले गळत आहेत, फळे आणि दाण्याचा रंग फिका पडतो आहे. फळे फुटण्याचे प्रमाणही वाढले आहे.
जिल्ह्यात सुमारे सव्वालाख हेक्टरवर ऊस आहे, पण त्यालाही पाणी कमी पडत आहेच. पण उन्हाने तो वाळून चालला आहे. द्राक्षाचे १५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. सध्या खरड छाटणी झाली आहे. साधारण छाटणीनुसार नव्या फुटीसाठी १२ ते १४ दिवसांचा कालावधी लागतो, पण उन्हामुळे २० दिवसांपेक्षाही अधिक कालावधी लागतो आहे. भाजीपाला पिकांचीही अवस्थाही काही वेगळी नाही. कोथिंबीर, मेथी या भाज्या तर उगवतच नाहीत, तर अन्य फळभाज्यांना पाणी कमी मिळत असल्याने आणि वरुन उन्हाचा तडाखा बसत असल्याने उत्पादनात घट होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.