Evaporation Measures : बाष्पीभवन रोखण्याचे सोपे उपाय

बाष्पीभवनाद्वारे खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असते. ते वाचविण्यासाठी शेतामध्ये काय उपाययोजना करता येईल, याची माहिती या लेखातून घेऊ.
Evaporation Measures
Evaporation MeasuresAgrowon

सतीश खाडे

बाष्पीभवनाद्वारे खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असते. ते वाचविण्यासाठी शेतामध्ये काय उपाययोजना करता येईल, याची माहिती या लेखातून घेऊ.

आच्छादन (मल्चिंग) :

झाडांभोवती मुळांच्या कक्षेमध्ये वाळलेल्या गवत, काडीकचरा यांचा एक थर देणे किंवा प्लॅस्टिक कागदाचे आच्छादन करणे या पद्धती सर्वांना माहिती आहेत. प्लॅस्टिक मल्चिंगमध्ये बाष्पीभवन रोखले जात असले, तरी हवेचे तापमान सरासरीपेक्षा जास्त असल्याच्या स्थितीमध्ये या कागदाखाली मुळाभोवतीचे तापमानही त्या प्रमाणात वाढते.

त्याचा फटका तेथील सूक्ष्मजीवांना बसतो. तसेच मुळांभोवती हवा खेळती राहण्यासही मर्यादा येतात. यामुळे झाडांच्या अन्नद्रव्य शोषण प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे आपल्यासारख्या उष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये सेंद्रिय आच्छादनाला अधिक प्राधान्य दिले पाहिजे. कारण सेंद्रिय आच्छादन हे बाष्पीभवन रोखण्यापलीकडेही अनेक दृष्टीने फायद्याचे ठरते.

१) जर झाडाभोवती गवताचे किंवा सेंद्रिय आच्छादन केले तर त्या खालील तापमान हे बाह्य हवेच्या तुलनेमध्ये तीन ते चार अंशांनी कमी राहते. म्हणजेच हवेचे तापमान ४० अंश सेल्सिअस असेल, तर मल्चिंग करून झाकलेल्या कोरड्या जमिनीचे तापमान हे ३५ ते ३६ अंश इतकेच राहते.

त्यात जर आर्द्रता असेल, तर जमिनीचे तापमान अजून तीन चार अंशाने कमी राहते. आपल्या शेतामध्ये शिल्लक राहणारी धसकटे, सोयाबीन वा अगदी अन्य कोणत्याही पिकाचे काड, साळी किंवा गव्हाचा भुस्सा, उसाचे पाचट, तूर काडी यांचा वापर आच्छादनासाठी करता येतो. (यातील अनेक घटक आपण सामान्यतः कचरा म्हणून जाळून टाकतो.)

हे आच्छादन बाष्पीभवनाचा वेग कमी करतानाच तापमान नियंत्रित करते. परिणामी, जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांना सुद्धा जीवदान मिळते. कारण वाढत्या तापमानामध्ये अनेक जिवाणू व झाडांची नाजूक मुळेही टिकाव धरू शकत नाही.

उपलब्ध खते, पाणी यांचेही शोषण करण्यामध्ये अडथळे येतात. अशा साऱ्या बाबींचा झाडाच्या सर्वच अवयवावर ताण येतो. फुले, फळ गळीपासून ते झाडे वाळण्यापर्यंत विपरीत परिणाम दिसून येतात.

Evaporation Measures
Evaporation : बाष्पीभवन रोखण्यासाठी डिफ्यूजर तंत्र

२) वाळलेले गवत, काडी कचरा कालांतराने कुजून त्याचे खत बनते. त्यामुळे मातीतील कार्बनसह अन्य अन्नद्रव्येही वाढतात. सततच्या आच्छादनामुळे ह्युमस निर्मिती होते. त्यातून जमिनीची आर्द्रता व पोषणमूल्य उच्च प्रतीचे राहते.

३) आच्छादन उन्हाळ्यातच करावे असे काही नाही, उलट तीनही तीनही ऋतूंमध्ये (कायमस्वरूपी) असल्यास त्यातून फायदाच होतो.

४) हवामान बदल आणि उच्च तापमान या स्थितीमध्ये झाडांच्या मुळांच्या संरक्षणासाठी आच्छादन महत्त्वाचे आहे. ते अतिवृष्टी व जोराच्या पावसाच्या वेळी जमिनीची धूपही रोखण्यास मदत करते.

५) आच्छादनामुळे तणांची वाढ थांबते.

६) जमिनीतील सूक्ष्मजीवांना सेंद्रिय कर्ब आणि योग्य तापमान मिळाल्याने त्यांची चांगली वाढ होते.

७) सेंद्रिय आच्छादनाचे खत होऊन झाडांची उत्पादकता वाढते.

८) गवत आणि काडीकचरा भुस्सा पूर्ण शेतात पसरवला तरी फायदेशीर आहे. या तुलनेमध्ये प्लॅस्टिक आच्छादन झाडांच्या खोडाभोवती मर्यादित जागेत करावे. कारण प्लॅस्टिक आच्छादनामुळे मातीत हवा खेळती राहणे अशक्य होते.

९) बाभळेश्‍वर कृषी विज्ञान केंद्राने केलेल्या नोंदीमध्ये परीसरातील शेतकऱ्यांनी डाळिंबामध्ये केलेल्या आच्छादनामुळे उत्पादनात २९ टक्के वाढ झाली आणि हेक्टरी साडेसात लाख लिटर पाणी उन्हाळ्यामध्ये वाचल्याचे स्पष्ट झाले आहे.

शेताला पाणी देण्याची २४ तासांतील योग्य वेळ :

बऱ्याच अभ्यासकांच्या मते, रात्री दोन ते पहाटे पाचपर्यंतची वेळ शेताला पाणी देण्याची आदर्श वेळ आहे. कारण या काळात जमिनीचे तापमान सर्वांत कमी असते. त्यामुळे पाण्याची सर्वांत कमी बाष्पीभवन या काळात होते.

बहुतांश शेतकरी म्हणतील, की हे कसे शक्य आहे? कारण थंडी, पाऊस या सोबतच वन्य प्राणी उदा. बिबट्या, विंचू, साप यांच्या हल्ल्याची शक्यता हे धोके सर्वत्र आहेत. त्यावर मात करण्यासाठी सोलेनॉइड वॉल्व्हसह (म्हणजेच टायमर लावून) ठिबक सिंचन यंत्रणा लावल्यास पहाटेच्या वेळीही पाणी सहज देणे शक्य आहे.

यात संपूर्ण ऑटोमेशन नसल्याने खर्चही फार नाही. आपल्या जिवाचे आणि पाण्याचे मोल लक्षात घेतले तर एकदा करावयाचा हा खर्च फार वाटणार नाही.

तळ्यातील पाणी वाचविण्याचा उपाय

संरक्षित पाण्यासाठी शेततळ्यामध्ये साठवलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होत राहते. हे पाणी वाचविण्यासाठी बाष्पीभवन रोधक रसायनाचा वापर करता येतो. अशा प्रकारे ३५ टक्क्यांपर्यंत पाणी वाचवता येत असल्याचे बाभळेश्‍वर कृषी विज्ञान केंद्राचे निष्कर्ष आहेत.

त्यांनी शेतकऱ्यांच्या दहा गुंठे आकाराच्या सुमारे १०५ शेततळ्यांसाठी २०१५-१६ च्या अवर्षण काळात हा पर्याय वापरला होता. दहा गुंठ्याच्या शेततळ्यासाठी मार्च ते मे या तीन महिन्यांसाठी तीन लिटर रसायन लागते.

एका शेततळ्यातून तीन महिन्यात बाष्पीभवनातून अपव्यय होऊन वाया जाणारे सुमारे चार लाख लिटरपर्यंत पाणी वाचवता येते. केवळ पाणीच वाचले असे नाही, तर त्यावर जगवल्या जाणाऱ्या फळबागाही वाचल्या होत्या.

Evaporation Measures
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची शेती, दुष्काळात पाण्याचे थांबवले बाष्पीभवन 

पाणी बचतीसाठी पॉलिमरचा उपयोग

अवर्षण किंवा पाणी टंचाईच्या काळात झाडाच्या खोडाभोवती पॉलीमरची विशिष्ट भुकटी गोलाकार टाकली जाते. ही भुकटी आपल्या आकारमानाच्या सहाशे पट पाणी शोषून धरून ठेवते. म्हणजेच पावसाचे किंवा सिंचनाचे पाणी तितका दीर्घकाळ पिकांना उपलब्ध होऊ शकते.

एकदा वापरलेली भुकटी चार वर्षे अखंडपणे कार्यरत राहते. पुढे हळूहळू त्याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होत जाते. सुमारे पंधरा वर्षात त्याचे पूर्णपणे विघटन होऊन मातीत मिसळून जाते.

अन्य फायदे

-जमिनीचा कडकपणा कमी होतो व सच्छिद्रता वाढते.

-जमिनीमध्ये ओलसरपणा ठेवते. मातीतील आर्द्रतेचे बाष्पीभवनही रोखले जाते. परिणामी, सिंचनाचे पाणी कमी द्यावे लागते. पाण्याची ५० ते ७० टक्के बचत होते. पाण्याच्या पाळ्या कमी लागतात. पर्यायाने मजूर खते, इतर निविष्ठा या सर्वांचा खर्च ५०% पर्यंत कमी होतो.

- मातीची संरचना अनुकूल राहत असल्यामुळे सुपीकता वाढते. जमिनीची धूपही थांबते. उष्ण आणि कोरड्या हवामानातील झाडांची वाढ चांगली ठेवण्यात मदत करते.

- पर्यावरणपूरक असल्यामुळे जमीन, पाणी, पर्यावरण या सर्वांचा फायदा होतो.

- नगर जिल्ह्यातील बाभळेश्‍वर कृषी विज्ञान केंद्राने २०१६ मध्ये पॉलिमर भुकटीचा वापर डाळिंब आणि कांदा पिकामध्ये केला असता शेतकऱ्यांच्या पाण्यामध्ये अनुक्रमे पाच लाख आणि तेवीस लाख लिटर पाणी प्रति हेक्टरी बचत झाली आहे. उत्पादनातही अनुक्रमे सहा टक्के व तीस टक्के इतकी वाढ झाली. येथील अनेक शेतकरी नियमितपणे पॉलिमर वापरू लागले आहेत.

रोपवाटिका

काही धान्ये वगळता सर्व पिकांची रोपे रोपवाटिकेत म्हणजेच कमी क्षेत्रामध्ये व कमी पाण्यामध्ये करता येतात. काही रोपे वीस ते तीस दिवस आणि उसासारखी सावकाश वाढणारी रोपे दोन ते अडीच महिने रोपवाटिकेत वाढवता येतात. त्यामुळे संपूर्ण शेताला पाणी देण्याऐवजी एक ते पाच गुंठ्यांच्या रोपवाटिकेला पाणी देणे फायद्याचे ठरते. हे प्रमाण अगदीच नगण्य ठरते.

बांधावर उंच वाढणारी झाडे लावणे

उष्ण वाऱ्यामुळे शेतातील आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाहून नेली जाते. अशा वेळी वारे अडविण्यासाठी बांधावर उंच वाढणारी झाडे महत्त्वाची ठरतात. या झाडांस्या पडणाऱ्या कमी अधिक सावलीमुळेही बाष्पीभवनाचा वेग कमी राहू शकतो. त्यामुळे शेतांच्या बांधावर सलग शेवरी व तत्सम उंच वाढणारी झाडे लावल्यास आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते.

वार्षिक सरासरी बाष्पीभवन (मि.मी.)

कोकण --- १४७८

नाशिक - धुळे - जळगाव --- २४७५

बुलडाणा - अकोला - अमरावती --- २३६० ते २४२०

मराठवाडा --- १७७० चे २०३५

मासिक सरासरी बाष्पीभवन हे मासिक पर्जन्यमानापेक्षाही जास्त --- नगर (जुलै महिना ), जळगाव - बुलडाणा - अकोला (सप्टेंबर महिना) म्हणून पावसाळ्यातही सिंचन आवश्यक पडते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com