
Banana Farming Management :
शेतकरी नियोजन
प्रताप गुलाबराव मारोडे
शेतकरी केळीचे पीक हे खादाड असल्याचे मानतात. त्यामुळे रासायनिक खतांशिवाय केळी घेणे शक्यच होणार नाही, अशी त्यांची भावना असते. त्यामुळे आम्ही सेंद्रिय पद्धतीने गेल्या पाच वर्षांपासून केळी हे पीक घेत असल्याचे सांगितल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया ‘‘केळीचे पीक सेंद्रिय पद्धतीने शक्यच नाही!’’ अशीच असते.
आमची पळशी झाशी (ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा) येथे एकत्र कुटुंबाची ३७ एकर शेती पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवतो. त्यात केळीसह एकूण ३० प्रकारची पिके आम्ही घेतो. कमी कालावधीत येणाऱ्या पिकांपासून सेंद्रिय पद्धत वापरण्यास सुरुवात केली होती. केळी पीक सेंद्रिय पद्धतीने घेणे, हे एक आव्हान होते. ते आम्ही स्वीकारले. केळीच्या उत्तम पोषणासाठी आम्ही केलेल्या व्यवस्थापन पद्धतीची माहिती थोडक्यात घेऊ.
सेंद्रिय पद्धतीने केळी लागवड
हिरवळीचे खत
केळी लागवड करणार असलेल्या शेतात एकरी २० किलो बोरू किंवा धैंचाची पेरणी बैलचलित तिफणीने करतो. हिरवळीचे खत जवळपास ४५-५० दिवसांचे झाल्यावर रोटरच्या मदतीने जमिनीत मिसळले जाते. जमिनीत मिसळल्यावर १५ दिवसांनी पुन्हा रोटर करतो आणि केळीची लागवड करतो.
बोरू, धैंचा, उडीद, मूग अशी हिरवळीची पिके नत्र स्थिरीकरणासाठीही मदत करतात. हिरवळीचे खत वापरल्यामुळे शेतातील तणांचे प्रमाण कमी होते. त्याशिवाय सेंद्रिय कर्ब, इतर अन्नद्रव्ये भरपूर मिळाल्याने जमिनीतील जिवाणू आणि गांडुळांची संख्या वाढते. जमिनीची जलधारण क्षमता वाढते. त्या शेतात उन्हाळ्यात पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता निर्माण होते.
गांडूळ खताचा वापर
केळी पिकाची लागवड केल्यानंतर साधारण ३०-४५ दिवसांच्या कालावधीमध्ये बांगडी पद्धतीने गांडूळ खत देतो. त्यानंतर १२० - १५० दिवसांच्या कालावधीमध्ये साधारण २ किलो प्रति झाड प्रमाणात गांडूळ खत सरीमध्ये टाकतो. मध्यभागी आलेल्या केळीच्या मुळांना हे खत उपलब्ध होते.
गांडूळ खताला आम्ही चाळणी करत नसल्यामुळे त्यातून गांडूळ व त्यांची अंडीही खतासोबत शेतात जातात. शेतामध्ये त्यांची वाढ होऊन, ते शेतातील पिकांचे अवशेष, पालापाचोळा कुजवण्याचे काम करतात. पशुपालनातून गोळा केलेल्या मूत्राचा (फक्त गाय नाही, तर सर्वच जनावरांचे मूत्र) वापर १० टक्के प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी आणि आळवणीद्वारे केला जातो.
जैविक घटकांचा वापर
पीक संरक्षणात कीड व रोग व्यवस्थापनासाठी वेगवेगळ्या जिवाणू व बुरशीजन्य घटकांचा वापर केला जातो.
अ) ट्रायकोडर्मा ः केळीवर येणाऱ्या विविध बुरशीजन्य रोगांसाठी हा रामबाण इलाज आहे. कोणत्याही रासायनिक बुरशीनाशकापेक्षा ट्रायकोडर्माची कार्यक्षमता अधिक आहे. बेणे प्रक्रिया, फवारणी आणि आळवणी या माध्यमातून त्याचा वापर केला जातो. केळीमध्ये नुकसानकारक मानल्या जाणाऱ्या पिवळा, काळा सिगाटोका आणि टिकली (ब्लास्ट ऑफ बनाना) रोग नियंत्रणात ठेवण्यास यश मिळाले आहे.
ब) मेटाऱ्हायझीम ः केळी पिकाचे मुळे आणि बेणे जमिनीतून कुरतडणाऱ्या हुमणी अळीला नियंत्रणासाठी ही बुरशी उपयोगी ठरते. त्याचा वापर बेणे प्रक्रिया आणि आळवणीद्वारे केला जातो.
क) बिव्हेरिया बॅसियाना ही बुरशी केळीवरील किडी प्रामुख्याने पोंगा खाणारी अळी, केळीवर डाग पाडणारे भुंगेरे (बिटल्स) यांच्या नियंत्रणासाठी वापरली जाते.
ड) अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी नत्र स्थिरीकरण करणारे जिवाणू, स्फुरद आणि पालाश उपलब्ध करून देणाऱ्या जिवाणूंचा वापर वेगवेगळ्या स्लरींच्या माध्यमातून करतो.
पिकांचे अवशेष
केळी हे पीक खादाड समजले जात असले तरी आमचे निरीक्षण उलट आहे. केळी पिकातून भरपूर प्रमाणात अवशेष मिळतात. ते जर शेतातच व्यवस्थित कुजवले, तर अन्य कोणत्याही खताची गरज पडणार नाही. आमचा त्यावरच अधिक भर आहे. त्याला जोड दिली जाते, ती पीक फेरपालटाची.
फेरपालटामध्ये तूर, कापूस, गहू या पिकांसोबत कडधान्य पिकांचे मुद्दाम समावेश करतो. या प्रत्येक पिकाचे अवशेषही शेतातच कुजवले जातात. म्हणजे जमिनीतून मिळालेला मुख्य उत्पादन वगळता प्रत्येक सेंद्रिय परत जमिनीला परत देण्यावर आमचा भर असतो.
नैसर्गिक पद्धतीने केळी पिकविण्याची पद्धत
आज बाजारात मिळणारी पिवळीधमक केळी ही रायपनिंग चेंबरमध्ये रसायनाद्वारे पिकवलेली असतात. ही केळी आकर्षक पिवळ्या रंगाची दिसत असली तरी आतून कच्चीच असू शकतात. त्याच प्रमाणे या रसायनांमुळे आपले व ग्राहकांचे आरोग्य धोक्यात येते. आम्ही केळी नैसर्गिकरीत्या केळी पिकविण्यासाठी प्रयोग करत आहोत.
दोन वर्षांपूर्वी नवरात्रीमध्ये नैसर्गिक पद्धतीची भट्टी तयार केली. त्यात ३ दिवस गोवऱ्यांचा धूर देऊन केळी पिकवली. ज्यांनी या केळीची चव चाखली ते आजही त्याची आठवण काढल्याशिवाय राहत नाहीत. अर्थात, केळीचा रंग आणि पिकवण्याची प्रक्रिया यावर अद्यापही आमचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच नैसर्गिक भट्टीवर पिकवलेल्या केळीसाठी विक्रीची नियमित व्यवस्था उभारण्यासाठी धडपडत आहोत.
केळी किंवा कोणतेही पीक यशस्वीपणे घेण्यासाठी मातीचे आरोग्य ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक शेत हे वेगळे असून, त्यामध्ये वेगळ्या व्यवस्थापन पद्धती अवलंबाव्या लागतात. गरजेनुसार प्रमाणामध्ये योग्य ते बदल करून या सर्व शास्त्रीय पद्धती अन्य शेतातही नक्कीच वापरता येऊ शकतात.
जागतिक सेंद्रिय परिषदेत मांडणार अनुभव
तैवान येथील नाहुआ विद्यापीठामध्ये २१ व्या जागतिक सेंद्रिय परिषद ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२४ दरम्यान होणार आहे. ही परिषद आयफोम (IFOAM) ही जागतिक पातळीवर कार्यरत संस्था दर ३ वर्षांनी आयोजित करते.
या परिषदेमध्ये प्रताप गुलाबराव मारोडे यांनी लिहिलेल्या ‘सेंद्रिय केळी शेतीच्या पद्धती’ या संशोधनपर लेखाची निवड झाली आहे. त्यांना या परिषदेत जगभरातील सेंद्रिय शेती विषयातील शेतकरी, संशोधक, तज्ज्ञ यांच्यासमोर बोलण्याची संधी मिळणार आहे.
- प्रताप गुलाबराव मारोडे, ७५८८८४६५४४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.