Rabi Crop Management : नियोजन रब्बी हंगामातील पिकांचे...

Rabi Season 2024 : राज्यात रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या मुख्य पिकांची उत्पादकता ही अत्यंत कमी आहे. कारण रब्बी हंगामातील पिकांची लागवड ही कोरडवाहू क्षेत्रात केली जाते.
Rabi Crop
Rabi Crop Agrowon
Published on
Updated on

डॉ. आदिनाथ ताकटे, डॉ. दीपक सावळे

राज्यात रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या मुख्य पिकांची उत्पादकता ही अत्यंत कमी आहे. कारण रब्बी हंगामातील पिकांची लागवड ही कोरडवाहू क्षेत्रात केली जाते. याशिवाय वेळेवर पेरणी न करणे, सुधारित वाणांचा वापर न करणे, पीक अवस्थेनुसार सिंचन व्यवस्थापनाचा अभाव, पीक संरक्षणाचा अभाव, मशागत तंत्राचा अभाव, पिकांची फेरपालट न करणे तसेच संतुलित खत व्यवस्थापनाचा अभाव अशी विविध कारणे आहेत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झालेली दिसून येते. त्यासाठी पीकनिहाय लागवडीपासून काढणीपर्यंत योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे.

हरभरा

- मध्यम ते भारी, काळी कसदार व चांगल्या निचऱ्याची जमीन लागवडीस निवडावी.

- बागायती हरभऱ्याची पेरणी १० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी. उशिरात उशिरा १५ डिसेंबरपर्यंत पेरणी करावी.

- देशी वाणाच्या पेरणीसाठी ३० बाय १० सेंमी, तर काबुली वाणासाठी ४५ बाय १० सेंमी अंतरावर पेरणी करावी.

- बियाण्याच्या आकारमानानुसार जातीपरत्वे हेक्टरी ७० ते १०० किलो आणि काबुली वाणासाठी १२५ किलो बियाणे वापरावे.

- पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी.

वाण निवड ः

- देशी हरभरा ः विजय, विशाल, दिग्विजय आणि फुले विक्रम (जिरायत, बागायती तसेच उशिरा पेरणीसाठी)

- काबुली वाण ः विराट, कृपा, पीकेव्ही -२, पीकेव्ही-४.

बीजप्रक्रिया ः

पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यांस, ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम २ ग्रॅम. त्यानंतर रायझोबिअम तसेच पीएसबी (स्फुरद विरघळवणारे जिवाणू) २५ ग्रॅम या प्रमाणे या जैविक खतांची बीजप्रक्रिया करावी.

खत व्यवस्थापन ः

- खरिपात जमिनीस शेणखत दिले नसल्यास, हेक्टरी ५ टन शेणखत पेरणीपूर्वी द्यावे.

- पेरणी करताना २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ३० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. किंवा

- हेक्टरी १२५ किलो डीएपी आणि ५० किलो म्युरेट ऑफ पोटॅश पेरणीच्या वेळी बियाण्यांलगत पडेल या पद्धतीने दुचाडी पाभरीने पेरून द्यावे.

- खतमात्रा विस्कटून देऊ नये.

Rabi Crop
Rabi Crop Management : रब्बी पिकांमध्ये कोळपणी, संरक्षित सिंचन महत्त्वाचे

गहू ः

- पाण्याचा चांगला निचरा होणारी, भारी व खोल जमीन लागवडीस निवडावी.

- मध्यम जमिनीत भरखते व रासायनिक खतांचा वापर केल्यास उत्पादन चांगले घेता येईल. शक्यतो हलक्या जमिनीत गहू लागवड करणे टाळावे.

पेरणी ः

- बागायती गव्हाची (वेळेवर) पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात करावी.

- बागायती गव्हाच्या वेळेवर पेरणीसाठी १०० ते १२५ किलो बियाणे वापरावे.

- बागायती वेळेवर पेरणी २० सेमी अंतर ठेवावे.

- बागायत उशिरा पेरणी १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत करावी.

- उशिरा पेरणीसाठी १८ सेंमी अंतरावर पेरणी करावी. उशिरा पेरणीसाठी १२५ ते १५० किलो बियाणे वापरावे.

बीजप्रक्रिया ः

पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यांस,

थायरम (७५ टक्के डब्ल्यूएस) ३ ग्रॅम.

त्यानंतर ॲझोटोबॅक्टर आणि पीएसबी (स्फुरद विरघळवणारे जिवाणू) २५ ग्रॅम या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

वाण निवड ः

- पाण्याची उपलब्धता कमी असल्यास ः एनआयएडब्ल्यू १४१५ (नेत्रावती), एचडी-२९८७ (पुसा बहार) या वाणांची निवड करावी.

- बागायती वेळेवर पेरणीकरिता ः एनआयएडब्ल्यू ३०१ (त्र्यंबक), एनआयएडब्ल्यू ९१७ (तपोवन), एमएसीएस ६२२२, एनआयडीब्ल्यू २९५ (गोदावरी), एनआयएडब्ल्यू १९९४ (फुले समाधान)

- बागायती वेळेवर व उशिरा पेरणीसाठी ः फुले समाधान

- उशिरा पेरणीसाठी ः एनआयएडब्ल्यू एनआयडीब्ल्यू ३४ (निफाड ३४), एकेएडब्ल्यू ४६२७, एनआयएडब्ल्यू १९९४ (फुले समाधान)

खत व्यवस्थापन ः

- बागायती गव्हाच्या पिकासाठी हेक्टरी १० टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे.

- बागायती गव्हाच्या वेळेवर पेरणीसाठी १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. त्यापैकी अर्धे नत्र आणि स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा पेरणीच्या वेळेस द्यावी. नत्राची उर्वरित मात्रा पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी झाल्यावर पहिल्या पाण्याच्या वेळी द्यावी.

- जमिनीमध्ये लोहाची किंवा झिंकची कमतरता असल्यास,

फेरस सल्फेट किंवा झिंक सल्फेट २० किलो याप्रमाणे मात्रा शेणखतातून द्यावी. (१०० किलो खतात १५ दिवस मुरवून)

Rabi Crop
Rabi Crop Management : कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी पिकांचे नियोजन

मका ः

- लागवडीसाठी मध्यम ते भारी, खोल, उत्तम निचऱ्याची, सेंद्रिय पदार्थ आणि अधिक जलधारणाशक्ती असणारी जमीन निवडावी.

- मका पिकाची पेरणी १५ नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करावी.

- पेरणीसाठी हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे पुरेसे होते.

- पेरणी ६० बाय २० सेंमी अंतरावर टोकण पद्धतीने करावी.

- पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यांस,

थायरम २ ते २.५ ग्रॅम प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. तसेच ॲझोटोबॅक्टर या जिवाणू संवर्धकाची २५ ग्रॅम किंवा १०० मिलि प्रति किलो बियाण्यांस चोळावे.

वाण निवड ः

अ) उशिरा पक्व होणारे वाण ः

- संकरित वाण ः पी.एच.एम.-१, पी.एच.एम.-३, बायो -९६८१

- संमिश्र वाण ः प्रभात, शतक ९९०५.

ब) मध्यम कालावधीत पक्व होणारे वाण ः

- संकरीत वाण ः डी. एच. एम.-११७, डी. एच. एम.-११९, राजर्षी, फुले महर्षी, फुले उमेद, फुले चॅम्पियन

- संमिश्र वाण ः करवीर, मांजरी, नवज्योत.

क) लवकर पक्व होणारे वाण ः

- संकरित वाण ः जे. एच-३४५९, पुसा हायब्रीड-१, जे. के. -२४९२

- संमिश्र वाण ः पंचगंगा, प्रकाश, किरण.

ड) अति लवकर पक्व होणारे वाण ः

- संकरीत वाण ः विवेक-९, विवेक-२१, विवेक-२७

- संमिश्र वाण ः विवेक-संकुल.

खत व्यवस्थापन ः

- पेरणीच्या वेळी ४० किलो नत्र, संपुर्ण स्फुरद ६ किलो व पलाश ६० किलो द्यावे. पेरणीनंतर ३० दिवसांनी ४० किलो नत्र व पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी उर्वरित ४० किलो नत्र द्यावे.

- पीक ३० ते ३५ दिवसांचे आल्यानंतर, १९:१९:१९ या विद्राव्य खतांची फवारणी केल्यास उत्पादनात वाढ होते.

- झिंक या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास, झिंक सल्फेट हेक्टरी २० ते २५ किलो प्रमाणे पेरणीवेळी द्यावे.

महत्त्वाच्या बाबी ः

- पेरणीनंतर पीक ८ ते १० दिवसांत पिकाची उगवण झाल्यानंतर कोवळे कोंब पक्षी खातात. त्यामुळे उत्पादनात घट येऊ शकते. म्हणून पेरणीनंतर सुरुवातीच्या १० ते १२ दिवसांपर्यंत पक्ष्यांपासून संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच पीक दुधाळ अवस्थेत असताना पक्षी कणसे फोडून दाणे खातात. त्यासाठी पिकाची राखण करणे आवश्यक आहे.

जवस ः

- मध्यम ते भारी, ओलावा टिकवून ठेवणारी उत्तम निचऱ्याची, आम्ल विम्ल जमीन लागवडीकरिता निवडावी.

- कोरडवाहू पिकाची पेरणी बागायती पिकाची पेरणी १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी.

- पेरणीकरिता हेक्टरी ८ ते १० किलो बियाणे वापरावे.

- पेरणी ४२ बाय १० सेंमी किंवा ३० बाय १० सेंमी अंतरावर करावी.

- पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यांस,

कार्बेन्डाझिम २ ग्रॅम किंवा थायरम ३ ग्रॅम प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर ॲझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळविणारे जिवाणू प्रत्येकी २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

सुधारित वाण ः एन. एल. १७, पी. के. व्ही-२६०.

खत व्यवस्थापन ः

- कोरडवाहू पिकाला पेरणीच्या वेळेस २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५ किलो झिंक सल्फेट द्यावे.

- बागायतीमध्ये ३० किलो नत्र, ३० किलो स्फुरद पेरणीच्या तसेच ५ किलो झिंक सल्फेट द्यावे. पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी उर्वरित नत्राची मात्रा द्यावी

(एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com