डॉ. आदिनाथ ताकटे, डॉ. शुभांगी पाटील
को रडवाहू क्षेत्राच्या दृष्टीने रब्बी हंगाम हा अत्यंत महत्त्वाचा हंगाम मानला जातो. या हंगामात ज्वारी, हरभरा, करडई, सूर्यफूल, जिरायती गहू इत्यादी प्रमुख पिकांची लागवड केली जाते. रब्बी पिकांमध्ये उत्पादन वाढीसाठी योग्य नियोजन हा महत्त्वाचा घटक आहे.
राज्यातील एकूण लागवडीयोग्य जमिनीपैकी ८० टक्के क्षेत्र हे पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. या कोरडवाहू (अवर्षण प्रवण) भागातील पावसाचे प्रमाण कमी, अनियमित असल्यामुळे पीक उत्पादन हे अनिश्चित स्वरूपाचे असते. कोरडवाहू क्षेत्रातील पिकांचे नियोजन करताना उत्पादन वाढीच्या दृष्टीने विविध सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे.
पीक व्यवस्थापनामध्ये मुख्यतः पीक पद्धती, जमिनीची निवड, पेरणीची वेळ, अंतर, लागवडीसाठी वाण, बियाणे प्रमाण, बीजप्रक्रिया, खत व्यवस्थापन आणि आंतरमशागत या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पीक लागवडीपासून ते काढणीपर्यंत योग्य नियोजन केल्यास उत्पादन वाढ मिळविणे शक्य होते.
रब्बी ज्वारी
जमीन
रब्बी ज्वारी लागवडीसाठी मध्यम ते खोल, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.
पेरणी कालावधी
पेरणी शक्यतो ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी.
पेरणी अंतर
४५ बाय १५ ते २० सेंमी
वाण
हलकी जमीन (खोली ३० सेंमी) ः फुले यशोमती
मध्यम जमीन (खोली ६० सेंमी) ः फुले सुचित्रा, परभणी मोती, मालदांडी ३५-१
भारी जमीन (६० सेंमी पेक्षा जास्त) ः फुले वसुधा, पी.के.व्ही. क्रांती, परभणी मोती, फुले पूर्वा, सी.एस.व्ही २२, सी.एस.एच. १५ आणि सी.एस.एच. १९
बियाणे प्रमाण
हेक्टरी १० ते १२ किलो
बीजप्रक्रिया
प्रतिकिलो बियाणास ३०० मेष गंधकाची प्रक्रिया करावी. त्यासाठी १ किलो बियाण्यास ४ ग्रॅम गंधक या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. त्यामुळे काणी रोगास अटकाव होतो. गंधकाची प्रक्रिया केल्यानंतर १० किलो बियाणास ॲझोटोबॅक्टर व पीएसबी प्रत्येकी २५० ग्रॅम प्रमाणे जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.
खत व्यवस्थापन
हेक्टरी ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद आणि २५ किलो पालाश म्हणजेच २.५ गोण्या युरिया, ३ गोण्या सिंगल सुपर फॉस्फेट आणि १ गोणी म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.
खते पेरणीच्या वेळी एकाच हप्त्यात दोन चाड्याच्या पाभरीने द्यावीत. खते विस्कटून देऊ नयेत.
आंतरमशागत
उगवण झाल्यावर १० ते १२ दिवसांनी विरळणी करावी. पेरणीनंतर आवश्यकतेनुसार १ ते २ वेळा खुरपणी करावी.
पेरणीनंतर पहिली कोळपणी तीन आठवड्यांनी, दुसरी पाच आठवड्यांनी आणि तिसरी कोळपणी आठ आठवड्यांनी करावी.
सूर्यफूल
जमीन
पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी
पेरणी
१५ सप्टेंबर ते ३० ऑक्टोबर या दरम्यान सूर्यफूल लागवडीसाठी योग्य कालावधी आहे.
पेरणी अंतर
मध्यम जमिनीत ४५ बाय ३० सेंमी
भारी जमिनीत ६० बाय ३० सेंमी
बियाणे प्रमाण
पेरणीसाठी हेक्टरी ६ ते ८ किलो बियाणे वापरावे.
बीजप्रक्रिया
प्रतिकिलो बियाणास २.५ ग्रॅम थायरम व ५ ग्रॅम इमिडाक्लोप्रीड या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर १० किलो बियाणास ॲझोटोबॅक्टर व पीएसबी प्रत्येकी २५० ग्रॅम प्रमाणे या जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.
वाण
फुले भास्कर, भानू, फुले रविराज
खत व्यवस्थापन
हेक्टरी ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद आणि २५ किलो पालाश म्हणजेच २.५ गोण्या युरिया, ३ गोण्या सिंगल सुपर फॉस्फेट, १ गोणी एमओपी.
जिरायती गहू
जमीन
लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी.
जिरायती गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत पूर्ण करावी.
लागवड
पेरणी अंतर २० सेंमी ठेवावे.
बियाणे ५ ते ६ सेंमी पेक्षा जास्त खोल पेरू नये.
उभी आडवी पेरणी करू नये.
एकेरी पेरणीमुळे आंतरमशागत करणे सुलभ होते.
पेरणी शक्यतो दोन चाड्याच्या पाभरीने करावी.
पेरणीसाठी हेक्टरी ७५ ते १०० किलो बियाणे पुरेसे होते.
बीजप्रक्रिया
प्रति किलो बियाणास ३ ग्रॅम थायरम किंवा ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा अधिक १.२५ ग्रॅम कार्बेन्डाझिम (७५ डब्ल्यूपी) ची बीजप्रक्रिया करावी. ॲझोटोबॅक्टर व पीएसबी प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.
लागवडीसाठी वाण
जिरायती पेरणीसाठी एनआयडीडब्ल्यू-१५ (पंचवटी), एकेडीब्ल्यू -२९९७-१६ (शरद) हे वाण वापरावेत.
सिंचनाच्या पाण्याची उपलब्धता कमी असल्यास एनआयएब्ल्यू -१४१५ (नेत्रावती),एचडी-२९८७ (पुसा बहार) या वाणांची निवड करावी.
खत व्यवस्थापन
हेक्टरी ४० किलो नत्र (दोन गोण्या युरिया) आणि २० किलो स्फुरद (२.५ गोण्या एसएसपी) प्रमाणे शिफारशीत खतमात्रा द्यावी.
आंतरमशागत
पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी करून पीक तणमुक्त ठेवावे.
जिरायती गहू पिकाची वाढ ही जमिनीतील उपलब्ध ओल्याव्यावर होते. त्यासाठी पीक तणमुक्त ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
एक पाण्याची उपलब्धता असल्यास पेरणीनंतर ४० ते ४२ दिवसांनी द्यावे.
कीडनाशकांच्या शिफारशी लेबल क्लेमप्राप्त किंवा जॉएंट ॲग्रेस्कोप्राप्त आहेत. फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठीचे आहे. खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे. बॅन किंवा ़‘रेस्ट्रिक्टेड’ आहे का पाहावे. लेबल क्लेम वाचावेत. पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत. रसायनांचा गट तपासावा.
पीएचआय, एमआरएल तपासावेत. पेरणी वा लागवडीपूर्वी संबंधित बियाणांवर कोणती बीजप्रक्रिया केलेली आहे, हे तपासूनच पुढील बीजप्रक्रिया करावी.
मधमाशी, मित्रकीटकांना हानिकारक कीडनाशकांचा वापर टाळावा. पीक फुलोरा अवस्था लक्षात घेऊन कीडनाशकांचा समंजस वापर करावा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.