
Integrated Fertilizer Management : महाराष्ट्रातील जमिनी मुख्यत्वेकरून मध्यम काळ्या ते खोल काळ्या प्रकारातील आहेत. या जमिनींमध्ये नत्र ११ ते ७६ टक्के, स्फुरद २१ ते ७४ टक्के, गंधक ४६ ते ९६ टक्के आणि जस्त ६२ टक्के या प्रमाणात कमी असल्याचे आढळून आले आहे.
विविध अन्नद्रव्यांचे जमिनीतील प्रमाण व त्याबाबतच्या उपाययोजना पीक उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावतात. माती परीक्षणावर आधारित अन्नद्रव्य व्यवस्थापन, पीक फेरपालट, रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा एकात्मिक वापर महत्त्वाचा आहे.
याबरोबरीने पिकाच्या गरजेनुसार विद्राव्य खतांचा ठिबक व फवारणीद्वारे वापर, नॅनो खते, खत कार्यक्षमता वाढविण्यासाठी जैविक खते, पीडीएम, प्रोम खतांचा वापर, जोरखतांचा (करंज पेंड, निंबोळी पेंड) वापर फायदेशीर ठरतो.
पीक वाढीसाठी १७ अन्नद्रव्ये आवश्यक असतात. यामध्ये कार्बन, ऑक्सिजन ही मूलद्रव्ये पिके हवेतून घेतात. उर्वरित अन्नद्रव्ये पिके जमीन आणि पाण्यातून घेत असतात. नत्र, स्फुरद आणि पालाश ही अन्नद्रव्ये पिकास जास्त प्रमाणात आवश्यक असतात. त्याखालोखाल दुय्यम अन्नद्रव्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम व गंधक या अन्नद्रव्यांची आवश्यकता असते.
लोह, जस्त, तांबे, मंगल, निकेल, मॉलिब्डेनम, बोरॉन आणि क्लोरीन हे अल्प प्रमाणात पिकांना आवश्यक असतात. एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय, रासायनिक, जैविक या निविष्ठांचा एकत्रित वापर करावा.
जमिनीचे जैविक, भौतिक व रासायनिक गुणधर्म टिकविण्यास सेंद्रिय खते, हिरवळीची खते, जिवाणू संवर्धकांचा नियमितपणे वापर महत्त्वाचा आहे. योग्य पीक पद्धती, कडधान्य, तृणधान्य, गळितधान्यांचा अंतर्भाव फेरपालटीत करावा. रासायनिक/ सूक्ष्मअन्नद्रव्ये खतांचा मातीतील कमतरतेनुसार जमिनीतून तसेच पिकावर कमतरतेच्या लक्षणानुसार वापर करणे महत्त्वाचे आहे.
माती परीक्षणानुसार रासायनिक खतमात्रेत बदल
माती परीक्षण अहवालानुसार खत व्यवस्थापन केल्यास खतमात्रेत बचत होते किंवा कमतरता असल्याने अन्नद्रव्ये वाढवून दिल्याने पीक उत्पादनात येणारी संभाव्य घट टाळता येते. अशावेळी माती परीक्षण अहवालात नमूद केल्याप्रमाणे खतमात्रेत बदल करावा. उदा. नत्र अन्नद्रव्य अत्यंत कमी असल्यास नत्राची मात्रा शिफारस केलेल्या मात्रेपेक्षा ५० टक्क्यांनी वाढवून द्यावी, कमी असल्यास २५ टक्के वाढवून द्यावी, मध्यम किंवा थोडेसे जास्त असल्यास शिफारशीप्रमाणे द्यावी. जास्त असल्यास २५ टक्के कमी व अत्यंत जास्त असल्यास ५० टक्के कमी मात्रा द्यावी. इतर अन्नद्रव्यांची खतमात्रेत अशाप्रकारे बदल करावा.
सूक्ष्मअन्नद्रव्येयुक्त खतांची कमतरता असल्यास सूक्ष्मअन्नद्रव्ये कमतरतेनुसार ग्रेड क्र. १ (यामध्ये लोह २ टक्के, जस्त ५ टक्के, मंगल १ टक्का, तांबे ०.५ टक्का आणि बोरॉन १ टक्का यांचे मिश्रण असते) हेक्टरी २५ किलो, १०० किलो शेणखतात मिसळून आठवडाभर मुरवून जमिनीतून द्यावे किंवा उभ्या पिकावरील सूक्ष्मअन्नद्रव्यांच्या कमतरता लक्षणानुसार फुले द्रवरूप सूक्ष्म ग्रेड क्र. २ (यामध्ये लोह २.५ टक्के, जस्त २ टक्के, मंगल १ टक्का, तांबे १ टक्का, मॉलिब्डेनम ०.१ टक्का आणि बोरॉन ०.५ टक्का यांचे मिश्रण असते) हे पहिली शाकीय वाढीच्या अवस्थेत ५० मिलि आणि दुसरी फुलोऱ्यात असताना १०० मिलि १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
रासायनिक खते देताना घ्यावयाची काळजी
सर्व नत्रयुक्त खताची मात्रा एकाच वेळी न देता वेगवेगळ्या वेळी विभागून द्यावी. जमिनीत दिलेले नत्र हवेत उडून किंवा पाण्याबरोबर वाहून जाऊ नये याकरिता पाण्याच्या पाळीवर नियंत्रण ठेवावे.
खत पिकांच्या ओळीमधून किंवा रोपाभोवती द्यावे. रोपांशी त्याचा प्रत्यक्ष संबंध येऊ देऊ नये.
खत ओलसर असल्यास, खत कोरड्या मातीत किंवा रेतीत मिसळून वापरावे.
दोन चाड्याच्या पाभरीने खते पेरून द्यावीत. म्हणजे ती पिकांच्या मुळांच्या खालच्या थरात उपलब्ध होऊन त्यांचा उपयोग होईल.
काही प्रमाणात नत्रयुक्त खते तसेच चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये पुरवणारी खते कमतरतेनुसार फवारणी करून देखील देतात.
पेरणीच्यावेळी खते आणि बियाणे एकाच वेळी पेरणी यंत्राच्या साह्याने दिल्यास अधिक फायदेशीर ठरतात.
डायअमोनियम फॉस्फेट २ टक्के (२०० ग्रॅम + १० लिटर पाणी) फवारणीद्वारे दिल्यास फायद्याचे ठरते.
भात पिकास नायट्रेट खते देऊ नयेत. अन्नद्रव्यांच्या कार्यक्षम वापरासाठी भात शेतीत नत्र आणि स्फुरदाच्या गोळ्या (ब्रिकेट) हेक्टरी १६९ किलो देण्याची शिफारस आहे. ब्रिकेटमधून ५९ किलो नत्र + ३१ किलो स्फुरद प्रति हेक्टरी मिळते.
चुनखडीयुक्त जमिनीत युरिया / अमोनियम सल्फेट खते जमिनीच्या पृष्ठभागावरून देऊ नये.
- डॉ. भीमराव कांबळे, ९४०४४५८४६८
(मृद् विज्ञान विभाग,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
बागायती पिकांसाठी खतांची मात्रा आणि खते देण्याची वेळ
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.