Women Leadership : स्त्री नेतृत्वाचा जागर

Article by Anand Nadkarni : शेतीच्या उद्योगात घरातील स्त्रिया – आई, बहिणी, वहिनी, पत्नी, मुलगी – यांना समान संधी मिळेल, प्रयोग करून पाहायला, चुकायला आणि शिकायला वाव मिळेल यासाठी पुरुष शेतकऱ्यांनी प्रयत्नशील राहायला हवं. नेतृत्वाची संधी त्यांनाही बरोबरीने मिळायला हवी.
Jhashi Rani and Ahilyabai Holkar
Jhashi Rani and Ahilyabai HolkarAgrowon
Published on
Updated on

डॉ. आनंद नाडकर्णी

Awakening of Women's Leadership : शेतीच्या उद्योगात घरातील स्त्रिया – आई, बहिणी, वहिनी, पत्नी, मुलगी – यांना समान संधी मिळेल, प्रयोग करून पाहायला, चुकायला आणि शिकायला वाव मिळेल यासाठी पुरुष शेतकऱ्यांनी प्रयत्नशील राहायला हवं. काही बाबतीत स्त्रिया अधिक समजूतदार, कुशल, ज्ञानी असतील हे उमद्या मनाने मान्य करायला हवं. नेतृत्वाची संधी त्यांनाही बरोबरीने मिळायला हवी.

शेतकरी पेशात उद्योजकता बाणवताना स्त्रियांना समान संधी द्यायचा, त्यांना केवळ कष्टात नाही तर निर्णयात आणि कुशल-कार्यात सहभागी करून घ्यायचा संस्कार रुजवायला हवा. केवळ सहभाग नव्हे, तर पुढे जाऊन त्यांच्यातील नेतृत्वगुण ओळखून त्याचा उचित उपयोग करून घ्यायला हवा. तिथवरचा प्रवास कसा होत आला आणि पुढे व्हायला हवा हे जरा समजून घेऊ.

मूलत:च स्त्रिया आणि पुरुष यांच्या विचारपद्धतीमध्ये, भावानिकतेमध्ये, नेतृत्वाच्या शैलीमध्ये काही ठळक फरक जाणवतात. त्यामागे उत्क्रांतीत रुजलेली काही कारणे आहेत. उत्क्रांतीचा काळ अभ्यासला तर आपल्याला लक्षात येईल, की पुरुषावर शिकारीची जबाबदारी होती तर स्त्रीवर संततीसंरक्षणाची. शिकारीसाठी आक्रमकता गरजेची होती तशीच ‘स्व’ आणि संतती संरक्षणासाठीही आक्रमकतेची गरज होती. मात्र त्या दोन्हींच्या तीव्रतेत फरक होता. गरज पडल्यास, गरजेपुरती आक्रमकता संरक्षणासाठी स्त्री वापरत होती.

सुमारे बारा- तेरा हजार वर्षांपूर्वी मनुष्य नदीकाठी वस्ती करू लागला, हळूहळू कृषिसंस्कृती उदयास आली. या बदलामुळे सामाजिक व्यवस्था आणि त्यातील घटक, अर्थात स्त्री आणि पुरुष यांच्या भूमिकेत / कामात बदल झाले. वनातील शिकारीतून अन्न मिळविण्याच्या पद्धतीपेक्षा, शेती आणि पाळीव प्राणी यातून अन्न मिळवायला सुरुवात झाली. गृहकृत्ये आणि अपत्यसंगोपन याचे महत्त्व वाढले. देवता म्हणून पूज्य अशा देवींची आराधना पुरुष देवांच्या आधी सुरुवात झाल्याचे दाखले मिळतात.

कृषी संस्कृतीच्या सोबतीने मनुष्यवस्ती स्थिर-स्थावर व्हायला लागली. त्याबरोबर नागरी संस्कृती आणि नवी जीवनशैली आली. देवाणघेवाणीच्या जागी व्यापार आला, चलन आले. या बदललेल्या जीवनशैलीचा एक परिणाम म्हणून स्त्री आणि पुरुष यांच्या भूमिकांमध्ये मोठे आणि महत्त्वाचे फरक झाले.

स्थावर आयुष्यात संपत्ती आणि मालकीची भावना निर्माण झाली. ‘स्त्री’कडे भोगवस्तू आणि मालकी हक्क अशा पद्धतीने पाहिले जाऊ लागले. स्त्रीची आणि पुरुषाची एक भूमिका ठरवली गेली. पुरुषांकडे शास्त्र, शस्त्र आणि अस्त्र विद्या होती, संपत्ती निर्माण करण्याची भूमिका होती. स्त्रीकडे प्रजनन आणि संततीसंगोपन, गृहकर्तव्ये यांची जबाबदारी होती. ज्ञानार्जनासाठी पुरुषच पुढे जात राहिला आणि स्त्री शस्त्रविद्या आणि ज्ञानार्जन यापासून वंचित राहिली.

फार पूर्वी आपल्याकडे गार्गी, मैत्रेयीसारख्या विद्वान आणि ज्ञानी स्त्रिया होऊन गेल्या. पण तशी सार्वत्रिक समाजरचना निर्माण झाली नाही. पुरुषाची भूमिका पक्की ठाम-आक्रमक बनली. पुरुषावर अवलंबून असलेल्या स्त्रीची भूमिका भिडस्त बनली.

Jhashi Rani and Ahilyabai Holkar
Biodiversity Conservation : जैवविविधतेची समृद्धी लाभलेली जहागीरदारवाडी-बारी

चारित्र्य आणि त्याची शुद्धता याच्या एकांगी आणि दाहक कल्पनांमधून स्त्रीला जाचक पद्धतीने बंधनात ठेवण्यात आले. तिच्या चारित्र्यावर डाग असता कामा नये! चारित्र्य हा मुद्दा खरे तर दुतर्फा हवा. जसे एकपतीव्रत हवे तर एकपत्नीव्रत हवे! पत्नीच्या मृत्यूनंतर पुरुषानेसुद्धा सती जायला हवे. परंतु असे काही झाले नाही. समाजात पुरुषी वर्चस्ववादी पद्धती तयार झाली होती. अनेक शतके स्त्री-पुरुष भूमिका आणि समाजरचना ही अशीच राहिली.

काही शतकांपूर्वी, स्त्री पारंपरिक प्रतिमेतून बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागली. याची काही तुरळक उदाहरणे इतिहासात दिसतात. महाराष्ट्राच्या परीघात पाहिले तर जिजाऊ, चांदबीबी, अहिल्याबाई होळकर, कित्तुरची चेन्नमा, झाशीची राणी, रायबागन अशा काही स्त्रियांनी पारंपरिक भूमिकेपालीकडे जाऊन शिक्षण, शौर्य, नेतृत्व दाखवले. मात्र सर्वत्र सामाजिक व्यवस्था फारशी बदलली नाही आणि अशा कर्तृत्ववान स्त्रिया अपवादानेच घडल्या. समाजाने त्यांच्याकडे नेतृत्व आणि सत्ता जाणार नाही, हा बदल सर्वदूर पसरणार नाही असे पाहिले.

सती परंपरा पाळणाऱ्या समाजात स्त्रीचा स्वतःच्या जीवनावरही हक्क नव्हता. ‘स्त्री ही माझी भोगवस्तू, जिला मी माझ्या बरोबर घेऊन जाईन, माझ्यानंतर ती कोणाचीही होणार नाही...’ असा एक दृष्टिकोन सतीच्या परंपरेमागे असू शकते. पुढे आपल्या देशात ब्रिटिश स्थिरावले आणि या परकीय सत्तेबरोबर पाश्‍चिमात्य समाज सुधारणांचा ओघ सुरू झाला.

राजाराम मोहन रॉय आणि त्यांचा सती प्रथेविरुद्ध समाजलढा हे त्याचे एक उदाहरण. स्त्री शिक्षणाला सुरुवात झाली, स्त्रीची जीवनशैली बदलू लागली. समाजसुधारकांनी बदलास सुरुवात स्वतःपासून आणि स्वतःच्या घरापासून केली. आपण सांगितल्याप्रमाणे कोणीतरी बदल घडवून आणेल ह्यासाठी ते थांबले नाहीत.

बदलाच्या कृतीची आणि परिणामांची संपूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली. सावित्रीबाई फुले यांनी मुलींची शाळा सुरू केली. जोतीराव आणि सावित्रीबाई यांनी मुलगा दत्तक घेतला. तो नंतर डॉक्टर झाला. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्री शिक्षणाला व्यवसायाभिमुख शिक्षणाची जोड दिली. या उदाहरणांमध्ये या सुधारकांची मानसिकता महत्त्वाची ठरते जी शिकण्यायोग्य आहे.

Jhashi Rani and Ahilyabai Holkar
Paddy Seed Conservation : पारंपरिक भाताच्या ६५० वाणांचं संवर्धन करणारा 'सीडिंग सत्या'

गेल्या शतकांत स्त्रीच्या आयुष्यात विज्ञानाने एक क्रांती घडवून आणली. ती होती संतती प्रतिबंधक गोळ्या. संतती प्रतिबंधनाचा हक्क स्त्रीला मिळाला, ज्यामुळे प्रजननावर किंवा पुनरुत्पादनावर नियंत्रण करण्याचा मार्ग मोकळा झाला.

स्त्रीला संतती प्रतिबंधाचा अधिकार आणि साधन मिळावे ही मागणी लावून धरणाऱ्या र. धो. कर्वे यांना सामाजिक विरोधाचा सामना करावा लागला. त्यांचा हा लढा स्त्रीकडे व्यक्ती म्हणून बघण्यासाठीचा आणि त्यानुरूप व्यक्तिगत हक्क तिला मिळण्यासाठीचा होता. शिक्षण, कायद्याचे बळ, मतदान आणि संपत्तीचे अधिकार मिळाले, तसे स्त्रिया प्रगती करू लागल्या. आता स्त्रियांचे एकच ध्येय बनले - अनुशेष भरून काढणे.

गेल्या शतकातील दुसऱ्या ५० वर्षांत स्त्रियांनी विविध मार्गानी स्वतःच्या हिमतीवर हा अनुशेष जास्तीत जास्त भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. विज्ञान-तंत्रज्ञान-शिक्षण-व्यवसाय या प्रत्येक ठिकाणी स्वतःला पुढे आणण्याचा प्रयत्न केला. या सर्व सुधारणा सुरू होऊन, रुजून कित्येक दशके उलटली आहेत.

पण अजूनही बऱ्याचदा स्त्री-पुरुष भूमिका, संधी, उपलब्ध संसाधन यातील असमानतेमुळे स्त्रिया आणि पुरुष यांच्या ज्ञान आणि कौशल्यात एक तफावत दिसून येते. पण तंत्रज्ञान आणि नवीन समाज व कुटुंब व्यवस्था यांच्या मदतीने, आज स्त्री सर्व क्षेत्रांत केवळ सहभाग मागत नाही, तर तिने विविध क्षेत्रांत तिची नेतृत्व देण्याची क्षमता सिद्ध केलेली आहे. हा स्त्रीशक्तीचा मोठा प्रवास आहे.

आजच्या पुरुषप्रधान संस्कृती समोर स्त्रीचे नेतृत्व मान्य होणे हे एक आव्हान आहे. क्षेत्र कोणतेही असो अगदी सगळ्यात पुढारलेले आणि नवे असे आय.टी. क्षेत्र जरी असले तरी परिस्थिती अशी आहे, की स्त्रीचे नेतृत्व हे मोकळ्या मनाने आणि भेदभावविरहित वृत्तीने बहुतांश वेळा स्वीकारले जात नाही.

संशोधनातील निष्कर्ष हे सांगतात, की औद्योगिक क्षेत्रात स्त्री नेतृत्व हे अधिक परिणामकारक आहे. पण हे सहजी मान्य होत नाही.

आपल्या सगळ्या विचारमंथनातून आपण खालील मुद्दे लक्षात घेऊया ः

नेतृत्वगुण किंवा अनुयायी असणे हे दोन्ही संपूर्णपणे कर्तृत्वावर ठरायला हवे. त्यात स्त्रीचे नेतृत्व आणि पुरुष नेतृत्व असे विभागले जाऊ नये.

कर्तृत्वाच्या बळावर जर एखादी स्त्री स्वतःला सिद्ध करत असेल, तर तिचे नेतृत्व निःसंकोचपणे आणि दिलखुलासपणे आपण सर्वांनी स्वीकारायला हवे.

यातच संपूर्ण समाजाची प्रगती आहे.

मात्र याची सुरुवात आपण प्रत्येकाने आपल्या घरापासून करायला हवी. शेतीच्या उद्योगात घरातील स्त्रिया – आई, बहिणी, वहिनी, पत्नी, मुलगी – यांना समान संधी मिळेल, प्रयोग करून पाहायला, चुकायला आणि शिकायला वाव मिळेल यासाठी पुरुष शेतकऱ्यांनी प्रयत्नशील राहायला हवं. काही बाबतीत स्त्रिया अधिक समजूतदार, कुशल, ज्ञानी असतील हे उमद्या मनाने मान्य करायला हवं. नेतृत्वाची संधी त्यांनाही बरोबरीने मिळायला हवी. मग केवळ घर-संसार, अपत्य संगोपनच नाही, तर उद्यमशील स्त्री म्हणून आपली गृहलक्ष्मी झळाळून उठेल.

(लेखक प्रथितयश मानसोपचारतज्ज्ञ आणि आय.पी.एच.चे संस्थापक आहेत.)

संशोधन आणि शब्दांकन : डॉ. सुवर्णा बोबडे व शिल्पा जोशी

kartashetkari@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com