Biodiversity Conservation : जैवविविधतेची समृद्धी लाभलेली जहागीरदारवाडी-बारी

Rural Development : महाराष्‍ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाईच्या पायथ्याशी अकोले (जि. नगर) तालुक्यात जहागीरदारवाडी व बारी ही गावे आहेत. विविध वृक्ष, देशी पीकवाण, जीवनसंस्कृती, जैवविविधतेचे येथील ग्रामस्थांनी वर्षानुवर्षे संवर्धन केले आहे.
Rural Development
Rural DevelopmentAgrowon

Village Development Success Story : महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असलेल्या कळसुबाई डोंगराच्या पायथ्याशी जहागीरदारवाडी व बारी (ता. अकोले, जि. नगर) ही दोन गावे आहेत. पूर्वी ग्रुप ग्रामपंचायत होती. आता दोन्ही स्वतंत्र ग्रामपंचायती आहेत. तरीही दोन्ही गावे एकत्र असून, बहुतांश कुटुंबे आदिवासी आहेत. जहागीरदारवाडीची लोकसंख्या १८०० पर्यंत असून, तीनशेच्या जवळपास कुटुंबे आहेत.

पंढरीनाथ खाडे हे उच्चशिक्षित तरुण सरपंच तर रुक्मिणी नामदेव कर्टुले या उपसरपंच आहेत. बारीची चौदाशे लोकसंख्या तर अडीचशेपर्यंत कुटुंबे आहेत. येथे वैशाली खाडे सरपंच तर गणेश किसन खाडे उपसरपंच आहेत. माजी सरपंच हिरामण खाडे यांचेही गावविकासात योगदान आहे. जहागीरदारवाडीचे सुमारे ६७० हेक्टर, तर बारीचे ६२० हेक्टर शिवार आहे. त्यात दीडशे हेक्टर क्षेत्र वन विभागाचे असून उर्वरित बांध, चढउताराचे, डोंगराळ क्षेत्र आहे.

जैवविविधतेचे संवर्धन

-वनखात्याच्या क्षेत्रासह दोन्ही गावांच्या शिवारात असंख्य देशी, दुर्मीळ झाडांची विविधता दिसून येते. येथील आदिवासींनी शंभर वर्षांपासून संवर्धनाची ही परंपरा जपली आहे. विविध आदिवासी कुळांची विविध झाडे ही दैवते आहेत. पर्यटक किंवा कोणाकडूनही झाडांची तोड, नुकसान होऊ नये यासाठी गावकरी दक्ष असतात. बांधावरही विविध फळझाडांची लागवड आहे.

-आदिवासी लोकसंस्कृतीचे जतन केले आहे. राज्यप्राणी शेकरू, बिबट्या, भेकर, तरस, रानडुक्कर, रानससे, नानाविध पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांची विविधता येथील जंगलात आढळते.

-परिसर रानभाज्या व रानकंदांनी समृद्ध आहे. यात चिचुर्डी, कोरडू, घोळ, लोथ, भारंगी, करटुली, अळू, फांदा, बडदा, दिवा, चाईचा कंद, सुरण, मुंगुस कंद, पाचुट कंद आदींचा समावेश आहे.

Rural Development
Sea Diversity : जाणून घेऊ सागराची जैवविविधता...

‘समृद्ध किसान प्रकल्प

अकोले तालुक्यातील आदिवासी भागात अनेक वर्षांपासून ‘बायफ’ आणि ‘एएसके फाउंडेशन यांच्या पुढाकारातून समृद्ध किसान प्रकल्प राबवला जात आहे. त्यातून स्थानिक जैवविविधता व जल संवर्धन, ज्ञान- माहिती संकलन, प्रसार, महिला सबलीकरण, आरोग्य, उपजीविका साधन, शिक्षण, पर्यटन विकास, पशुधनविकास आदी उपक्रम सुरू आहेत. त्यातून शिवाराला समृद्धी येत आहे.

‘फाउंडेशन’चे वरिष्ठ व्यवस्थापक सिद्धार्थ अयर, प्रकल्प समन्वयक शिवाजी आदमाने, ‘बायफ’चे मुख्य तांत्रिक समन्वयक संजय पाटील, जितीन साठे, रामनाथ नवले, विष्णू चोखंडे, योगेश नवले आदींचा यात सहभाग आहे.

याच प्रकल्पाद्वारे जहागीरदारवाडी येथील कळसूबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी शिक्षण मित्र उपक्रम राबवतात. करंज, चिंच, विलायती चिंच, जांभूळ, सुबाभूळ, आंबा, हिरडा, तोरण, गुलमोहर, बहावा, आशिंद, चिल्लर, सिरस, करवंद, मोह, काजू, भोकर, सीताफळ, मोहटे यासह अन्य झाडांच्या मिळून ८७ हजार बियांचे संकलन व रोपण या विद्यार्थ्यांनी केले आहे.

परिसरात उत्पादित भाताच्या सुमारे ५२, नाचणीच्या १९ तर वरईच्या आठ देशी वाणांचे शाळेत जतन केले आहे. त्याचे खुले प्रदर्शन मांडले आहे. या भागात पावसाळ्यात तीन हजार मिलिमीटरपर्यंत पाऊस पडतो. पावसाची नोंदही विद्यार्थी करतात. शाळेसाठी लागणाऱ्या भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यासाठी परसबाग संकल्पना राबवण्यात येते. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असल्याचे प्राचार्य आर. सी. जाधव यांनी सांगितले.

Rural Development
Bio-Diversity : पठारांवरील जैवविविधता संवर्धनाची गरज’

जहागीरदारवाडी, बारी गावांची वैशिष्ट्ये

-दुर्गम भाग असूनही गाव विकासासाठी महिला, पुरुष व तरुणांचे एकत्रित श्रम.

-विकास कामांचा शुभारंभ करण्याचा मान महिलांना.

-पावसाळ्यात प्रचंड पाऊस. या काळात भात हे मुख्य पीक. पाणी साठवणीचे साधन नाही.

जानेवारीनंतर तीव्र पाणीटंचाई. त्यावर उपाय म्हणून यंदा जलजीवन पाणी योजनेचे काम सुरू. गावकरी, ‘बायफ’ यांच्या प्रयत्नातून जुन्या दोन बंधाऱ्याची दुरुस्ती, सलग समतल चर, गॅबियन बंधारे व दगडी बांध करण्यावर भर. आता पाणी उपलब्धता वाढली असून गहू, हरभरा, वाल, चारापिके घेता येऊ लागली आहेत.

- अलीकडे नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक झाली. जनतेतून थेट सरपंच असल्याने सात उमेदवार होते. निकालाच्या आधीच एक दिवस सर्वांनी बैठक घेतली. कोणीही सरपंच झाला तरी विकासासाठी एकत्र येण्याची भूमिका सर्वांनी मांडली. त्यामुळे गावांत एकोपा कायम.

-नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुधारित शेती, भाजीपाला लागवडीतून आर्थिक संधी, पशुधन विकासाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर.

-पेंडशेत, चिचोंडी, बारी, पांजरे, मुरशेत व जहागीदारवाडी या सहा गावांतील १३ सदस्यांनी संयुक्तपणे सह्याद्री कळसूबाई स्थानिक बियाणे संवर्धन समिती स्थापन केली. साडेसातशेहून अधिक सभासद असलेल्या या बियाणे बॅंकेत भाताचे ४४, वाल घेवडा १५, धान्य ३२, कडधान्य १२ व अन्य मिळून १३५ पर्यंत वाणांचे संवर्धन.

भात, नागली, वरई, गहू, हरभरा, मका, उतावळी ज्वारीचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येते. समितीचे सदस्य काशिनाथ खोले सांगतात, की मेळावे, चर्चासत्रे, प्रशिक्षणे असे उपक्रम आम्ही घेतो. महाराष्ट्राच्या विविध भागांतील देशी बियाणे संवर्धक शेतकऱ्यांच्या संपर्कात आम्ही आहोत. त्यातून अन्नसुरक्षा, पोषण आणि वातावरण बदलात तग धरणाऱ्या वाणांचे संवर्धन आणि पुनरुत्पादन आम्ही करतो.

पर्यटनातून रोजगार

कळसूबाई शिखराच्या पायथ्याला दोन्ही गावे असल्याने ‘ट्रेकिंग’, पर्यटनासाठी देशभरातून येथे लोक येतात. जहागीरदारवाडीचे शेतकरी पोपट घोडे, भाऊराव खाडे सांगतात की निसर्ग, शेती आम्हाला जगण्याला ऊर्जा देते. आता रोजगार संधीही निर्माण झाल्या आहेत. पर्यटकांची निवासाची तसेच

जेवणाची सोय केल्याने आर्थिक मोबदला मिळतो. पर्यटक शेतात ‘टेन्ट’ (तंबू) करुण राहण्यालाही प्राधान्य देतात. शेतकऱ्यांनी तंबूही उपलब्ध करून दिले आहेत. जहागीरदारवाडी-बारीच्या तरुणांनी दहा पेक्षा अधिक जणांनी ‘ट्रेकर्स कट्टा ग्रुप स्थापन केला आहे. कळसूबाई शिखरावर पोहोचल्यानंतर

आजारी पडलेल्या अथवा संकटात सापडलेल्या पर्यटकाला सुरक्षितपणे पायथ्याशी आणण्याचे काम हे तरुण करतात. दीड वर्षापूर्वी येथील नाल्याच्या पुरात अडकलेल्या एक हजारांपेक्षा अधिक पर्यटकांची या गटातील सदस्यांनी विनामोबदला सुटका केली होती.

संपर्क ः

पंढरीनाथ खाडे, ८००७५४८७७९

(सरपंच, जहागीरदारवाडी)

पोपट घोडे, ९५५२१७५७१४

रामनाथ नवले, ९२८४५९६१४५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com