Ashadhi Ekadashi 2024 : विठ्ठलची एक देखिलीया..

Ashadhi Wari : आज आषाढी एकादशी. पायी वारी केलेल्या भक्तांच्या मनामध्ये भगवंताच्या भेटीची ओढ असते. महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतूनही अनेक भक्त आज पंढरीत विठुरायाच्या दर्शनाला दाखल होतात. जशी भक्ताला देवाला भेटण्याची ओढ आहे, तशी देवालाही आपल्या भक्ताला भेटण्याची ओढ आहे.
Ashadhi Ekadashi
Ashadhi Ekadashi Agrowon
Published on
Updated on

डॉ. हनुमान गरुड

Pandharpur Wari 2024 :

अवघीच तीर्थे घडली एकवेळा।

चंद्रभागा डोळा देखिलीया।।

अवघीच पापे गेली दिगंतरी।

वैकुंठ पंढरी देखिलीया।।

अवघीया संता एकवेळा भेटी।

पुंडलिक दृष्टी देखिलीया।।

तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक।

विठ्ठलची एक देखिलीया।।

वारी करणारा जो संप्रदाय आहे त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. या संप्रदायाला देव आहे, तीर्थ आहे, संत आहेत, ग्रंथ आहेत, साधना आहे. संत तुकाराम महाराज या अभंगात पंढरपूरमध्ये असलेल्या चंद्रभागासारखे तीर्थ, पंढरीसारखे क्षेत्र, पुंडलिकासारखे संत आणि भगवान विठ्ठल हा देव या सर्वांचं महत्त्व विशेषरूपाने वर्णन करतात.

पंढरपूरला चंद्रभागा तीर्थ आहे. या चंद्रभागा तीर्थाचे वर्णन करताना महाराज सांगतात, चंद्रभागा नुसती डोळ्याने पाहिली तर सर्व तीर्थाचे दर्शन होते, असे सामर्थ्य या तीर्थाचं आहे. कारण सर्वतीर्थ हे स्वतः पवित्र होण्याकरिता दररोज माध्यान्हकाळी चंद्रभागेचे स्नान करण्यासाठी पंढरपूरला येतात, असे प्रत्यक्ष भगवान शंकराने सांगितले आहे. संत तुकाराम महाराज त्याचे वर्णन...

शंकरसांगे ऋषीजवळी।

सकळ तीर्थे माध्यान्हकाळी।

येती पुंडलिका जवळी।

करीती अंघोळी वंदीती चरण।।

...अशाप्रकारे करतात. म्हणून तर

ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर।

ऐसा विटेवर देव कोठे।।

असे या चंद्रभागा तीर्थाचे महत्त्व आहे.

अभंगाच्या द्वितीय चरणात पंढरी क्षेत्राचा महिमा वर्णन करताना नुसती डोळ्याने पंढरी पाहिली तर सर्व पापांचा नाश होतो, असं या क्षेत्राचं महत्त्व आहे किंवा वाचेने पंढरी पंढरी उच्चार केला तरी पापाचा नाश होतो.

पंढरी पंढरी म्हणता। होय पापाची बोहरी।।

अशाप्रकारे या पंढरपूर क्षेत्राचे महत्त्व वर्णन केले आहे. पंढरीक्षेत्राचं माहात्म्य विशेषरूपानं पोहायचं झालं तर...

आधि रचिली पंढरी। मग वैकुंठनगरी।।

जेव्हा नव्हते चराचर। तेव्हा होते पंढरपूर।।

असे पाहावयास मिळते. या संप्रदायाचे देवतीर्थ म्हणजे पंढरी आहे. पंढरी विषयी सांगायचे झाले तर

तुका म्हणे आम्हा अनाथाकारणे।

पंढरी निर्माण केली देवे।।

तसेच ऐका पंढरीचे महिमान राऊळ तितुके प्रमाण तेथील तृण आणि पाषाण ते ही देव जाणावे, अशा प्रकारे केले आहे.

Ashadhi Ekadashi
Ashadhi Wari 2024 : ‘आषाढी’साठी ११ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात

अभंगाच्या तृतीय चरणात संत पुंडलिकांचा अधिकार वर्णन करताना सर्व संतांच्या भेटीचे सामर्थ्य एकट्या पुंडलिकाला डोळ्याने पाहण्यात आहे, अशाप्रकारे करतात. कारण पुंडलिकाने आपल्या मात्यापित्याच्या निकट सेवेमुळे प्रत्यक्ष भगवंताला खेचून आणले.

पुंडलिकाच्या निकट सेवे।कैसा धावे बराडी।।

पुंडलिकाची सेवा पाहून भगवंत बराडी म्हणजे आमंत्रणाविना पंढरपूरला आले. म्हणून पुंडलिकरायाचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत. भक्त पुंडलिकाला डोळ्याने पाहिले तर सर्व संताचे दर्शन होते.

ऐसे संतजन ऐसे हरीदास।

ऐसा नामघोष सांगा कोठे।।

पंढरीमध्ये संतांचा भार आहे. संत जनाबाई वर्णन करतात.

संतभार पंढरीत। कीर्तनाचा गजर होतो।।

अभंगाच्या शेवटच्या चरणात पंढरीच्या देवाचा महिमा वर्णन करताना महाराज म्हणतात, भगवान पांडुरंगाच्या दर्शनात जन्माच सार्थक आहे.

Ashadhi Ekadashi
Ashadhi Wari 2024 : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मेंढी रिंगण सोहळा

तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक।

विठ्ठलची एक देखिलीया।।

भगवान पांडुरंगाला डोळ्याने पाहिलं तर जन्माच सार्थक होईल या प्रकारे भगवान विट्ठलाचा दर्शनाचा महिमा वर्णन करतात. कारण वारकरी संप्रदायाचा देव हा सामान्य देव नसून दैवत आहे. देव सुद्धा ज्याची आराधना करतात असे दैवत आहे. एके ठिकाणी संत तुकाराम महाराज सुखाच्या सागराची देखील उपमा देतात.

सुखाचा सागर उभा विटेवरी।

कृपादान करी तोची एक।।

किंवा माउली वर्णन करतात...

सर्व सुखाचे आगर। बाप रुखमा देवीवर।।

वाळवंटापासून महाद्वारापर्यंत या देवतेच्या दर्शनाला दाटी राहते. वारकऱ्यांचे व्रत म्हणजे...

व्रत एकादशी करीन उपवासी।

गाईन अहर्निशी मुखीनाम।।

एकादशीचं व्रत आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण हा वारकऱ्यांचा विधी आहे. संत तुकाराम महाराज वर्णन करतात.

तुका म्हणे बरे व्रत एकादशी।

केले उपवासी जागरण।।

किंवा

कंठी मिरवा तुळसी। व्रत करा एकादशी।।

हे वारकऱ्यांचे व्रत आहे. अशा या पंढरी क्षेत्राचा महिमा अलौकिक असल्यामुळे

पंढरीशी जारे आल्यानो संसारा।

दिनाचा सोयरा पांडुरंग।।

संत तुकाराम महाराजांनी पंढरीच्या वारीचा सर्वांना आग्रह धरलेला आहे. काय आहे या पंढरीच्या वारीचं औत्सुक्य सर्व जण ही वारी का करतात. देव, संत, ऋषिमुनी, सनकादिक आदी वारी करतात. कारण जशी भक्ताला देवाला भेटण्याची ओढ आहे तशी देवालाही आपल्या भक्ताला भेटण्याची ओढ आहे. म्हणून प्रत्यक्ष भगवान म्हणतात,

आषाढी कार्तिकी विसरु नका मज।

सांगतसे गुज पांडुरंग।।

येथे देव भक्ताच्या भेटीसाठी उभा आहे.

वाट पाहे उभा भेटीची आवडी।

कृपाळू तातडी उताविळ।।

भक्ताच्या अंतःकरणात देखील देवाच्या भेटीची अत्यंत तळमळ दिसून येते.

जावे पंढरीशी आवडे मनासी।

कधी एकादशी आषाढी हे।।

व्यावहारिक उदाहरण द्यायचं झालं तर जसं एखाद्या सासुरवाशिणीला दिवाळी सण आला की माहेरची ओढ लागते, महाराज वर्णन करतात...

दिवाळीच्या मुळा लेकी आसावली।

पाहतसे वाटुली पंढरीची।।

तसं आषाढी एकादशी आली की भक्ताच्या मनामध्ये भगवंताच्या भेटीची ओढ लागते. हा परस्पर अलौकिक प्रेमसंबंध म्हणजे पंढरीची वारी होय. आजच्या आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा, सर्वत्र चांगला पाऊस पडो हीच आषाढी एकादशीच्या निमित्ताने भगवान पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना!

(लेखक कृषी विज्ञान केंद्रात विषय विशेषज्ञ असून ठाकूरबुवाचे आठवे वंशज आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com