Ai in Farming: प्रमुख पिकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्र वापरावे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis: परभणीत पार पडलेल्या संयुक्त कृषी संशोधन समिती बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख पिकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर वाढवण्याचे आवाहन केले.
Joint Agricultural Research Committee meeting
Joint Agricultural Research Committee meetingAgrowon
Published on
Updated on

Parbhani News: शेती क्षेत्रापुढे हवामान बदल आणि कमी झालेले जमीन धारणा क्षेत्र ही दोन मोठी आव्हाने आहेत. कृषी विद्यापीठांनी पिकांचे दर्जेदार वाण विकसित केले आहेत. आता वातावरणातील बदलात तग धरू शकणारे, कीड-रोगास प्रतिकारक पिकांचे वाण विकसित करावे लागतील. ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर फायदेशीर ठरत आहे. कृषी विद्यापीठांनी प्रमुख पिकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता वापराचे मिशन सुरू करून मॉडेल विकसित करावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये गुरुवार (ता. २९) ते शनिवार (ता. ३१) या कालावधीत आयोजित राज्यातील चार कृषी विद्यापीठांच्या ५३ व्या ‘संयुक्त कृषी संशोधन विकास समिती बैठक - २०२५’चे (जॉइंट ॲग्रेस्को) उद्‍घाटन गुरुवारी (ता. २९) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले.

Joint Agricultural Research Committee meeting
AI Farming: पूर्वहंगामी ऊस लागवड ठरेल फायदेशीर

या वेळी ते बोलत होते. कृषिमंत्री तथा कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती माणिकराव कोकाटे अध्‍यक्षस्‍थानी होते. कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, पालकमंत्री  मेघना साकोरे-बोर्डीकर, खासदार संजय जाधव, आमदार सर्वश्री सतीष चव्हाण, डॉ. राहुल पाटील, रत्नाकर गुट्टे, राजेश विटेकर, प्रधान सचिव (कृषी) विकासचंद्र रस्तोगी, कृषी परिषदेचे महासंचालक  रावसाहेब भागडे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, स्वागताध्यक्ष कुलगुरू डॉ. इंद्र मणी, कुलगुरू डॉ. शरद गडाख (अकोला व राहुरी), डॉ. संजय भावे (दापोली), पोकराचे प्रकल्प संचालक परिमल सिंह, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग (वनामकृवि), डॉ. किशोर शिंदे (एमसीएआर), कार्यकारी परिषदेचे सदस्य, कृषी परिषद, कृषी विद्यापीठांचे सर्व संचालक, शास्त्रज्ञ उपस्थित होते. 

श्री. फडणवीस म्हणाले, की पावसाच्या आगमनाच्या वेळेत झालेला बदल, असमान वितरण, पावसाचा खंड यामुळे शेतीतून उत्पन्नाची खात्री राहिली नाही. शेतकऱ्यांना दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हवामान बदलात संरक्षित शेती करण्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागेल. दादा लाड यांच्या सघन कापूस लागवड तंत्रज्ञानामुळे उत्पादकता वाढली.

प्रयोगशील संशोधक शेतकऱ्यांना कृषी संशोधक ही मानद पदवी देऊन गौरव केला पाहिजे. शेतकरी हे देखील शास्त्रज्ञच आहेत. संशोधक शेतकऱ्यांनी विकसित केलेले वाण, विविध शेती, पीक पद्धतीचे प्रमाणिकरण करून ते इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कृषी विस्तार ॲपच्या वापराबद्दल जागृती करावी. शेतीतून खूप अपेक्षा आहेत. केंद्र सरकारने शेतीमालाच्या हमीभावात मोठी वाढ केली. शेतीतील गुंतवणूक वाढवली आहे, असे त्यांनी सांगितले. अविश्वसनीय बियाण्यांमुळे होणारी फसवणूक टाळण्यासाठी ट्रूथफूल बियाणे साथी पोर्टलवर आणावे लागेल असे त्यांनी नमूद केले.

Joint Agricultural Research Committee meeting
AI In Agriculture : शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीबरोबरच शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर प्राधान्याने करावा

जिरायती क्षेत्रातील वाणांवर संशोधन हवे : कोकाटे

राज्यातील अनेक प्रयोगशील शेतकरी कृषी विद्यापीठांच्या पुढे जाऊन संशोधन करत आहेत. त्यामुळे विद्यापीठांनी बदल करण्याची गरज आहे. राज्यातील जिरायती क्षेत्रात येणाऱ्या वाणांवर संशोधन करून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे. कृषी विद्यापीठांचे दर्जेदार वाण संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान आहे. विद्यापीठांच्या वाणांचा प्रचार आणि प्रसार जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये झाला पाहिजे. नवीन आकृतिबंध तयार झाल्यानंतर रिक्तपदांची भरती केली जाईल, असे कृषिमंत्री कोकाटे यांनी सांगितले.

रिक्त पदांची भरती करावी : डॉ. इंद्र मणी

हवामानाकुल शेती पद्धती, यांत्रिकीकरण यावरील संशोधनावर भर दिला जात आहे. रखडलेली पदभरती केल्यास संशोधन, विस्तार, शिक्षण कार्य गतीमान होईल, असे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी सांगितले.

नवीन संशोधनाची दिशा निश्चित करावी : रस्तोगी

कृषी विद्यापीठांनी पारंपरिक शेतीमध्ये कार्य केले आहे. आता ‘एआय’मध्ये मोठे काम करावे लागेल. पारंपरिक विद्यापीठांना बरोबर घेऊन काम करावे लागेल. नवीन संशोधनाची दिशा निश्चित करावी लागेल, असे प्रधान सचिव (कृषी) विकासचंद्र रस्तोगी यांनी सांगितले.

‘विकसित कृषी संकल्प अभियाना’चे  उद्‍घाटन

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे गुरुवार (ता. २९) ते १२ जून या कालावधीत देशभरात विकसित कृषी संकल्प अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचे महाराष्ट्रातील  उद्‍घाटन गुरुवारी (ता. २९) ‘वनामकृवि’मध्ये मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. या वेळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री आशिष जैयस्वाल, पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कुलगुरू डॉ. इंद्र मणी, दादा लाड आदी उपस्थित होते. राज्यात हे अभियान कृषी विभाग आणि ५० केव्हीकेंच्या माध्यमातून ४५०० गावांत तर मराठवाडा विभागात १२ केव्हीकेंच्या माध्यमातून १ हजार ८० गावांमध्‍ये राबविण्‍यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com