
Pune News : राज्यात यंदा मॉन्सूनपूर्व पावसाने घातलेला धुमाकूळ आणि त्यानंतर वेळेआधीच आलेला मॉन्सून यामुळे अनेक ठिकाणी आडसाली ऊस लागवडी संकटात सापडल्या आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) तंत्रावर आधारित चोवीस महिन्यांच्या पीकपद्धतीचा अवलंब करणे फायदेशीर ठरेल, असा सल्ला बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी दिला आहे.
राज्याच्या अनेक भागात वर्षानुवर्षे १५ जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत आडसाली ऊस लागवड पारंपरिक पद्धतीने केली जाते. विशेषतः पुणे जिल्ह्यात सोमेश्वर, माळेगाव, छत्रपती अशा मोठ्या साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी १५ जून किंवा १ जुलैच्या आसपास आडसाली लागवड करीत ‘बेसल डोस’ देतात. त्यामुळे प्रत्यक्ष पाऊस आल्यानंतर पिकाचे चांगले पोषण होते.
मात्र गेल्या काही दिवसांत पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर तालुक्यांत मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेताचे अक्षरशः तलाव झाले आहेत. ऐन उन्हाळ्यात सलग आठवडाभर अतिवृष्टी झाली. त्यामुळे आडसाली लागवडीचे वेळापत्रक कोमलडले आहे. उत्तम जातीचे उसाचे बेणे व रोपे मिळविणे तसेच वेळेत उसाची लागवड होऊन अपेक्षित उगवण होणे ही समस्या होऊन बसली आहे. परिणामी, या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील जवळपास ६० हजार एकर क्षेत्रावरील आडसाली ऊस लागवडीसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हवामानात मोठा बदल झाल्यामुळे पीक पद्धतीच बदलावी लागेल की काय अशी स्थिती आहे. वाफसा नसल्यामुळे आडसाली उसाला अन्नद्रव्ये शोषून घेता येणार नाहीत. विहीर, कुपनलिका, ओढे, नद्या यात रासायनिक खतांचे घटक मिसळल्याने ते दूषित होतील. या स्थितीत आडसाली ऊस उत्पादनापेक्षाही एआय आधारित चोवीस महिन्यांसाठी विकसित नवीन पीक पद्धती व ऊस उत्पादन वाढीचा पर्याय शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकतो, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.
बारामती येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, मायक्रोसॉफ्ट व ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या एकत्रित प्रयत्नातून जगातील दुसरा आणि भारतातील पहिला ए.आय. आधारित उस उत्पादन वाढ प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. अवकाळी किंवा अतिवृष्टीचा विचार न करता ए.आय. तंत्राद्वारे विकसित या पीक पद्धतीचा अवलंब करणे उपयुक्त ठरू शकते.
त्यासाठी प्राप्त परिस्थितीत आडसाली उसाच्या लागवडीसाठी घाई न करता सध्याचा पाऊस थांबल्यावर योग्य वाफसा आल्यानंतर जूनच्या पहिल्या पंधरवड्यात सोयाबीन, उडीद, वाघ्या घेवडा या पिकांची रुंद गादी वाफ्यावर पेरणी करावी. ती सप्टेंबर अखेरीस काढणी योग्य होतील. त्यानंतर पूर्वहंगामी ऊस लागवड करावी. या उसाची बारा महिन्यांत तोडणी झाल्यावर गहू किंवा कांदा किंवा उसाचा खोडवा घेता येईल.
खोडवा पीक घ्यायचे झाल्यास नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी २०२७ पर्यंतचा कालावधी गृहीत धरता एआय तंत्रज्ञानाने पहिल्या ऊस पिकाएवढी उत्पादकता गाठणे शक्य होईल, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. खोडव्यामध्ये पहिल्या उसापेक्षा कमी उत्पादन मिळते, असा समज आहे. परंतु योग्य फुटवे, एकसारखी तूट न पडणे, गरजेप्रमाणे एआयच्या शिफारसींप्रमाणे पाणी, खते यांचा पुरवठा झाल्यास खोडव्याची उत्पादकता सुमारे ३० टक्क्यांनी वाढू शकते, असे त्यांनी सांगितले.
या पीक पद्धतीमुळे शेतकऱ्यांना चोवीस महिन्यांत तीन पिकांचे उत्पादन घेणे शक्य होणार आहे. परंतु हे प्रत्यक्षात येण्यासाठी पूर्वनियोजित आर्थिक तरतूद करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सरकार, साखर कारखाने, बँका आणि शेतकरी यांनी एकत्रित पुढाकार घेऊन तातडीने हा प्रकल्प राबविण्याची आवश्यकता आहे.
ए.आय. आधारित पूर्वहंगामी ऊस लागवडीचे फायदे
• साधारणपणे १२ महिन्यांमध्ये ऊस तोडणीसाठी योग्य होण्याचा अंदाज.
• ऊस उत्पादनामध्ये सुमारे ३० टक्के वाढीची शक्यता.
• जमिनीच्या वाफसा स्थितीमध्ये आणि पिकाच्या गरजेप्रमाणे खतांचा पुरवठा केल्यामुळे उसाची वाढ सतत होऊन रासायनिक खतांमध्ये सुमारे ३० टक्के बचत.
• पाण्याची अंदाजे ४० टक्के बचत. खताचा अतिरिक्त संचय टाळला जाईल.
• जमिनीची सुपीकता, उत्पादकता शाश्वत ठेवण्यास मदत.
• पूर्वहंगामी ऊस तोडणी नंतर खोडव्याचे नियोजन एआय तंत्राने केल्यामुळे उत्पादनात सुमारे ३० टक्के वाढ. खर्चात बचत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.