Water Conservation : गाळाने भरलेले नको, पाझरणारे तलाव हवेत...

प्रत्येक गाव परिसरात एखादा तरी कायमस्वरूपी पाझरणारा तलाव असला पाहिजे. त्यात गाळ उतरणार नाही, यासाठी दूर डोंगर उतारावर भरपूर झाडे आणि गवत खोलपर्यंत रुजलेले असले पाहिजे. त्यासाठी प्रत्येक गावाने, त्यातील शहाण्यासुरत्यांनी आग्रह धरला पाहिजे.
Water Conservation
Water ConservationAgrowon

Water Conservation : पावसाचे पडणारे पाणी (Rain water) अनमोल आहे. त्याच्या प्रत्येक थेंबाचे व्यवस्थापन (Water Management) हे निसर्गानेच अद्ययावत पद्धतीने केले आहे.

मनुष्य हा या निसर्गामधील केवळ एक जैविक घटक आहे. या घटकानेही निसर्ग साखळीचा भाग होऊन जल संवर्धनामध्ये वाटा उचलावा, ही माफक अपेक्षा असते.

चार- पाच दशकापूर्वीपर्यंत हे पाणी व्यवस्थापन हे प्रामुख्याने निसर्गाद्वारेच होत असे. मृग, हस्त, आश्‍लेषा, चित्रा यांसारख्या नक्षत्रांवरील पाऊस जमिनीत मुरत असे.

हळूहळू सर्व तळी, बारव भरून ओसंडून वाहत नद्यांना पूर येई. हे साठलेले पाणी पूर्ण वर्षभर (किमान पिण्यासाठी तरी नक्कीच!) व्यवस्थित पुरत असे. पावसाच्या पाणी व्यवस्थापनामध्ये पाणथळ जागा, घनदाट जंगले, गवताने समृद्ध असलेली गायराने आणि वाहत्या नद्या यांचा मोठा सहभाग असे.

यातील आपल्या भागामध्ये नेमके कोणते घटक कमी झाले आणि ते कोणामुळे कमी झाले याचा विचार केला, तर आपल्याला पाणी व्यवस्थापनाचे सर्वच गणित का बिघडले आहे, ते कळू शकेल. तात्पुरत्या फायद्यासाठी यातील अनेक गोष्टींचा आपण कळत नकळत बळी दिल्याचे स्पष्ट होईल.

आता आपण जलसंधारणाद्वारे पावसाच्या पाण्याच्या संवर्धनाचा प्रयत्न करू पाहतो. त्यासाठी होणारा अफाट खर्च हा अनेक वेळा केवळ निसर्गाला लक्षात न घेतल्यामुळे निष्फळ होतो.

Water Conservation
Water Conservation : ‘तहान’ शब्द जल व्यवस्थापनाशी कसा जोडलेला आहे?

पाझर तलाव ः

पाझर तलाव हा जलसंधारणाचाच एक भाग आहे. या पद्धतीत पावसाचे पाणी साठावे आणि नंतर सावकाश ते पाझरून जमिनीत मुरावे ही साधी सरळ अपेक्षा असते. पाणी मुरण्यामागे गुरुत्वाकर्षणाचा नियम कार्यान्वित असतो.

दुरून पाहताना पाझर तलाव पूर्ण भरलेला दिसला तरी त्यातील किती पाणी भूगर्भात मुरले याचा अंदाज घेण्यासाठी पाझर तलावांच्या खालील बाजूस असलेल्या विहिरी तपासाव्यात. त्या काठोकाठ भरल्या तरच आपले जल व्यवस्थापन योग्य झाले असे म्हणता येते.

पण असे होते का? तर नाही, आणि त्यामागे कारणीभूत ठरतो, तो पाझर तलावामध्ये साठत असलेला गाळ. तो पाण्याला भूगर्भात मुरू देत नाही. म्हणून भरपूर पडलेल्या पावसात तलाव भरून वाहून जातो. आणि जानेवारीपासूनच पाझर तलावांचे रूपांतर डबक्यामध्ये होते.

आता हा गाळ तलावात येतो कोठून? तर वाहत्या पाण्यासोबत येणारी सुपीक माती म्हणजेच गाळ. त्याचे प्रमाण वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे डोंगर उतारावरील नष्ट झालेले जंगल.

अनेक ओढे, नाले, लहान मोठ्या नद्या डोंगरावरून खाली उतरत असताना लहान मोठे दगड धोंडे आणि त्याखालची माती घेऊन खाली भूपृष्ठावर येतात. त्यात उतारावर (भात किंवा अन्य) शेती असेल आणि ती जर रासायनिक पद्धतीची असेल, तर मातीसोबत तीही वाहत येतात.

कोट्यवधी रुपये खर्चून तयार केलेले पाझर तलाव दहा ते पंधरा वर्षांतच गाळाने भरून अकार्यक्षम होतात. वास्तविक तलावाचे आयुष्य किमान ५० ते ६० वर्षे असावे असे गृहित धरले जाते. ही पाणी व्यवस्थापनाची शोकांतिका आहे.

गाळ रोखण्यासाठी, पाणी मुरण्यासाठी...

आज शासन आणि समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून सहभागातून पाझर तलाव, ओढे, नाले खोलीकरण, रुंदीकरण चालू आहे. त्यातील गाळ बाहेर काढला जात आहे. हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे.

पण मुळात हा गाळ कुठून येतो आणि त्याला तिथेच कसे थांबवता येईल यावर अधिक मंथन होण्याची गरज आहे. थोडक्यात, रोगावरील उपचार व्यवस्थित सुरू असला, तरी तो मुळातच का झाला किंवा होतो, याकडे दुर्लक्ष आहे.

पावसाचे डोंगर उतारावरून पाझर तलावाच्या दिशेने येणारे पाणी गाळ घेऊनच येत असल्याचे दिसून आपण त्याला थांबवत नाही. ही मातीची धूप (गाळ) रोखण्यासाठी प्रत्येक डोंगरावर हजारो वृक्ष आणि गवतांची लागवड केली पाहिजे.

Water Conservation
Water Conservation : पूर्व विदर्भातील प्राचीन तलाव संकटात

विशेषतः डोंगरावर नदी, नाले, ओढे यांच्या उगमाच्या प्रदेशात आसपास हजारो वृक्ष व गवताची वाढ करावी लागेल. मगच पाझर तलावामध्ये येणाऱ्या गाळाचे प्रमाण दहा टक्के अथवा त्यापेक्षाही कमी होईल.

पाझर तलावात पाणी प्रवेश करण्यापूर्वी ते जर वाळ्याच्या गवतातून वाहत आले तरी पाणी स्वच्छ होते. वाळ्याची मुळे घनदाट आणि तंतुमय असल्याने एक प्रकारे चाळणीप्रमाणे कार्य करतात.

भूगर्भात पाणी मुरविण्यामध्ये देशी गांडुळे महत्त्वाची भूमिका निभावतात. पाझर तलावामधील गाळ काढून त्याचे खोलीकरण झाल्यावर त्या गाळामध्ये देशी गांडुळे सोडल्यास ती जमीन सच्छिद्र करतात.

त्यांनी खोलपर्यंत केलेली हजारो उभी छिद्रे पाणी खाली घेऊन जातात. पाझर तलाव किंवा त्या खालील बाजूंच्या विहिरीमध्ये पाणी उतरू लागते. या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जिवामृताचा वापर केला तरी देशी गांडुळांची संख्या वाढू शकते.

Water Conservation
Water Conservation Scheme : जल संवर्धन योजनांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल

पारंपरिक जोहड पद्धती ः

हरियाना आणि राजस्थानमधील अल्वर जिल्ह्यामधील पाणीटंचाई असणाऱ्या अनेक गावांमध्ये मला जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली.

अरवली पर्वतरांगांच्या उतारावर पडणारा सर्व पाऊस वाहून जाई. प्रतिवर्षी पायथ्याशी असलेल्या अनेक गावात पाण्याची भीषण टंचाई होते. पूर्वी या पर्वतरांगांमध्ये पावसाचे पाणी अडविण्यासाठी ‘जोहड’ पद्धती होती. जोहड म्हणजे लांब, रुंद आणि खोल असलेले मोठे मोठे चर.

विकासाच्या प्रक्रियेमध्ये बांधकामासाठी नद्यांमधील वाळू वापरून संपल्यानंतर अरवली पर्वत फोडून त्यापासून वाळूनिर्मिती केली जाऊ लागली. तीन दशके अव्याहत सुरू असलेल्या या निसर्ग विरुद्ध प्रक्रियेत अनेक जोहड नष्ट झाले, काही बुजून गेले. पाणीटंचाई सुरू झाली. गावामध्ये पाण्याचे टॅंकर आले.

Water Conservation
Water Conservation : जलसंधारणासाठी पाझर तलाव का आहेत महत्त्वाचे ?

कुणा एकाच्या शेतात असलेल्या बोअरवेलला एखादी कळशीभर पाणी मिळावे, यासाठी ३ ते ४ कि.मी. पेक्षाही अधिक पायपीट सुरू झाली. त्यावर तात्पुरत्या बोअरवेलची संख्या वाढवून काय उपयोग? यातूनच ‘जोहड’चा पुनर्जन्माला चालना मिळाली.

अनेक ठिकाणी गावामधील वृद्ध लोकांच्या मदतीने जुने जोहड शोधून काढले गेले. त्यातील गाळ, दगड बाहेर काढले गेले. भूगर्भात पाणी असलेल्या जागा शोधून नवीन जोहड तयार केले जाऊ लागले.

आज असे अनेक जोहड पावसाचे पाणी पकडून साठवत आहे. ते गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार भूगर्भात मुरून जमिनीखालून गावपातळीपर्यंत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पावसाचे पाणी असे भूगर्भात मुरले असले तर गाव परिसरात ‘बोअर’ला जेमतेम शंभर फुटावरच पाणी लागते. शेतामधील विहिरी, गावामधील आड यातही शाश्‍वत पाणी उतरते.

हे अल्वरमधील अनेक प्रयोगातून सिद्ध झाले आहे. ‘जोहड’ या पारंपरिक पाणी व्यवस्थापन पद्धतीमध्ये शेती पिकांचे सिंचन आणि पाळीव प्राण्यांच्या पाण्याचा प्रश्‍न सहज सुटून जातो.

हरियानामधील सध्याच्या अशा जोहडांचे पुनरुज्जीवन आणि नवनिर्मितीतून या वर्षीच्या पावसाळ्यात १५० दशलक्ष लिटर पावसाचे पाणी साठविण्याची क्षमता निर्माण होणार आहे.

या प्रयत्नातून अरवली पर्वतरांगात हरित क्षेत्र तर वाढेलच त्याच बरोबर कितीतरी वन्य जिवांची, पक्ष्यांची तहान भागणार आहे.

जमिनीखालील पाणी स्रोत मजबूत होऊन वाहू लागतील. ५० टक्के नापिक जमीन पुन्हा लागवडीखाली येईल. विहिरींना दोन मीटर तरी पाणी निश्‍चित वाढेल.

त्यामुळे रब्बी पिके आणि एखाद्या संरक्षित पाण्यावर उन्हाळी पिके शेतकऱ्यांना घेता येतील. पाण्याअभावी होणारे स्थलांतर थांबेल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्त्रियांची पाण्यासाठी सुरू असलेली वणवण कायमची थांबेल.

जोहड ही पर्वतराजीमधील पावसाचे पाणी अडवून साठविण्याची हजारो वर्षांची पारंपरिक पद्धती आहे.

ती हरियाना आणि राजस्थानमध्येच पाहावयास मिळते. या ठिकाणी अजून एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते, ती म्हणजे गाळ आणि त्याचे व्यवस्थापन. पाणी व्यवस्थापनाची यशोगाथा लिहिण्यासाठी तुम्हाला वृक्षांची साथ घ्यावीच लागेल.

त्यांच्या साह्याने मातीची धूप, पर्यायाने गाळ या काळ्याकुट्ट राक्षसास पाण्यापासून कायम दूर ठेवावे लागेल. यासाठी हजारो लाखो हातांनी एकत्र यावे लागेल, कारण पाणी व्यवस्थापनासाठी एकीचे बळ हवे, ते एकट्यादुकट्याचे काम नव्हे!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com