Water Conservation : जलसंधारणासाठी पाझर तलाव का आहेत महत्त्वाचे ?

पाझर तलावाचे मुख्य कार्य म्हणजे त्यामध्ये साठविलेले पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढविणे. पाझर तलाव हा सच्छिद्र भूभागावर बांधला, तरच त्याचे फायदे मिळू शकतात. ज्या ठिकाणी पाझर तलावाचे बांधकाम असते, त्या ठिकाणी जमिनीचा थर पाझरास योग्य असावा लागतो.
Water conservation
Water conservationAgrowon

डॉ. सचिन शिंदे, प्रा. प्रवीण मताई

Water Management : येत्या काळात उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे नियोजन काटेकोरपणे व कौशल्याने करावे लागणार आहे. काही वेळेस पाऊस पडतच नाही, तर कधी-कधी तो ऐन मोक्याच्या वेळेस ताण देतो. अशा वेळेस संरक्षित सिंचनाच्या आधारे पिकांना वाचवावे लागते.

शेततळ्याच्या उपाययोजनेमुळे संरक्षित पाणी देणे शक्य असल्याने पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमामध्ये ही उपाययोजना महत्त्वाची समजली जाते.

पाझर तलाव

पाझर तलाव म्हणजे नैसर्गिक नाला अथवा ओढ्यावर आडवा बांधलेला आणि पाणलोटक्षेत्रातून गोळा होणारा प्रवाह अडवून तो जास्तीत जास्त दिवस साठवून, तो जमिनीत मुरवून त्या क्षेत्रातून भूजलाची पातळी वेगाने वाढविणाऱ्या बंधाऱ्यामुळे तयार होणारा जलाशय.

पाणलोटक्षेत्रात वाहून जाणारे पाणी अडविले जाऊन शेतीकरिता व त्या क्षेत्रातील भूजल पुनर्भरणाकरिता त्याचा वापर होऊ शकतो.

पाझर तलावामुळे पाण्याबरोबर वाहून जाणारी सुपीक मातीदेखील अडविली जाते. जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी दुष्काळी प्रदेशात पाझर तलावाचे बांधकाम करतात.

पाझर तलावाचे बांधकाम करताना अशा पद्धतीने करावे की, पावसाळ्यात तलाव संपूर्ण भरावा आणि हिवाळ्यापर्यंत सर्व पाणी पाझरून/ मुरून आजूबाजूच्या विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते. ज्या ठिकाणी पाझर तलावाचे बांधकाम असते, त्या ठिकाणी जमिनीचा थर पाझरास योग्य असावा लागतो.

Water conservation
Ground Water Management : भूजलाचे व्यवस्थापन आव्हानात्मक : जोशी

तांत्रिक दृष्टिकोनातून पाझर तलावांचे नियोजन

पाझर तलावाचे मुख्य कार्य म्हणजे त्यामध्ये साठविलेले पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढविणे. पाझर तलाव हा सच्छिद्र भूभागावर बांधला, तरच त्याचे फायदे मिळू शकतात. म्हणून पाझर तलाव हा एखाद्या भारी अथवा अभेद्य जमिनीवर बांधू नये, की ज्यामुळे पाझर तलावाच्या मुख्य कार्याला बाधा होईल.

पाझर तलाव अशा ठिकाणी बांधावा, की तेथील जमिनीचा वरचा थर सच्छिद्र असेल आणि त्याखालच्या कमीत कमी तीन मीटर जाडीचा थर हा जास्तीत जास्त झिजलेला असेल. अशा प्रकारच्या जमिनीवर बांधलेल्या तलावामुळे भूजल पुनर्भरणाचा वेग वाढतो.

पाझर तलावाच्या खालच्या बाजूला अथवा परिणाम क्षेत्रात पिकायोग्य जमीन मोठ्या प्रमाणात असणे आवश्‍यक आहे. अशी मोठ्या प्रमाणातील शेतजमीन असल्याने पाझर तलावाचा जास्तीत जास्त उपयोग करून शक्‍य होते.

त्याचप्रमाणे या भागात अनेक विहिरी असणे किंवा नवीन विहिरी खोदण्यालायक क्षेत्र असणे गरजेचे आहे, की जेणेकरून त्या भागाला सिंचनाखाली आणणे सहजशक्‍य होईल. लहानात लहान पाझर तलावाच्या क्षेत्राची लांबी एक किमी असते.

पाझर तलावामध्ये जास्त होणारे पाणी काढून टाकण्यासाठी सांडव्याची साधी, आर्थिकदृष्ट्या परवडणारी आणि कार्यक्षम व्यवस्था करता येणे भौगोलिकदृष्ट्या शक्‍य व्हावयास हवे.

Water conservation
Water Shortage In Maharashtra : राज्यात पाणीपुरवठ्यासाठी धावताहेत १०१ टॅंकर, पाणीटंचाईच्या झळा

पुरेशा सच्छिद्र भूस्तरावर पाझर तलाव बांधताना तो एखाद्या खोल दरीसारख्या भागात बांधावा, जेणेकरून खोल तळे तयार होईल. पाणी कमीत कमी क्षेत्रावर पसरेल. उथळ तळ्यापेक्षा असे खोल तळे तयार केल्याचे दोन फायदे आहेत. एक म्हणजे ऊन-वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारे पाण्याचे बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.

कमीत कमी जमीन पाण्याखाली बुडते. दुसरा फायदा म्हणजे तलावातील पाणी अडविण्याकरिता निवडलेले क्षेत्र जर पुरेसे सच्छिद्र नसेल तर त्याचे साठवण क्षेत्र वाढवावे, ज्यायोगे अधिक पाणी जमिनीत मुरू शकेल.

ज्या पाणलोटक्षेत्रामधून पाझर तलावामध्ये पाणी येणार आहे, त्यात योग्य प्रमाणात झाडेझुडपे व गवत असावे, की ज्यामुळे मातीची धूप होणार नाही. जर अशा प्रकारची व्यवस्था नसेल, तर त्या पाणलोटक्षेत्रात मृद्संधारणाची कामे हाती घ्यावीत; अन्यथा ती वाहून आलेली माती पाझर तलावात साठून त्याची साठवणक्षमता कमी होऊ शकते.

पाझर तलावाचा भराव तयार करण्याकरिता योग्य प्रकारची माती इतर बांधकाम साहित्य त्या क्षेत्रातच उपलब्ध होणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहे. बाहेरून साहित्य वाहून आणून भराव तयार करण्यामुळे खर्चात अनावश्‍यक वाढ होऊ शकते.

संपर्क - डॉ. सचिन शिंदे, ९४२१६१८७९०, (विषय विशेषज्ञ, कृषी अभियांत्रिकी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, लातूर)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com