Book Review: बांधावरच्या झाडांची सर्वांगसुंदर माहिती

Bandhavarchi Zad: ‘बांधावरची झाडे’ हे पुस्तक निसर्गप्रेमी, शेतकरी, आणि साहित्यप्रेमींसाठी ज्ञानाची खाण आहे. डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी बोर, हादगा, जांभूळ, शेवगा, आंबा, कडुनिंब यांसारख्या झाडांचे वैज्ञानिक, औषधी, सांस्कृतिक आणि साहित्यिक महत्त्व प्रभावीपणे मांडले आहे.
Bandhavarchi Zad
Bandhavarchi ZadAgrowon
Published on
Updated on

डॉ. सविता पाटील

Book Review: पुस्तकाचे नाव : बांधावरची झाडे

लेखक : डॉ. व्ही. एन. शिंदे

प्रकाशक : मनोविकास प्रकाशन, पुणे

पाने : २००

किंमत : रु. २६०

लेखकाने बोर, हादगा, जांभूळ, शेवगा, चिंच, आंबा, आवळा, लिंब, बाभूळ आणि साग या झाडांची या पुस्तकात नव्याने ओळख करून दिली आहे. ही तशी आपल्याला माहीत असलेली झाडे. मात्र त्यांची फक्त ओळख, शास्त्रीय माहिती नव्हे तर सर्वांगाने अपरिचित बाबींची माहिती या पुस्तकात मिळते; ती पण अतिशय रंजक स्वरूपात. उदाहरणार्थ, सर्वगुण संपन्न बोर आपल्याला या पुस्तकात भेटते.

Bandhavarchi Zad
Book Review: महाराष्ट्रातील (बे) रोजगारीचा ताळेबंद

बोराची शास्त्रीय माहिती, भारतीय, प्रांतिक, तसेच परदेशी नावे, बोराचे औषधी उपयोग आपल्याला समजतात. शेतकऱ्यांसाठी तसेच निसर्गचक्रात अत्यंत महत्त्वाचे स्थान असणारी बोर, जरी दूर बांधावर असली तरी ती मानवाच्या किती जवळची आहे, याची जाणीव होते. हीच अनुभूती आपल्याला हादगा या झाडाची माहिती वाचताना येते. एखाद्या सौंदर्यवतीचे वर्णन करावे, तसे लेखक हादग्याच्या झाडाबद्दल लिहितो. हादगा आणि पारंपरिक खेळ याची उत्तम माहिती लेखकाने दिली आहे.

अवास्तव अपेक्षा न ठेवता मानवाला शंभर टक्के सहकार्य करणारे झाड म्हणजे जांभूळ. जांभळाच्या झाडाभोवती लेखक चौफेर बागडतो. त्याच्या गुणामुळे जांभूळ हा मायानगरीतपण महत्त्वाचा वृक्ष ठरतो. झाडांचे हे विविधांगी वर्णन आपल्या ज्ञानात भर घालते.

शेवगा, चिंच ही झाडे किती पौष्टिक आहेत हे या पुस्तकामुळे समजते. विशेषतः ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’ ही म्हण प्रचलित होण्यामागील दंतकथा रोचक आहे. आंबा हे विशेष आवडणारे फळ आहे. आंबा हे उन्हाळ्यात खाण्याचे फळ आहे, या पलीकडे जाऊन आंब्याची अनेक रूपे आपल्याला या पुस्तकातून दिसतात. काव्यातील आंबा, कथेतील रूपकात्मक आंबा किंवा मँगो डिप्लोमसी अशी सर्व रूपे वाचकाच्या मनाला भावतात.

Bandhavarchi Zad
Book Review : ग्रामीण जीवनावरील आर्थिक विचारांचा प्रखर झोत

या लेखात पौराणिक काळापासून ते आताच्या फेसबुकपर्यंतचे सर्व संदर्भ येतात. बहुगुणी आवळा आणि नावात कडू असला तरी गुणांमुळे आपल्या फार जवळचा असणारा आणि खूप प्रेम करण्याजोगा कडुनिंब यांची रोचक माहिती मिळते. बाभूळ आणि साग यांचा बांधकामासाठी उपयोग होतो एवढीच त्रोटक माहिती असलेल्यांसाठी त्यांची वेगळी रूपे आणि फायदे समजतात.

या सर्व लेखांमध्ये शब्दांची गुंफणही एका धाग्यातूनच येते. जसे की झाडांबद्दल लिहिताना सर्वप्रथम झाडांची विविध प्रकारची नावे, त्याची उत्क्रांती, वैज्ञानिक माहिती, झाड बहरण्याची प्रक्रिया, त्याचे जीवशास्त्रीय महत्त्व, झाडांचे व्यावसायिक उपयोग, झाडाचे साहित्यातील स्थान, झाडांपासून बनणाऱ्या विविध पाककृती, तसेच पौराणिक/दंत कथा, झाडाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आणि लेखकाचे झाडाशी असलेले विशेष ममत्व असे पैलू उलगडत जातात. यामुळेच सुशिक्षित वाचकांपासून ते थोडी चार बुकं शिकलेला वाचकसुद्धा पुस्तकात रमून जातो. विशेष म्हणजे लेखकाने झाडांना दिलेली शीर्षके (वेडी नव्हे शहाणी बाभूळ, गोड कडुनिंब, कणखर साग) ही आकर्षक आणि वेगळी असून ती त्या त्या झाडांना चपखल बसतात.

हे पुस्तक शेतकरी, लोककला आणि संस्कृती अभ्यासक, आयुर्वेदाचे अभ्यासक, आहार तज्ज्ञ, साहित्य अभ्यासक यांच्यासह लहान मुलांना जवळचे वाटणारे आणि संदर्भ ग्रंथ म्हणून मार्गदर्शक ठरणारे झाले आहे. पुस्तकाच्या सुरुवातीस असलेली कवी वसंत आबाजी डहाके यांची त्यांच्याच अक्षरात असलेली कविता वाचताना मन प्रसन्न होते. तसेच ती विचार करायला भाग पाडते. प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांनी पुस्तकाला प्रस्तावना लिहिलेली असून, त्यांनी लेखकाला ‘झाड कवेत घेणारा माणूस’ अशी नवीन ओळख दिली आहे. रणधीर शिंदे यांनी ब्लर्ब लिहिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com