
Book :
काही आर्थिक काही सामाजिक
लेखक : स. ह. देशपांडे
प्रकाशक : मौज प्रकाशन, मुंबई
पाने : १६८
मूल्य : १५० रुपये
सखाराम हरी देशपांडे यांची नुकतीच (२१ डिसेंबर २०२४) जन्म शताब्दी पार पडली. सामान्यतः स. ह. देशपांडे या नावानेच ते ओळखले जात. अर्थशास्त्राचे प्राध्यापक, ‘समाज प्रबोधन पत्रिके’चे संपादक, ‘ग्रामायन’चे संस्थापक-सदस्य यासोबतच मार्क्सवादी विचारवंत अशी त्यांची सुरुवातीची ओळख. आयुष्याच्या पुढील टप्प्यावर त्यांनी हिंदुत्व, धर्मनिरपेक्षता या विषयांवर साधार, मूलग्राही लेखनही केले.
राष्ट्रवाद किंवा राज्यसंस्था या धर्मनिरपेक्ष असल्या पाहिजेत, हे त्यांना मान्य असले, तरी हिंदुत्ववादाचा विचारही ते तितक्याच तडफेने कसे मांडू शकतात, असा प्रश्न सर्वांनाच पडत असे. (ते सावरकरांच्या हिंदुत्वाच्या अत्यंत जवळचे.) त्यामुळे त्यांच्यावर बहुतांश समकालीनांनी टीका केली. त्याचे उत्तर मला त्यांच्याच एका निबंधात मिळाले. अखिल मानवतेचा किंवा समाजांतर्गत एकत्वाची भावनेचा विचार करताना आपण आधी जिवंत राहिलो पाहिजे.
त्यांच्या मते हे जिवंतपण केवळ शारीरिक नव्हते, तर सामाजिक, सांस्कृतिक आणि सर्व पातळ्यांवरील असले पाहिजे. राष्ट्रावरील निष्ठा म्हणजे केवळ भूमीवरील निष्ठा नव्हे, तर येथील माणसांप्रतीची निष्ठा, प्रत्येक प्रादेशिक ओळख, अस्मितेप्रतीची निष्ठा त्यांना अपेक्षित होती. म्हणूनच राष्ट्रवाद हा धर्मनिरपेक्ष असला तरी त्यांना तो संस्कृतीनिरपेक्ष असणे अभिप्रेत नव्हते. भारतातील हिंदू - मुस्लिम प्रश्न हा सनातन आहे.
कारण या दोन संस्कृतींमधील भेद इतके तीव्र आहेत, की ते एकमेकांत मिसळण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे ते मुस्लिम समाजाला राष्ट्रीय जीवनात सामावून घेण्याचा आणि त्याच वेळी त्यांच्या तीव्र आणि एकांगी विचारांचा सामना करण्यासाठी जिवंत राहण्यासाठी हिंदू संघटनेचा विचार मांडतात. त्यांचे बाकीचे समकालीन विचारवंत केवळ मुस्लिम प्रश्नांची मीमांसा करण्यापर्यंतच येऊन अडकले होते. त्या वेळी त्याही पुढे जात स. ह. देशपांडे हिंदू संघटनांची आवश्यकता प्रतिपादनापर्यंत पोहोचले होते. अन्य लोक त्यांच्यावर कितीही टीका करोत, पण हीच त्यांची वैचारिक महत्ता होती.
मौज प्रकाशनाद्वारे प्रकाशित ‘काही आर्थिक काही सामाजिक’ या पुस्तकामध्ये एकूण पाच निबंध आहेत. त्यातील पहिले चार हे सामाजिक अनुषंगाने अर्थशास्त्राचे विश्लेषण करणारे आहेत, तर पाचवा हा सामाजिक भ्रमंतीतील टिपणे असा आहे. त्यातील पहिले दोन निबंध मार्क्सवाद आणि सामाजिक न्याय या विषयावरील आहेत. तिसरा निबंध ‘जात : अर्थ व अनर्थ’ जातिव्यवस्थेचे अर्थशास्त्रीय विश्लेषण व त्यातून निघणारी सामाजिक व नैतिक स्वरूपावर भाष्य करतो.
चौथा निबंध ‘विकास की दारिद्र्य पूजा’ या नावाने असून, प्रामुख्याने ग्रामीण भागात स्वयंस्फूर्तीने काम करणाऱ्या संस्थांमधील कार्यकर्त्याच्या मनात असणारा विकासाविषयीच्या कल्पना व त्याच्या मर्यादा या विषयी भाष्य करतो. पाचवा निबंध ‘भ्रमंतीतील सामाजिक टिपणे’ असा आहे. त्यात वेगवेगळ्या समाजातील विशेषतः आदिवासी व दलित आणि अस्पृश्यता, ग्रामीण जीवनातील जातिसंस्था) आणि राष्ट्रीय भावना अशा विस्तृत विषयांवरील टिपणे आहेत.
अनेक अर्थ विचारांबाबत ते मार्क्सचे कठोर टीकाकारही होते. पण ही टीका केवळ दोष दाखवून थांबणारी नव्हती, तर ते कसे दूर करता येईल, येथपर्यंत जाणारी असल्याने अत्यंत सकारात्मक होती. भारतीय समाजाच्या बाबत मार्क्सचा विचार का अपुरा ठरतो, याचे विवेचन ते करतात. युरोपमधील वर्ग व्यवस्थेवर त्यातही मालक (भांडवलदार) आणि कामगार यांच्या संबंधावर आधारीत दारिद्र्य वेगळे आणि भारतातील धर्मांतर्गत जाती व्यवस्थेच्या अभेद्य व्यवसाय व उच्चनीचतेच्या चौकटीमुळे निर्माण झालेले दारिद्र्य वेगळे हे ते स्पष्ट करतात.
त्यामुळे येथील दारिद्र्य विचाराची मीमांसा करण्यात मार्क्स पुरेसा ठरत नाही, असे ते म्हणतात. अनेक वेळा एखाद्या मुद्यांबाबत ते चाचपडताहेत असे वाटले तरी त्यांच्या विचारांमध्ये असलेली एक प्रकारची पारदर्शकता आणि स्पष्टता आपल्याला थक्क करते. प्रत्येक विचार (मग तो आपल्याला पटलेला असला किंवा नसला तरी) अत्यंत बारकाईने, सखोलपणे, फोड किंवा विश्लेषण करत नेमकेपणाने कसा वाचायचा, याचा परिपाठच त्यांच्या पुस्तकातून मिळतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.