
Success Story : नांदेड जिल्ह्यात डोंगराळ भाग असलेल्या रेणापूर (ता. भोकर) येथील सुनीता अशोक कावळे यांच्या कुटुंबाची शिवारात सहा एकर जमीन होती. परंतु १९९४-१९९५ मध्ये भोकर तालुक्यात झालेल्या सुधा प्रकल्पामध्ये त्यांची सर्व जमीन संपादित झाली. भरपाई काहीच मिळाली नाही. कुटुंब भूमिहीन झाले.
परंतु सुनीता हिंमत हरल्या नाहीत. त्यांनी शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योगातून घरची प्रगती करायचा निश्चय केला. सन २००७ मध्ये तशी संधीही चालून आली. या काळात भोकर तालुका मानव विकास कार्यक्रमात समाविष्ट झाला. त्यामध्ये स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी विविध प्रशिक्षणकार्यक्रम राबविण्यात येऊ लागले. त्याचाच भाग म्हणून २००७ मध्ये आवळा प्रक्रियेबाबतएक महिन्याचे प्रशिक्षण नांदेडला आयोजित झाले. त्याचा लाभ सुनीता यांनी घेतला.
प्रक्रिया उद्योगाची वाटचाल
प्रशिक्षणानंतर नांदेड बाजारातून आवळा घेत घरगुती स्तरावर प्रक्रिया उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली. भोकरसह विविध स्टॉल्सच्या माध्यमातून बाजारपेठ मिळविण्यास सुरुवात केली. पुढे २०११ मध्ये भोकर तालुक्यातून सुनीता यांची आवळा प्रक्रिया उद्योगातील ‘मास्टर ट्रेनर’ अशी निवड झाली. सन २०१४ पर्यंत ही जबाबदारी सांभाळत विविध संस्थांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केले. अर्थात, त्यासाठी मानधनाचा आर्थिक स्रोतही त्यांना देण्यात आला. सन २०१४ व २०१५ मध्ये काही वैयक्तिक अडचणींमुळे घरच्या पदार्थनिर्मितीला काहीसा खंड द्यावा लागला.
पुन्हा उमेदीने सुरुवात
सुनीता यांनी २०१६ मध्ये पुन्हा नव्या उमेदीने उद्योगाला सुरुवात केली. त्यांना तत्कालीन आमदार श्रीमती अमिता चव्हाण यांनी प्रोत्साहन दिले. बाजारातील मागणी ओळखून टप्प्याटप्प्याने उत्पादनांच्या श्रेणीत एकेक पदार्थाची वाढ होऊ लागली. बाजारपेठेचा आवाका येऊ लागला उत्पादनांची निर्मिती, ‘मार्केटिंग’, पॅकिंग, विक्री परवाने, अन्न सुरक्षा प्रमाणपत्रे यांच्या अनुषंगाने मनुष्यबळाची आवश्यकता होती.
त्यासाठी सुनीता यांनी गावातील महिलांना सोबत घेऊन मीराबाई स्वयंसाह्यता समूहाची स्थापना केली. पुढील दोन वर्षे कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. या काळात उद्योगाला पुन्हा थोडा पायबंद बसला. परंतु या काळात आरोग्याच्या दृष्टीने आवळ्याचे महत्त्व वाढले. आणि त्यावर आधारित उत्पादनांनामागणीही वाढली.
आजचा विस्तारलेला उद्योग
आज आवळ्यावर आधारित सुमारे ११ ते १२ प्रकारची उत्पादने अन्नपूर्णा ब्रॅण्डने तयार होतात.
ती पुढीलप्रमाणे-
शुगर व शुगर फ्री, गूळयुक्त कॅण्डी
खट्टा-मीठा मधयुक्त मुरब्बा (यास मोठी मागणी).
मोरावळे- दोन प्रकार - साखरयुक्त व गूळयुक्त.
लोणचे - मसालायुक्त व साधे.
सुपारी
आवळ्यावर आधारित मेंदी (केसांना लावण्यासाठी)
ज्यूस
मंजन- (तुरटी, मिरीसह)
पावडर
तेल
उत्पादन प्रकारानुसार प्रति किलो ३०० रुपयांपासून ते ६००, ८०० रुपयांपर्यंत दर आहेत.
प्रक्रियांसाठी लागणारा आवळा आज अंबड (जि. जालना) येथील शेतकऱ्यांकडून पाच हजार रुपये प्रति क्विंटल दराने घेण्यास सुरुवात केली. हा दर ठरला असल्याने बाजारातील दर वाढणे किंवा कमी होणे या बाबीचा त्यावर परिणाम झाला नाही. हैदराबाद येथूनही डोंगरी आवळा घेण्यात येतो. आवळ्याची गुणवत्ता चांगली असल्याने उत्पादनांचा दर्जाही चांगला वाढवता येतो.
एकीचे बळ लाभले
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत समूहाची नोंदणी, ‘उमेद’ संस्थेकडून ‘अन्न सुरक्षितता’ (एफएसएसएआय) परवाना या बाबींमुळे उत्पादनांना बाजारपेठ मिळणे शक्य झाले. मुंबई येथील महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे व्यासपीठ मिळाले. समूहातील महिलांना कामांचे वाटप केल्यानेनिर्मितीत गती आली. आज सुनीता समुहाच्या अध्यक्षा तर सुजाता गायकवाड (उपाध्यक्षा) आहेत. समूहाचे भोकर येथील भारतीय स्टेट बँकेत खाते आहे. शिवाय ‘उमेद’कडून चाळीस हजाररुपयांचा फिरता निधी मिळाला आहे. त्यातून पॅकिंग, साहित्य, छपाई, वितरण व्यवस्था उभारणे शक्य झाले.
यशस्वी करिअर घडवले
एकेकाळी भूमिहीन असलेल्या सुनीता यांनी प्रक्रिया उद्योजक म्हणून स्वतःला घडवत आपल्या कुटुंबाचे अर्थकारण उंचावले आहे. तीनही मुलांचे शिक्षण या उद्योगातून करून त्यांना आपल्या पायावर उभे केले. मुलगा अजय ‘सॉप्टवेअर’चे शिक्षण घेत आहे. त्याला ‘गोल्ड मेडल’ मिळाल्याचे मोठे समाधान सुनीता यांना आहे. दोन मुलींचे विवाह देखील याच उद्योगातून केले. सुमारे दहा निराधार, विधवा महिलांना रोजगार दिला. दोनहजार महिलांना ‘मास्टर ट्रेनर’ म्हणून प्रशिक्षण दिले आहे.
उलाढाल वाढली
सन २०२२ मध्ये ५७७ किलो आवळ्यापासून विविध उत्पादने तयार झाली. स्थानिकसह विविध प्रदर्शनांमधून सुनीता व त्यांची टीम आपली उत्पादने सादर करू लागली. गोवा, सिंधुदुर्ग, केरळ या ठिकाणीही सहभाग घेतला. सुनीता सांगतात की एकेकाळी पाचशे रुपयांपासून सुरुवात केली होती. आता मागील वर्षी मुंबई येथील महालक्ष्मी सरस विक्री प्रदर्शनात नऊ लाखांची तर एकूण १२ लाखांच्या उलाढालीपर्यंत मजल मारली आहे. सध्या प्रदर्शनांसह पंचायत समिती, जिल्हा परिषद, त्या अंतर्गत शाळा, ग्रामोद्योग, बॅंका येथील अधिकारी उत्पादनांचे ग्राहक झाले आहे. सुनीता यांचे पती घरपोच माल पोचवण्याबरोबर अन्य कामांतही मोठी मदत करतात.
सुनीता कावळे ८३२९७०५६६६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.