Pandharpur News : कार्तिकी यात्रेनिमित्त वाखरी येथील पालखीतळावर यंदा जनावरांचा बाजार भरला आहे. तब्बल तीन वर्षांनंतर भरलेल्या या जनावरांच्या बाजारात चार हजारांहून अधिक खिलार जनावरे विक्रीसाठी दाखल झाली आहेत.
दरम्यान, लम्पी स्किनच्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रत्येक जनावराची आरोग्य तपासणी करूनच त्यांना बाजारात दाखल करून घेण्यात येत आहे. या बाजारात सर्वाधिक खिलार जनावरांची खरेदी-विक्री होते, हे या बाजाराचे वैशिष्ट्य आहे.
कार्तिकी यात्रेनिमित्त भरणाऱ्या जनावरांच्या बाजाराला मोठी परंपरा आहे. भारतातील सर्वात मोठा खिलार जनावरांचा बाजार म्हणून हा बाजार प्रसिद्ध आहे. या बाजारामध्ये खिलार गाई, खिलार खोंड, खिलार बैल व पंढरपुरी म्हैस यांची कोट्यवधी रुपयांची खरेदी-विक्री होत असते. मात्र आधी कोरोना व नंतर लम्पी स्किनच्या साथीनंतर तब्बल तीन वर्षांनी हा बाजार भरला आहे.
वाखरी (ता. पंढरपूर) येथील पालखी तळावर भरलेल्या या बाजारामध्ये सुमारे ३ हजार खिलार गाई, बैल व खोंड तसेच १ हजार २०० हुन अधिक पंढरपुरी म्हशी विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. लम्पी स्किनच्या पार्श्वभूमीवर बाजारात दाखल होणाऱ्या प्रत्येक जनावराची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर निळ्या रंगाचे स्टॅम्पिंग करूनच बाजारात प्रवेश दिला जात आहे. तीन वर्षानंतर हा बाजार भरल्यामुळे या बाजारात मोठ्या प्रमाणावर जनावरांची खरेदी-विक्री होत आहे. त्यामुळेच पालखी तळाची जागाही अपुरी पडल्याचे चित्र आहे.
पशुपालकांनी तळाच्या आसपासच्या परिसरामध्ये आपली जनावरे बांधली आहेत. पंढरपूर बाजार समितीने पशुधन व पशुपालकांसाठी सुविधा उपलब्ध पुरविल्या.
खिलार कपिला वेधतायेत लक्ष
या बाजारामध्ये पूर्णपणे काळ्या रंगाच्या जातिवंत खिलार कपिला वळुंची जोड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आढीव (ता. पंढरपूर) येथील द्रोणाचार्य चव्हाण यांच्या सोन्या व सर्जा नावाच्या या कपिला खिलार जोडीची सहा लाख रुपये किंमत आहे. मात्र आपण या कपिला वळुंची विक्री करणार नाही. फक्त प्रदर्शनासाठी बाजारात आणल्याचे श्री. चव्हाण यांनी आवर्जून नमूद केले.
जनावरांच्या बाजारामध्ये १२ पशुवैद्यकीय अधिकारी व ६ पशुवैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. प्रत्येक जनावरांची आरोग्य तपासणी करूनच बाजारात प्रवेश दिला जात आहे. जनावरांवर तातडीचे उपचार करण्यासाठी मोबाईल व्हॅन सज्ज ठेवण्यात आली आहे.
- डॉ. पी. एम. जाधव, पशुसंवर्धन अधिकारी, पंढरपूर.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.