Book Review: संवेदनशील उद्योजकाची मूल्याधिष्ठित कर्तृत्वगाथा

Kakasaheb Chitale Book: ‘काकासाहेब चितळे’ हे वसुंधरा काशीकर यांनी लिहिलेले चरित्र आहे जे एका संवेदनशील आणि मूल्याधिष्ठित उद्योजकाच्या कर्तृत्वगाथेवर प्रकाश टाकते. या पुस्तकात काकासाहेबांच्या सामाजिक बांधिलकीपासून ते व्यवसायातील नवकल्पनांपर्यंतचा प्रवास मनाला भिडणाऱ्या शब्दांत मांडला आहे.
Kakasaheb Chitale Book
Kakasaheb Chitale BookAgrowo
Published on
Updated on

Inspiring Biography Book:

मयूर भावे

पुस्तकाचे नाव : काकासाहेब चितळे

लेखिका : वसुंधरा काशीकर

प्रकाशक : सकाळ प्रकाशन

पृष्ठे : २६८ मूल्य : ४९९ रु.

व्यवहाराचे आडाखे, नफा-तोट्याची गणिते आणि मागणी-पुरवठ्याच्या चौकटबंद ठोकताळ्यांच्या पलीकडे ज्या वेळी एखादा उद्योजक जातो, तेव्हा तो केवळ त्या उद्योग समूहाचं प्रतिनिधित्व न करता विविध कारणांमुळे त्या समूहाशी जोडल्या गेलेल्या माणसांचं, साधनांचं प्रतिनिधित्व करू लागतो. त्याची दृष्टी काळाच्या पलीकडच्या भविष्याचा वेध घेऊ लागते. उद्योजक काकासाहेब चितळे यांचे कृतार्थ जीवन याहून वेगळं नाही!

Kakasaheb Chitale Book
Book Review: अर्थवेचक गोष्टगुंफण

वसुंधरा काशीकर यांनी लिहिलेलं काकासाहेब चितळे यांचं चरित्र वाचताना वारंवार ह्या सर्व गोष्टी मनात येतात. ‘हा फक्त व्यवसाय नाही, ही जबाबदारी आहे,’ असं म्हणणाऱ्या काकासाहेबांची कार्यपद्धती, त्यांनी उभारलेल्या संस्था व त्यासाठी जोडलेली माणसे, त्यांची सर्वांना सामावून घेणारी संवादशैली, मदत करण्यातली सहजता, जगण्यातली निःस्पृहता अशा विविध गुणांचं दर्शन घडवणारे किती तरी प्रसंग या चरित्रात वाचायला मिळतात.

शिवाजी सपकाळ नावाचा ड्रायव्हर एक दिवस अचानक काकासाहेबांसमोर येतो आणि ‘मदत केली नाही, तर आत्महत्या करीन,’ असं म्हणत जाडजूड दोरीच समोर टाकतो. काकासाहेब त्याला फक्त मदतच करतात असं नाही, तर स्वतःचा व्यवसाय उभारण्याचं बळ, आत्मविश्‍वासही त्याला देतात. नव्वदच्या दशकात दूध उत्पादकांना एम-८० दुचाकी लवकर मिळावी यासाठी बजाज ऑटोमोबाइल कंपनीच्या डीलरशी चर्चा करतात, ‘तू माझा डबा खा आणि मी तुझा डबा खातो,’ असं ६०-६५ वर्षांपूर्वी म्हणून जातिभेद मोडून काढतात...

Kakasaheb Chitale Book
Book Review: गावाच्या विकासाचा मूलमंत्र देणारे ‘ग्राम मंत्रालय’

असे किती तरी प्रसंग आपल्यासमोर एक विशाल व्यक्तिमत्त्व उभं करतात. काकासाहेब चितळे यांचा झंझावाती जीवनाचा पट वसुंधरा काशीकर यांनी ओघवत्या शब्दांत उलगडला आहे. त्यासाठी त्यांनी भिलवडी, सांगली, कोल्हापूर, पुणे अशा विविध ठिकाणी प्रवास केला. चितळे कुटुंबीय, उद्योगातील पदाधिकाऱ्यांपासून शेतकऱ्यापर्यंत अनेकांशी चर्चा केली, मुलाखती घेतल्या. त्यातून ही लेखनयात्रा साकार झाली. प्रत्येक प्रकरणानंतर त्या आठवणींशी, घटनेशी संबंधित छायाचित्रे बघण्यासाठीचा ‘क्यू-आर’ कोड दिला आहे.

काकासाहेब चितळे यांचं जीवन केवळ दुग्धव्यवसायापुरतं मर्यादित नव्हतं. शिक्षण, सहकार, नेत्रदान, समाजसेवा, ग्रामस्वच्छता अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी आपल्या कार्याचा विस्तार केला. पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत गिरीश चितळे यांनी हे असं म्हटलं आहे, ज्यांना असं वाटतं, ‘आपण काकांना ओळखतो,’ त्या प्रत्येकासाठी हे पुस्तक आहे. कारण, माझ्या स्वतःच्या अनुभवावरून असं नम्रपणे वाटतं की, आपल्याला काकांची पूर्ण ओळख झालीच नाही!’ खांद्यावर घेतलेली कार्याची पालखी यशस्वीपणे मिरवताना त्यावरील माणुसकीची पताका सदैव फडकवत कशी ठेवावी, ही प्रेरणा हे पुस्तक वाचकांना देईल यात शंका नाही!

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com