
Gram Mantralaya Book :
श्रीराम ग. पचिंद्रे
पुस्तकाचे नाव : ग्राम मंत्रालय
लेखक : शंकर केंबळकर
प्रकाशक : लक्ष्यवेध प्रकाशन, कोल्हापूर
पाने : डबलडेमी आकार २१६
मूल्य : हार्डबाउंड रु. १०००/-
गावाचा प्रशासकीय कारभार ग्रामसेवक सांभाळत असतो. त्यांचा संबंध गावातील गावकरी, शेतकरी यासह तळागाळातील लोकांशी येत असतो. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर पहिल्या ग्रामसेवकांच्या बॅचमध्ये असलेल्या शंकर केंबळकर यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी लिहिलेले ‘ग्राम मंत्रालय’ हे अनुभवजन्य पुस्तक आहे. यातून ग्रामीण भागातील लोकांचे प्रश्न कितीही जटिल, गुंतागुंतीचे असले तरी प्रशासनाने खंबीरपणे मनावर घेतल्यास कसे नियोजनबद्धतेने सोडवता येतात, हे ते सोदाहरण सांगतात. सरकारी तिजोरीवर फारसे अवलंबून न राहताही ग्रामविकास कसा साधता येईल, यावर ते भाष्य करतात.
‘आमचा गाव’ असे म्हणताना व्यष्टी ते समष्टी असा व्यापक विचार ते मांडतात. गेल्या साठ वर्षांमध्ये गावातील एकोपा नष्ट होण्यासोबतच अन्य समस्याही उद्भवलेल्या आहेत. उदा. मातीत मीठ फुटणे, रासायनिक खते, कीटकनाशकांचा अतिवापरामुळे जमिनीचा कस नष्ट होणे इ. या घटकांचे दुर्लक्ष करून गावाचा विकास शक्य होणार नाही. महाउद्योग समूह, पर्यावरणपूरक आधुनिक शेती, भारत आणि जागतिक संदर्भ आणि ग्रामविकास ही चार प्रकरणे आणि शेवटी उपोद्घात अशी या ग्रंथाची मांडणी आहे.
महाउद्योग समूहाचा विचार आणि विस्तारामध्ये समाजातील गरीब-श्रीमंत ही दरी भरून काढून स्वावलंबी समाजाची निर्मिती कशी करता येईल, याचा आराखडा मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ग्रामीण भागातील लोकांचे शोषण कसे होते, या संदर्भातील ३२ मुद्दे मांडतात. शेतकरी आणि स्थानिक उद्योजकांपुढील आव्हाने सांगतानाच मोठे भांडवलदार त्यांना षड्यंत्राने कसे गिळतात व या संकटाला तोंड देण्याचे मार्गही ते सुचवू पाहतात. कोणालाही करता येतील अशा ४५ उद्योगांची यादी त्यांनी दिलेली आहे.
पर्यावरण आणि नागरी विकास यांचा मेळ कसा घालता येईल, यावरही ते नेमके भाष्य करतात. नैसर्गिक साधनसामग्रीचा उपयोग करून घेत पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेती कशी करायची? या टप्प्यामध्ये पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाचे नियोजनही ते समजावतात.
‘भारत आणि जागतिक संदर्भ’ या प्रकरणात जगाच्या तुलनेत भारताच्या ग्रामीण विकासाचे स्थान दर्शविताना अन्य देशांशी तुलनात्मक आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. ‘ग्रामविकास’ या प्रकरणात गावच्या सरपंचासह सर्व जबाबदार घटकांना जबाबदारीची जाणीव करून देतात. आपल्या गावात परिवर्तन आणण्याचे अनेक मार्ग दाखवतात. गावाच्या विकासातून देशाचा विकास २०३० पर्यंत कसा साधता येईल, असा परिवर्तनाचा मूलमंत्र ते देतात.
गावाच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासाची आस असलेल्या प्रत्येकाने हा ग्रंथ किमान एकदा तरी वाचला पाहिजे. ज्यांच्या ग्रामविकासाची खास जबाबदारी आहे, त्यांनी त्याचे वाचन - चिंतन - मनन केले पाहिजे. आशयाच्या दृष्टीने अतिशय समृद्ध अशा या पुस्तकाचे अंतरंगाप्रमाणेच त्याचे बहिरंगही सर्वांगसुंदर आहे. न्याय, लोकशाही आणि सत्यमेव जयते या शब्दासोबत सत्ता, संसद, शेती आणि सामान्यजन यांना प्रतिकात्मक रूपात सादर करणारे मुखपृष्ठही सूचक आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.