Long term Strategy of Grape Farming :
नाशिक जिल्ह्यात गारपिटीमुळे द्राक्षपिकाचे मोठे नुकसान झाले. त्यासंदर्भात काय सांगाल?
नाशिक जिल्ह्यातील आमचा दौरा पूर्वनियोजित होता; मात्र गारपीट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही नाशिकमध्ये पोहोचलो. त्यांनतर निफाड तालुक्यात गारपीटग्रस्त द्राक्ष बागांना भेटी देऊन पाहणी केली. हवामान बदलांच्या पार्श्वभूमीवर अचानक झालेले हे नुकसान कुणालाही थांबवता येत नाही.
मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीसुद्धा काही द्राक्ष उत्पादक हे झालेले नुकसान पाहून पुढील वाटचाल कशी करावी लागेल याबाबत तातडीने पर्याय शोधून कामाला लागले. हे वार्षिक पीक असल्याने नुकसान परवडणारे नाही. मात्र आता पीक वाया गेल्यानंतर पुढील वर्षीची तयारी करणे क्रमप्राप्त आहे.
जोराचा पाऊस, बागेत साचलेले पाणी, ओलावा, पाऊस व गारपिटीमुळे तुटून पडलेली पाने, गारांच्या फटक्यात द्राक्ष मण्यांचे झालेले नुकसान अशा परिस्थितीत विषाणू व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यावर नियंत्रण मिळवून बागांचे संरक्षण करावे लागेल. त्या अनुषंगाने राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राकडून आवश्यक असणाऱ्या तातडीच्या उपायोजना सुचवण्यात आल्या आहेत.
पीकसंरक्षण व रेसिड्यू फ्री द्राक्ष उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी कसे नियोजन करावे
पूर्वहंगामी बागांमध्ये अडचणी येणार नाहीत. त्यामध्ये डाऊनी, भुरी नियंत्रित करण्यासाठीच्या उपलब्ध उपाययोजना व शिफारशींचा अवलंब सध्याच्या अवस्थेत महत्त्वाचे ठरेल. मात्र फवारणी करताना कीटकनाशके अनिवार्य आहेत.
तज्ज्ञांनी सुचवलेल्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसच्या अनुषंगाने काटेकोर अंमलबजावणी करावी. त्यामुळे रेसिड्यूच्या अंगाने काही अडचणी येथील असे वाटत नाही. अजूनही मोठ्या प्रमाणावर द्राक्ष बागा काढणीस अवकाश आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन त्यानुसार टप्प्याटप्प्याने पीक संरक्षणाचे नियोजन व व्यवस्थापन करणे महत्त्वाचे ठरेल.
द्राक्ष बागा काढणीच्या काळात शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घ्यावी?
कॉपर व सल्फरयुक्त कीटकनाशकांच्या फवारणी करताना अडचणी नाहीत. हे दोन्ही घटक रेसिड्यू तपासणीत प्रामुख्याने येत नाहीत. मात्र रासायनिक कीटकनाशकांमध्ये काही ठरावीक कृषी रसायने आहेत की ज्यांचा काळजीपूर्वक वापर करावा लागणार आहे. त्याची पातळी राखून योग्य ती खबरदारी घ्यावी लागते.
जैव आधारित फवारण्यांवर जास्तीत जास्त भर देणे महत्त्वाचे वाटते. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचाही तसा दृष्टिकोन आहे. जैविक संयोजन असलेल्या निविष्ठा बाजारात उपलब्ध आहेत. सध्याच्या परिस्थितीत प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी एकात्मिक उपाययोजनांवर भर देणे गरजेचे राहील.
हवामान बदलांच्या परिस्थितीत द्राक्ष शेती पुढे जाण्यासाठी काय करायला हवे?
नाशिक दौऱ्यात प्रगतिशील द्राक्ष उत्पादक, निर्यातदार यांच्यासोबत यासंबंधी सविस्तर चर्चा झाली. संरक्षित शेती हाच त्यावरचा एक उपाय ठरू शकतो. कारण खूप मोठ्या प्रमाणावर होणारे भौतिक नुकसान त्या माध्यमातून रोखले जाऊ शकते.
यासह दुसरा मुद्दा असा, की इजा झालेल्या मालाचा पुनर्वापर करणे गरजेचे राहील. मण्यांना तडे जाणे, काही ठिकाणी घड खराब होणे अशा अडचणी प्रामुख्याने दिसून आल्या आहेत. त्यामुळे अशा मालावर प्रक्रिया करण्यासाठी उद्योग उभे राहणे गरजेचे आहे.
काही प्रमाणात खराब झालेल्या मालावर प्रक्रियेचा पर्याय मिळाला तर शेतकऱ्यांना एक नवी दिशा सापडू शकेल. ज्यूस, बेदाणा व वाइन असे पर्याय पुढे येतील. संतुलित पद्धतीने पुरवठा ही काळाची गरज आहे. कारण फक्त खाण्यासाठी असलेल्या टेबल ग्रेपच्या तुलनेत प्रक्रियेवरही भर देणे गरजेचे आहे. एकूण द्राक्ष उत्पादनाच्या ३० ते ४० टक्के माल प्रक्रियेसाठी गेला तरी अनेक संधी निर्माण होतील.
सध्या द्राक्ष उत्पादक तणावाखाली आहेत. या संकटावर मात करण्यासाठी दृष्टिकोन कसा असावा?
नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यात पिकाचे नुकसान होऊन खूप मोठा आर्थिक फटका बसतो. बागायतदारांना आर्थिक नुकसानीबरोबरच मानसिक तणावाचाही सामना करावा लागतो. मात्र हे संकट पहिल्यांदाच आलेले नाही. यापूर्वी असे अनेकदा घडलेले आहे. असे असतानाही द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर आहे.
गेल्या अनेक दशकांपासून गुणवत्तापूर्ण द्राक्ष उत्पादन घेण्याची परंपरा येथील शेतकऱ्यांनी राखली आहे. गारपीट, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, वादळी वारा हे सर्व अनपेक्षित असते; मात्र त्यामुळे मोठा गंभीर परिणाम होतो. त्यामुळे द्राक्ष शेती सोडून द्यावी की काय असाही विचार त्यांच्या मनात येतो. फक्त द्राक्ष मालाचेच नाही तर द्राक्ष वेली, पाने, काड्या, कॅनॉपी या सर्वांचे नुकसान झालेले आहे.
त्यामुळे आत्मविश्वास ठेवून पुन्हा जिद्दीने अभ्यासपूर्ण वाटचाल करण्याची गरज आहे. कारण नैसर्गिक आपत्ती रोखणे हे कोणाच्या हातात नाही. त्यामुळे एक दिशा ठेवून पुढे जावे लागेल. पुढील काळात आर्थिक नियोजनानुसार संरक्षित शेती सारखे पर्याय स्वीकारणे गरजेचे राहील.
गारपीट किंवा अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जाळी पसरवणे किंवा प्लॅस्टिक कव्हर अच्छादन करणे असे आपल्या पातळीवर नियोजन करून नुकसान टाळावे लागणार आहे . त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन धोरण ठरवले पाहिजे. महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ, द्राक्ष निर्यातदार संघटना, सरकारचे प्रतिनिधी यांनी एकत्र येऊन चर्चेतून एखादी योजना तयार करावी लागेल.
क्रॉप कव्हर तंत्रज्ञानाची शिफारस आपल्या संशोधन केंद्राने केली आहे; मात्र त्याचा म्हणावा तितका विस्तार होऊ शकलेला नाही...
क्रॉप कव्हर संदर्भात द्राक्ष संशोधन केंद्राने चाचण्या घेतल्या. त्याचा अनुभव चांगला आलेला आहे. संशोधन केंद्राच्या सर्व विभागातील शास्त्रज्ञांनी एकत्रित येत आंतरशाखीय संशोधनाच्या माध्यमातून यात सहभाग घेतलेला आहे.
द्राक्ष उत्पादकांना या तंत्रज्ञानाबद्दल सांगितले आहे. शासनाची जी काही प्रक्रिया आहे तीही सुरू आहे. आर्थिक सहकार्य व त्यासाठी शासनाचे पाठबळ हा त्यातील महत्त्वाचा मुद्दा आहे. मात्र यासोबतच द्राक्ष उद्योगातील संबंधित घटकांनी यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.
द्राक्ष उद्योगातील जोखीम कमी करण्यासाठी कशा पद्धतीने काम करावे असे आपल्याला वाटते?
शासकीय मदत, योजना यांना मर्यादा आहेत. मात्र भागीदारीच्या तत्त्वावर काम केल्यास गुंते सुटू शकतील. संवाद, गुणवत्ता व दीर्घकलिन धोरण असा दृष्टिकोन ठेऊन वाटचाल करावी लागणार आहे. शेतकऱ्यांना व्यक्तिगत पातळीवर खर्चिक बाबी उभ्या करण्यात मर्यादा येतात.
मात्र त्यातून त्यांचे संघटन उभे राहिले तर ताकद निर्माण होऊ शकेल. सामूहिक सहयोगातून पर्याय समोर आल्यास किफायतशीर बाजू तयार होऊ शकतील. गटशेती, सहकारी तत्त्वावर शेती या माध्यमातून खर्चिक बाजू कमी होऊ शकते.
मोठा खर्च हा अडचणीचा ठरतो. त्यासाठी छोट्या शेतकऱ्यांची जोखीम कमी करण्यासाठी सहकार तत्त्वावर काम केले पाहिजे. सहकारात अशा प्रकारच्या कामाचा महाराष्ट्राला चांगला अनुभव आहे.
पुढील काळात द्राक्ष निर्यातीची स्थिती कशी राहील?
अद्याप सविस्तर नुकसानीचा अहवाल प्राप्त झालेला नाही. नाशिक जिल्ह्यात निफाड व लगतच्या भागात ज्या ठिकाणी गारपिटीमुळे नुकसान झाले आहे, तो भाग सोडून बाकीच्या ठिकाणी द्राक्ष मालाचे मोठे नुकसान नाही. या बागा वाचलेल्या आहेत.
अशा भागांमध्ये काटेकोरपणे व्यवस्थापन केल्यास पुढील नुकसान आपण टाळू शकतो. या वर्षीही द्राक्ष निर्यात यशस्वी होऊ शकेल असा आशावाद वाटतो. मला असे वाटते की, बाजारपेठेची मागणी ओळखून कामकाज केल्यास उत्पन्नवाढ शक्य आहे.
अजूनही देशातील अनेक राज्यात चांगल्या गुणवत्तेची द्राक्षं मिळत नाहीत. निर्यातवाढीच्या अनुषंगाने आपण फक्त युरोपकडे लक्ष देतो; मात्र इतर आशियायी देशांतही संधी आहे. अंतर व गुणवत्तेचे निकष यांचा विचार करता तिथे निर्यात आकर्षक ठरू शकेल.
आपल्या देशात ४० हजारांहून अधिक शेतकरी ‘अपेडा’च्या ‘ग्रेटनेट’ प्रणालीत नोंदणी करतात. त्यामुळे त्यांनी आदर्श व्यवस्थापन पध्दती (गुड ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस) राखली आहे. त्यामुळे चांगल्या गुणवत्तेची द्राक्ष उपलब्ध होत आहेत. विपणन धोरण व पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी चांगल्या व्यवस्थापनाची गरज आहे. त्यातून संधी वाढतील. त्यासाठी द्राक्ष उद्योगातील सर्व घटकांशी विचारविनिमय करून धोरण ठरवले पाहिजे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.