Grape Farming : फुलोरा ते सेटिंग अवस्थेमधील समस्येवरील उपाययोजना

Grape Advisory : फुलोरा व सेटिंग अवस्था ही साधारणपणे पाच दिवसांची असून, या अवस्थेमध्ये फुलोरागळ, मणी लाग, मणी जळ व मणी गळ यांची समस्या उद्‍भवू शकते.
Grape Farming
Grape FarmingAgrowon

डॉ. स. द. रामटेके

Flowering and setting stage in Grape Farming : दरवर्षी द्राक्ष बागायतदार उत्तम प्रतीच्या घडाचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत असतो. उत्तम घड उत्पादनासाठी प्रकाशाची तीव्रता, उबदार तापमान, जमिनीत पुरेसा ओलावा व पोषक तत्त्वे यांची आवश्यकता असते. फलित फुले ही परिपूर्ण क्लस्टरमध्ये विकसित होतात. द्राक्षाची नाजूक फुले असून, या फुलोरा अवस्थेत पाऊस, वारा किंवा थंड तापमानाच्या संपर्कात आल्यास गळ होते. पाऊस व कोणत्याही कारणाने आर्द्रता वाढल्यास त्याचा परिणाम विविध रोग व किडींच्या प्रादुर्भावात होतो. फुलोरा व सेटिंग अवस्था ही साधारणपणे पाच दिवसांची असून, या अवस्थेमध्ये फुलोरागळ, मणी लाग, मणी जळ व मणी गळ यांची समस्या उद्‍भवू शकते.

फुलोरा गळ

वातावरणातील बदल वेलीतील अन्नसाठा, संजीवकांचा वेलीतील समतोल व जमिनीतील पाण्याचा कमी-जास्तपणा या घटकांवर अवलंबून असतो

ही विकृती जातीपरत्वे व स्थानिक वातावरणावर अवलंबून असते.

कॅनॉपी खूपच दाट असल्यास अन्नद्रव्यांचा पुरवठा सर्वच घडांना व मण्यांना योग्य प्रमाणात होत नाही. अशा वेळी फुलोरा गळ होते. आणि जर मणी लाग झाल्यास पुढे मणीगळसुद्धा होते.

मणीगळ

ही विकृती फुलोरा अवस्थेत आढळून येते.

घडाला धक्का दिला किंवा टिचकी मारली तरी न फुललेले किंवा फुललेले मणी गळून पडताना दिसतात. पूर्ण घड रिकामा झाल्यासारखा दिसतो, त्यामुळे उत्पादनात घट होते.

ही विकृती पाण्याचा ताण, फॉस्फरस या अन्नद्रव्यांचे जमिनीतील अति जास्त प्रमाण, जास्त क्षारता व पोटॅशिअमसारख्या अन्नद्रव्यांचे कमी प्रमाण इत्यादी बाबीमुळे येऊ शकते.

Grape Farming
Grape Plant Production : उतिसंवर्धनाद्वारे रोगमुक्त द्राक्ष रोपांची निर्मिती

फुलोरा व मणीगळ यावर परिणाम करणारे घटक :

दिवस व रात्रीच्या तापमानामध्ये जास्त फरक असणे.

फॉस्फरसचे जमिनीतील जास्त प्रमाण तसेच ॲबसेसिक अँसिडचे वेलीतील जास्त प्रमाण.

द्राक्ष जातीची ताण सहन करण्याची क्षमता.

कॅनॉपी खूप जास्त असणे.

उपाययोजना :

वेलीवर घडांची संख्या निर्धारित ठेवावी.

वेल विस्तार यांचे व्यवस्थापन योग्य ठेवल्यामुळे सुटसुटीत कॅनोपी तयार होईल. वेलीला भरपूर सूर्यप्रकाश मिळेल. त्यातून वेलीच्या पोषणासाठी पुरेसा अन्नसाठा तयार होईल.

पाण्याचा ताण देऊ नये.

घडाचा विस्तार व्यवस्थित झाला असल्यास फुलोरा अवस्थेत जीए देण्याचे टाळावे. त्याच प्रमाणे एकापेक्षा अधिक रसायने एकत्रित मिसळून वेलीला देऊ नयेत.

फुलोरा अवस्थेआधी जी.ए. + बुरशीनाशक + पी. एच. कमी करणारे रसायन एकत्रित द्यावीत.

मणी ३ - ४ मि.मी आकाराचे झाल्यानंतर- जीए + बुरशीनाशक + पी. एच. कमी करणारे रसायन + सीपीपीयू रसायने एवढीच एकत्रित देता येऊ शकतात.

रोग व किडींच्या निर्मूलनासाठी वेळोवेळी योग्य पद्धतीने उपाययोजना घ्याव्यात.

डॉ. एस. डी. रामटेके, ९४२२३१३१६६ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

कीडनाशकांच्या शिफारशी लेबल क्लेमप्राप्त किंवा जॉएंट ॲग्रेस्कोप्राप्त आहेत.

फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपासाठीचे आहे.

खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे. बॅन किंवा ़‘रेस्ट्रिक्टेड’ आहे का पाहावे.

लेबल क्लेम वाचावेत. पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत.

रसायनांचा गट तपासावा. पीएचआय, एमआरएल तपासावेत. पेरणी वा लागवडीपूर्वी संबंधित बियाणांवर कोणती बीजप्रक्रिया केलेली आहे, हे तपासूनच पुढील बीजप्रक्रिया करावी.

मधमाशी, मित्रकीटकांना हानिकारक कीडनाशकांचा वापर टाळावा.

पीक फुलोरा अवस्था लक्षात घेऊन कीडनाशकांचा समंजस वापर करावा.

सेटिंग अवस्थेच्या आधी करावयाची कामे :

वांझ फुटी काढणे :

प्रथम वांझफुटी काढून टाकाव्यात. यामुळे गर्दी कमी होऊन घडांचे योग्य पोषण होईल. वांझफुटी काढल्याने हवा खेळती राहते. आर्द्रता कमी होते. त्यामुळे वेलीवर कीड, रोगांचा प्रादुर्भाव होत नाही. घडावर सूर्यप्रकाश नियंत्रित राहील.

पाकळ्यांची व घडांची थिनिंग करणे :

द्राक्ष वेलींवर जास्त घड नसावेत. त्यामुळे इतर घडांचे पोषण व व्यवस्थापन योग्यप्रकारे करता येते. प्रति दीड फुटावर एकच घड असावा. निर्यातक्षम घड सुमारे ३५० ग्रॅम वजनाचा असावा. मण्यांचे आकारमान २० मि.मी. इतके असावे. त्यासाठी एका वेलीवर ४० ते ४५ इतकेच घड ठेवावेत (१० फूट बाय ६ फुटासाठी). मण्यांची विरळणी करून एका घडामध्ये १०० ते १२० इतके मणी ठेवावेत. जर मण्यांची संख्या जास्त ठेवली तर घडाचे अपेक्षित आकारमान मिळत नाही. मण्यांची संख्या योग्य ठेवली तर हवा खेळती राहून घडावर रोगांचा प्रादुर्भाव होणे टळते.

थिनिंग करण्याआधी एका घडामध्ये ५०० पेक्षा जास्त मण्यांची संख्या असते. हे सर्व मणी घडावर ठेवल्यामुळे मण्यांचा विकास होत नाही. मणी लहान राहतात म्हणून आपण कात्रीच्या साह्याने व रसायनांचा वापर करून थिनिंग करतो.

Grape Farming
Success Story of Grape Farming : हवामान बदलाला अनुकूल केली द्राक्षशेती

रसायनाच्या साह्याने थिनिंग करणे :

रसायनाच्या साह्याने थिनिंग करण्यासाठी आपण जीएचा वापर करतो. मणीगळ करण्यासाठी ५० टक्के फुले उमलण्याच्या अवस्थेत ४० पीपीएम इतकी जीएची फवारणी करावी. जमिनीचा प्रकार व वाढीची अवस्था याचा विचार करून पाण्याचे नियोजन करावे.

वेलीला ताण देऊ नये, कारण पाण्याचा ताण अडचणीत आणू शकतो. अशा वेळी जमिनीचा प्रकार (हलका किंवा भारी जमीन) फार महत्त्वाचा ठरतो. अशा परिस्थितीमध्ये फुलगळ व्हायला लागली, की पूर्ण घड खाली होतो. हे सर्व टाळायचे असल्यास बागेला ताण बसू नये, याची काळजी घ्यावी.

जीएची फवारणीही योग्य अवस्थेत न झाल्यास त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. उदा. शॉर्ट बेरीज, लहान-मोठे मणी होणे इ. विकृती दिसून येतात. जीएसोबत झिंक सल्फेटचा वापर करू नये. त्यामुळे शॉर्ट बेरीज होण्याचा धोका जास्त असतो. जीएच्या जास्त वापरामुळे घडाच्या देठाची लांबी वाढते आणि फुलगळ जास्त प्रमाणात होऊन घड पूर्ण मोकळा होतो. त्यासाठी जीएचा वापर हा संतुलित व नियंत्रित करावा.

जीएच्या द्रावणात तीनपेक्षा जास्त रसायने मिसळू नयेत. (यात जीए + बुरशीनाशक व सामू कमी करणारे रसायने).

कात्रीच्या साह्याने पाकळ्यांची थिनिंग करणे:

जीएचा वापर केल्याने १०० टक्के विरळणी होत नसल्यामुळे कात्रीच्या साह्याने मण्यांची विरळणी करावी. विरळणीची मात्रा पूर्ण झाल्यानंतर व मणी सेट झाल्यानंतर घडाची लांबी अधिक असेल, तर कात्रीच्या लांबीएवढा किंवा वितभर लांबी ठेवून शेंडा खुडावा.

कात्रीच्या साह्याने घडाची विरळणी करत असताना पहिल्या तीन पाकळ्या सोडून चौथी, सहावी, आठवी, दहावी, बारावी इ.क्रमाने घडातील पाकळ्या मण्यांचा आकार २ ते ३ मि.मी. आकाराचा असताना काढाव्यात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com