Kolhapur News : उन्हाचा ताव दिवसागणिक वाढत आहे. गेल्या चार महिन्यांत ८० ठिकाणी लागलेले वणवे वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने आटोक्यात आणले आहेत. असे असले तरी खोडसाळपणे वणवे लावणाऱ्यांवर कारवाई मात्र शून्य आहे. अजूनही दोन महिने उन्हाचा ताव राहणार असल्याने वणवे लावणाऱ्यांना वन विभाग चाप लावणार का, असा प्रश्न आहे.
चैत्राच्या उन्हाच्या झळांनी झाडांची पानगळ झाल्याने शेतीवाडी, जंगल हद्दीत मोठ्या प्रमाणात पालापाचोळा पडला आहे. अशात डोंगर उतारावर सायंकाळी वाऱ्याचे झोत आहेत, अशा ऊस शेतीत फड पेटवला जात आहे. यातच कुठे तरी ठिणगी पडणाऱ्या ठिकाणी वणवे लागण्यास सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यात सात तालुक्यांत घनदाट जंगल, सात घाट रस्ते आहेत. त्यामुळे येथून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. जंगल वाटेवर पर्यटक जातात, काही ठिकाणी तरुणांचे गट वनहद्दीत किंवा वनहद्दी लगतच्या भागात जेवण करतात. काही वेळा चुली पेटवल्या जातात. वन विभागाची गस्ती पथके त्या भागात असतील तर त्यांना जरूर हटकते किंवा कारवाई होते.
या उलट जंगल हद्दीशेजारी असलेल्या ऊस शेतात फड पेटवले जातात, त्याच्या ठिणग्या उडून अवतीभोवती जंगल असेल तर आग लागते किंवा कुठेतरी जंगलालगतच्या शेजारी कचरा पेटवला जातो. काही वेळा चहा गाड्या, नाश्ता गाडीवरील धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींकडून पेटती काडी अनाहुतपणे टाकली जाते. वाळलेले गवत पेटते, अशा घटना जंगलाशेजारी घडल्यास जंगलात वणवा लागतो.
असे रोज किमान दोन ते तीन ठिकाणी वणवे लागतात. ज्या भागात वन विभागाच्या गाड्या झटपट पोहोचतात, तेथे आग अवघ्या काही मिनिटांत आटोक्यात येते. मात्र, अनेक ठिकाणी जंगली भागात डोंगर उतारावर लागलेली आग आटोक्यात आणणे मुश्कील होते. वन विभागाचे कर्मचारी झाडांच्या फांद्या आगीवर मारून आग आटोक्यात आणतात. त्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागतात.
शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यात वणवे लागण्याचे प्रमाण मोठे आहे. तसेच आजरा व चंदगडमध्येही आगी लागतात. हातकगंणले तालुक्यातील रामलिंग धुळोबा डोंगरवरील गवताला आग लागते. वन विभागाने यंदा वणवे लागू नयेत, यासाठी खबरदारी म्हणून उपाययोजना केल्या आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.