Forest Fire : आग लावणाऱ्याला शिक्षा हवीच

Forest Conservation : राज्यात जाणीवपूर्वक वणवे लावण्याचे प्रमाण वाढत असताना असे करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईदेखील आता गरजेचीच झाली आहे.
Forest Fire
Forest Fire Agrowon

Forest damage : राज्यात उन्हाळा सुरू झाला, की वन-डोंगर-पर्वतरांगांमध्ये वणवे पेटू लागतात. खानदेशातील सातपुडा पर्वतापासून ते सह्याद्रीच्या डोंगर रांगांवर असे वणवे सध्या सर्वत्र दिसत आहेत. वणवे लागण्यासाठी काही नैसर्गिक कारणे असली तरी बहुतांश ठिकाणी जाणीवपूर्वक वणवे लावले जातात. हवामान बदल आणि जगभर वणव्यांचे वाढते प्रमाण याचा सहसंबंध असल्याचेही एका अभ्यासातून पुढे आले आहे. सातपुडा पर्वतरांगांमध्ये काही जण जमिनीवर अतिक्रमण करण्यासाठी तर काही जण डिंकासह इतर वनोपज मिळविण्यासाठी वनाला आग लावत आहेत.

अनेकदा अत्यंत क्षुल्लक कारणांसाठी लावलेल्या आगीमध्ये वनसंपदेचे अतोनात नुकसान होते, असा साधा विचार वणवे लावणाऱ्यांच्या मनात येत नाही. उन्हाळ्याच्या दिवसांत बहुतांश वन कुरणे वाळलेली असतात. वाळलेला पालापाचोळा सर्वत्र पसरलेला असतो. मार्च ते मे या महिन्यांमध्ये वावटळीचे प्रमाण अधिक असते. ही सर्व परिस्थिती वणवा लागण्यास पोषक असते. अशा वेळी पडलेल्या एक ठिणगीचे रूपांतर वणव्यात होते. वणव्यामध्ये चराऊ कुरणे जळून खाक होतात. जंगलातील साग, साल, बांबू, खैर, चंदन आदी मौल्यवान वनवृक्षांसह असंख्य दुर्मीळ वनौषधी नष्ट होतात. आगीच्या लपेटमध्ये येऊन अनेक वन्यजीवांना आपले प्राण गमवावे लागतात. वणव्यांमध्ये जैवविविधता नष्ट होते. डोंगराळ भागात अनेक आदिवासी बांधव शेती करतात. अशा शेतीलाही वणव्याच्या झळा बसतात.

Forest Fire
Forest Fire : वणवा लावल्यास दोन वर्षांची शिक्षा

वणव्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा फटका शेकडो किलोमीटर अंतरापर्यंतच्या पिके आणि वनस्पतींना बसत असल्याचेही एक अभ्यास सांगतो. वणव्यामध्ये जमिनीतील आर्द्रता घटते, वनांची उत्पादनक्षमताही घटते. सातत्याने आगी लागल्यास वनांपासून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये मोठी घट होते. वणव्यामुळे जमिनीवरील वनस्पतींचे आच्छादन नष्ट होते. जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होते. मध्य युरोपामधील जंगलात लागणाऱ्या आगीमुळे तापमानामध्ये वाढ होत असल्याचेही एका संशोधनातून पुढे आले आहे. यावरून वणव्याच्या दाहक झळा आपल्या लक्षात यायला हव्यात.

पेटलेला वणवा आटोक्यात आणणे हे अत्यंत अवघड काम आहे. त्यामुळे तो पेटूच नये यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यायला हवी. आगीचा इशारा देणारे वायरलेस सेंसरचे जाळे उभारून आगीची माहिती तत्काळ मिळविली जाऊ शकते. परंतु आग लागू नये म्हणून पूर्वापार चालत आलेल्या जाळरेषा आणि आग लागल्यानंतर विझविण्यासाठी झाडांच्या फांद्या याच पद्धतीवर आजही वनखाते अवलंबून असल्याचे दिसून येते. राज्यात प्रत्येक वनक्षेत्राचा सुधारित आग संरक्षण आराखडा तयार करायला हवा. अशा आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीतून राज्यात वणव्याचे प्रमाण घटू शकते. या आराखड्यामध्ये प्रतिबंधात्मक तसेच नियंत्रणात्मक उपाययोजना असायला हव्यात. याबरोबरच वणव्याबाबत स्थानिक लोकांच्या निष्काळजीपणाबद्दल त्यांचे प्रबोधन वाढवायला हवे. गावाजवळच्या वनाला आग लागल्यानंतर ती तत्काळ विझविणे आवश्यक आहे. त्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मदत करणे वन कायद्यानुसार गावकऱ्यांना बंधनकारक आहे.

जंगलाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी डोंगर परिसरातील प्रत्येक गावात वन विभागाच्या साह्याने वणवा प्रतिबंधक पथके तयार करावीत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात आगीचा इशारा देणारे वायरलेस सेंसरचे जाळे राज्यातील प्रत्येक वनक्षेत्रात उभारून आगीची माहिती तत्काळ मिळवून ती लगेच आटोक्यात
आणली जाऊ शकते. हे करीत असताना जाणीवपूर्वक वणवे लावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई देखील आता गरजेचीच झाली आहे. वणव्यांमुळे जैवविविधता नष्ट होत असल्याने बारामती वन विभागाने वणवे लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते, असा इशारा दिला आहे. जंगलास आग लावणाऱ्यांचे नाव व पुरावे कोणी वनविभागाला दिले तर पुरावे देणाऱ्याचे नाव गुपित ठेवून त्यास योग्य बक्षीसही दिले जाणार आहे. राज्याच्या सर्व विभागांत जाणीवपूर्वक आग लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्यास वणव्यांचे प्रमाण कमी होऊ शकते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com