Marathwada Water Shortage : मराठवाड्यातील १६४ प्रकल्प कोरडे

Marathwada Water Crisis : मराठवाड्यातील ८२५ लघु, मध्यम प्रकल्पांपैकी तब्बल १६४ प्रकल्प कोरडे पडले आहेत. याशिवाय ३८२ प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.
Water Stock
Water StockAgrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील ८२५ लघु, मध्यम प्रकल्पांपैकी तब्बल १६४ प्रकल्प कोरडे पडले आहेत. याशिवाय ३८२ प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. पावसाच्या जोरदार आगमना शिवाय कासावीस प्रकल्पांची तहान भागणे नाही. त्यामुळे सर्वांच्या नजरा यंदाच्या मॉन्सूनच्या जोरदार आगमनाकडे लागल्या आहेत.

गतवर्षीच्या पावसाळ्यात पावसाने दिलेल्या दग्यामुळे मराठवाड्यातील प्रकल्पांमध्ये अपेक्षित पाणीसाठा होऊ शकला नाही. परतीच्या पावसाने काही प्रकल्पात पाणीसाठा वाढवण्यास मदत केली. परंतु तीही तोकडी पडली.

त्यामुळे पाणीटंचाईने डोके वर काढले. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यात टंचाईची तीव्रता प्रचंड वाढली. आता मराठवाड्यात पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा असताना प्रकल्पांची अवस्था बिकट बनली आहे.

Water Stock
Water Stock : जलस्रोतांमधील साठा येतोय संपुष्टात

एकूण ७५० लघु व ७५ मध्यम प्रकल्पांपैकी १६४ प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यामध्ये १५६ लघु आणि ८ मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. कोरड्या पडलेल्या १५६ लघु प्रकल्पात धाराशिवमधील सर्वाधिक ७७, त्यापाठोपाठ बीडमधील ५०, छत्रपती संभाजीनगरमधील १८ व लातूरमधील ११ प्रकल्पांचा समावेश आहे. कोरड्या पडलेल्या आठ मध्यम प्रकल्पात बीडमधील सर्वाधिक पाच, धाराशिवमधील दोन व जालन्यातील एका मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे.

जोत्याखाली पाणीसाठा गेलेल्या ३८२ प्रकल्पात ३४२ लघु व ४० मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. ३४२ लघु प्रकल्पात धाराशिवमधील सर्वाधिक ९२, लातूरमधील ७८, बीडमधील ४९, छत्रपती संभाजीनगरमधील ३६, नांदेडमधील ३४, हिंगोलीतील २०, परभणीतील १९ व जालन्यातील १४ प्रकल्पांचा समावेश आहे.

दुसरीकडे जोत्याखाली पाणीसाठा गेलेल्या ४० मध्यम प्रकल्पात छत्रपती संभाजीनगर व धाराशिवमधील प्रत्येकी ११, बीडमधील ६, जालन्यातील ५, लातूरमधील ४, परभणीतील २ व नांदेडमधील एका प्रकल्पाचा समावेश आहे.

केवळ एका लघु प्रकल्पात ७५ टक्केपेक्षा जास्त पाणी

एकूण ७५० लघु प्रकल्पांपैकी नांदेडमधील केवळ एका प्रकल्पात आत्ताच्या घडीला ७५ टक्केपेक्षा जास्त पाणी आहे. नांदेड धाराशिव, लातूर, बीड व छत्रपती संभाजीनगरमधील मिळून १० प्रकल्पात ५० ते ७५ टक्के, परभणी, नांदेड, धाराशिव, लातूर, बीड व छत्रपती संभाजीनगरमधील मिळून ४५ लघु प्रकल्पात २५ ते ५० टक्के पाणीसाठा आहे.

Water Stock
Water Dam Stock : रत्नागिरीतील धरणांत ४३ टक्के साठा

दोन मध्यम ५० ते ७५ टक्के पाणी

मध्यम प्रकल्पांची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. नांदेडमधील दोन मध्यम प्रकल्पात ५० ते ७५ टक्के, बीड व नांदेडमधील प्रत्येकी एका प्रकल्पात २५ ते ५० टक्के पाणीसाठा आहे.

९ मोठ्या प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी

मोठ्या ११ प्रकल्पांपैकी ९ प्रकल्पात २५ टक्केपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये परभणी, हिंगोलीतील प्रत्येकी एक, धाराशिव, नांदेड व बीडमधील प्रत्येकी दोन, छत्रपती संभाजीनगरमधील एका मोठ्या प्रकल्पाचा समावेश आहे. दोन प्रकल्पात २५ ते ५० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये परभणी व नांदेडमधील प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश आहे.

उपयुक्त पाणीसाठा १० टक्क्यांवर

मराठवाड्यातील एकूण ८७७ प्रकल्पातील एकूण उपयुक्त पाणीसाठा १० टक्क्यांवर आला आहे. त्यामध्ये मोठ्या ११ प्रकल्पात १२ टक्के, मध्यम ७५ प्रकल्पात ४ टक्के, ७४९ लघु प्रकल्पात ५ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यात १० टक्के तर तेरणा, मांजरा ,रेना नदीवरील २७ बंधाऱ्यात उपलब्ध असलेल्या ४ टक्के उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश आहे.

जालन्यातील लघु प्रकल्प मृत साठ्यात

जालना जिल्ह्यातील सर्व ५७ लघु प्रकल्प मृतसाठ्यात गेले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील २७ लघु प्रकल्पात केवळ दोन टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे. परभणी जिल्ह्यातील २२ लघु प्रकल्पात ३ टक्के, धाराशिवमधील २०६ प्रकल्पात ६ टक्के, नांदेडमधील ८० प्रकल्पात १५ टक्के,लातूरमधील १३४ प्रकल्पात ७ टक्के, बीडमधील १२६ प्रकल्पात ४ टक्के तर छत्रपती संभाजीनगरमधील ९८ लघु प्रकल्पात केवळ ५ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे.

नांदेड वगळता सर्वत्र उपयुक्त पाणीसाठा तळाला

मराठवाड्यातील एकूण लघु, मध्यम प्रकल्पांपैकी नांदेड जिल्ह्यातील प्रकल्प वगळता सर्वच जिल्ह्यातील प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा तळाला गेला आहे. छत्रपती संभाजीनगर मधील १६ व जालन्यातील सात मध्यम प्रकल्पात सरासरी ३ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे.

बीडमधील १६ मध्यम प्रकल्पात ९ टक्के, लातूरमधील ८ मध्यम प्रकल्पात २ टक्के, तर धाराशिवमधील १७ मध्यम प्रकल्पात केवळ एक टक्का उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. नांदेड जिल्ह्यातील नऊ मध्यम प्रकल्पात १३ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com