
बाजारात सध्या लसणाचे दर दबावात आहेत.(Agriculture Market) देशात लसूण उत्पादनात मध्य प्रदेश (Madhy Pradesh) आघाडीवर आहे. मात्र यंदा येथे बंपर उत्पादन झाल्याचं व्यापारी सांगतात. त्यामुळं ऐन काढणीच्या काळात म्हणजेच महिनाभरापुर्वी लसणाला अगदी १०० रुपये क्विंटलपासून दर मिळत होता. त्यामुळं शेतकरी संतप्त झाले होते.आता आवक काहीशी रोडावली आहे.
त्यामुळं दरही सुधारले. सध्या मध्य प्रदेशात लसणाला प्रति क्विंटल १६०० ते २८०० रुपये दर मिळतो. मात्र हा दर अपेक्षेपेक्षा कमीच आहे, असं शेतकरी सांगतात. तर राज्यात लसणाला ३००० ते ५००० रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय. हा दर पुढील काही दिवस टिकून राहण्याचा अंदाज आहे.
कांदा दरावरील दबाव कायम
मागील काही दिवसांमध्ये कांदा दरात काहीशी सुधारणा झाली आहे. बाजारातील आवक आजही जास्त दिसतेय. शेतकऱ्यांनी दरवाढीची जवळपास पाच महिन्यांपर्यंत वाट पाहिली. मात्र तरीही अपेक्षित दरवाढ झाली नाही. पण चाळीतील कांद्याचं नुकसान होतंय. त्यामुळं शेतकरी आता चाळीतील कांदाही बाजारात आणत आहेत. त्यामुळं आवकेचा दबाव कायम आहे. सध्या कांद्याला सरासरी ११०० ते १४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय. पुढील काळात कांदा आवक काहीशी कमी होण्याची शक्यता असून दरात वाढ होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.
उत्पादन घटूनही डाळिंब दबावात
राज्यातील बाजारात डाळिंबाची आवक कमी झालेली दिसतेय. यंदा डाळींब पिकावर पाऊस आणि कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळं डाळिंबाची गुणवत्ता कमी झाली. यंदा गुणवत्तापूर्ण डाळिंबाचं उत्पादन घटलं होतं. गुणवत्तापूर्ण डाळिंबाला १० हजार ते १६ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळतोय. तर कमी दर्जाच्या डाळिंबाचे व्यवहार ४ ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान होत आहेत. मात्र घटलेलं उत्पादन आणि कमी दर यामुळं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. पुढील काळात दर्जेदार डाळिंबाच्या दरात वाढ होण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.
उडदाचे दर सुधारण्याची शक्यता
देशातील अनेक बाजारात सध्या नव्या उडदाची आवक सुरु झाली. मात्र पावसामुळं उडदामध्ये ओलावा अधिक येत आहे. तसंच महत्वाच्या उडीद उत्पादक मध्य प्रदेशात पावसामुळं पिकाचं नुकसान वाढलंय. इंदोर आणि कोटा विभागात जवळपास ३० ते ५० टक्के पिकाचं नुकसान झाल्याचं स्थानिक प्रशासनानं स्पष्ट केलंय. त्यामुळं उडीद उत्पादनात आणखी घट होण्याची शक्यता आहे. तसंच सध्या उडदाला ६ हजार ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. उडदात ओलावा कमी झाल्यानंतर दर सुधारण्याची शक्यता असल्याचं जाणकारांनी सांगितलं.
अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन घटतंय ?
आंतरराष्ट्रीय बाजारात बुधवारी सोयाबीनच्या दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. अमेरिकेतील काही भागांत सोयाबीनची काढणी सुरु झाल्याचे वृत्त आहे. भारत आणि अमेरिकेतील सोयाबीन जवळपास एकाच वेळी काढणीला येते. अमेरिका सोयाबीन उत्पादनात ब्राझीलनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
यंदा ब्राझील आणि अर्जेंटीनात सोयाबीन उत्पादनवाढीचा अंदाज व्यक्त होतोय. मात्र या दोन्ही देशांमध्ये पेरणीही सुरु झालेली नाही. त्यामुळं उत्पादनवाढ होईलच हे आताच सांगता येत नाही. मागील वर्षी दोन्ही देशांमध्ये दुष्काळाचा फटका सोयाबीन पिकाला बसला होता. तर यंदा अमेरिकेत दुष्काळामुळं सोयाबीन उत्पादन कमी राहण्याचा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागानं अर्थात युएसडीएनं व्यक्त केलाय. अमेरिकेत मागील हंगामात १ हजार २०७ लाख टन सोयाबीन उत्पादन झालं होतं. मात्र यंदा १ हजार १९१ लाख टनांवरच उत्पादन स्थिरावण्याचा अंदाज आहे. म्हणजेच उत्पादन दीड टक्क्यांनी कमी होईल. विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यात युएसडीएनं गेल्यावर्षीपेक्षा २६ लाख टनांनी उत्पादन वाढेल, असं म्हटलं होतं.
मात्र सोयाबीन पिकावर दुष्काळाचा परिणाम स्पष्ट झाल्यानंतर आज युएसडीनं उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा १६ लाख टनांनी कमी राहील, असा अंदाज जाहीर केलाय. युएसडीएचा अहवाल प्रसिध्द झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात जवळपास अर्धा टक्क्याने सुधारणा झाली. बुधवारी सोयाबीनचे वायदे १४.८८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते. तर देशातही काही बाजारांमध्ये सोयाबीन दरात क्विंटलमागं ५० रुपयांची सुधारणा झाली. सोयाबीनचे व्यवहार प्रतिक्विंटल ४ हजार ९०० ते ५ हजार २५० रुपयांच्या दरम्यान झाले. सोयाबीनला सुरवातीच्या टप्प्यात किमान ५ हजार रुपये दर मिळेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.