Pune News : शेतीमालाच्या काढणी पश्चात तंत्रज्ञानाअभावी होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांची शेतमाल साठवणुकीतून समृद्धी होण्यासाठी वखार महामंडळाने गेल्या तीन वर्षांत साठवणूक क्षमता १ लाख २२ हजार टनांपर्यंत वाढविली आहे.
तर नव्याने गोदामे बांधण्यासाठी १०० एकर जागा खरेदी केली असून, समृद्धी महामार्गावर ३३ कोटी रुपये खर्च करून ॲग्रो लॉजेस्टिक पार्क उभारण्यात येत असल्याची माहिती वखार महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे यांनी दिली. वखार महामंडळाच्या ६६ वा वर्धापन दिन मंगळवारी (ता. ८) साजरा होत आहे. या निमित्ताने तावरे यांनी महामंडळाच्या उपक्रमांची माहिती दिली.
तावरे म्हणाले, ‘‘वखार महामंडळाची ३३ जिल्ह्यांमध्ये २०४ ठिकाणी १ हजार ३३३ गोदामे आहेत. या गोदामांची साठवणूक क्षमता २३ लाख टन एवढी आहे.
ती गेल्या तीन वर्षांत १ लाख २२ हजार टनांनी वाढली आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल काढणी दरम्यान अचानक बाजारपेठेत दाखल होऊन, बाजारभाव पडतात यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते.
हे नुकसान टाळण्यासाठी वखार महामंडळाच्या वतीने शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना वखार भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. तर शेतकरी उत्पादक संस्थांना २५ टक्के सवलत देण्यात येत आहे.’’
शेतकऱ्यांसाठी वखार आपल्या दारी उपक्रम
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वखार महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा यासाठी वखार आपल्या दारी अभियान खरिपाच्या काढणी दरम्यान राबविण्यात येत आहे. गेल्यावर्षी ५४ वखार केंद्रावर या अभियानाअंतर्गत ४ हजार ५८८ शेतकऱ्यांनी सहभाग घेत लाभ घेतला आहे.
शेतकऱ्यांना घर बसल्या तारण कर्ज
शेतकऱ्यांना घर बसल्या अवघ्या तीन तासांमध्ये ब्लॉकचेनच्या माध्यमातून तारण कर्ज देण्यात येते. हा उपक्रम राज्य सहकारी बॅंकेच्या वतीने राबविण्यात येत असून, या उपक्रमाअंतर्गत १०३ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. तर तारण कर्ज योजनेत ६०२ कोटींचे कर्ज वाटप करण्यात आल्याचे तावरे यांनी सांगितले
देशात क्रमांक एकवर महामंडळ
देशात महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ क्रमांक एकवर असल्याचेही तावरे यांनी यावेळी सांगितले. वेअरहाऊसिंग डेव्हलपमेंट ॲण्ड रेग्युलेटरी संस्थेच्या वतीने १९४ वखार केंद्रांची नोंदणी (अधिस्वीकृती) करण्यात आली आहे. याची साठवणूक क्षमता १७ लाख टन एवढी असून, महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे. यानिमित्ताने राज्याचा देशपातळीवर गौरव झाल्याचे तावरे यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.