Stone Crusher Pollution कासा : तलासरी तालुक्यातील वेवजी काटीलपाडा येथे असलेल्या खदान आणि क्रशर मशिन बंद करण्यासाठी गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीमध्ये ठराव केला होता. त्यानंतर तहसीलदारांनी पंचनामा करून काही महिन्यांपूर्वी खदान क्रशर मशिन बंद केली होती. याबाबत क्रशर मशिन मालकाने डहाणू उपविभागीय अधिकाऱ्याकडे अपील करून क्रशर पुन्हा सुरू करण्यास परवानगी मिळवली आहे.
त्यामुळे क्रशर पुन्हा जोमाने सुरू होऊन परिसरात पुन्हा धुळीचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत गावकऱ्यांनी पुन्हा तलासरी तहसीलदारांना तक्रार अर्ज देऊन क्रशर मशील बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
तलासरी तालुक्यातील वेवजी हे गाव पेसाअंतर्गत येते. येथे पेसामुळे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या ठरावाशिवाय काहीही करता येत नाही; पण येथे पेसा कायद्याला बासनात गुंडाळून तक्रारदारांकडे कोणतीही विचारणा न करता ग्रामपंचायत ठराव न घेता ही क्रशर कशी सुरू केली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या क्रशर मशिनमुळे अनेकांच्या घरांना तडे गेले आहेत. येथील शाळा धोकादायक झाली आहे. क्रशर मशिनच्या दगडी धुळीने शेती नापीक होत आहे. वेवजी येथील खदाण व क्रशरमुळे लोकांना त्रास होतो. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार तलासरी तहसीलदारांकडे तक्रारी केल्या आहेत.
परवानगी का दिली ?
क्रशरच्या धुळीने शेती नापीक होत आहे. विहिरी, बोरिंगचे पाणी आटत आहे. दगडाच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्ते खराब झाले आहेत. याला ग्रामस्थांचा विरोध होत आहे.
ही क्रशर बंद करण्यात यावी म्हणून ग्रामसभेत ठराव घेऊन परवानग्या रद्द करण्यात आल्या आहेत. असे असताना क्रशर मशिन सुरू करण्यास परवानगी दिल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.
त्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. क्रशरमालक काही राजकारण्यांना हाताशी धरून लोकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप बबला धोडी यांनी केला असून आंदोलन करणार असल्याचे सांगितले.
तलासरी तालुक्यातील वेवजी काटीलपाडा येथील क्रशन मशिन बंद करण्यासाठी ग्रामस्थांचा तक्रार अर्ज आला. त्यानुसार चौकशी करण्यात येईल.
- श्रीधर गलिपेल्ली, तहसीलदार, तलासरी
वेवजी काटीलपाडा येथील ग्रामसभेत ठराव घेऊन क्रशर, खदानीच्या परवानग्या रद्द केल्या आहेत. पेसा कायदा असताना क्रशर सुरू करण्याबाबत ग्रामपंचायतीकडे कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही.
- मंगेश पाटील, ग्रामविकास अधिकारी, वेवजी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.