
Nagar News : ‘‘पाऊस नाही, पेरलेली पिके वाया गेली आहेत. आता पाऊस आला तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, परंतु झालेले नुकसान भरून निघणार नाही. साहेब आम्हाला मदत करा,’’ अशी कैफियत शुक्रवारी (ता.८) राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांनी माजी मुख्मंत्री व शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली.
शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. काही दिवस पाहू नाही, तर शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार आहे. काळजी करू नका,’’ असा धीर देत ठाकरे यांनी नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील पिकांची पाहणी केली. ‘‘शासन आपल्या दारी’’ कार्यक्रमाचा फायदा काय, असा प्रश्न उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला.
नगर जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाचा खंड आहे. त्यामुळे खरिपाची पिके ८० टक्के वाया गेली आहेत. शिवसेना कार्यकारी अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. ८) राहाता तालुक्यातील पुणतांब्याजवळ पिंपळवाडी रस्ता, कोपरगाव तालुक्यातील काकडी, संगमनेर तालुक्यातील पठार भागात काही गावांतील पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. विधानसभेतील विरोधीपक्ष नेते आंबादास दानवे, खासदार विनायक राऊत, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
‘महिन्यापेक्षा अधिक काळ लोटलाय, पाऊस नाही, पिकांची आवस्था वाईट आहे. ८० टक्के पिके वाया गेली आहेत. रोजगार नाही. शेतीवर कर्ज घेतले, पण आता फेडायचे कसे अशी चिंता आहे. जिथे पाणी आहे, तेथे दिवसा वीज नाही. एकरी पन्नास हजार खर्च आलाय, उत्पन्न पंचवीस टक्केही मिळेल की नाही, सांगता येईना. जनावरांना चारा नाही, विकतचे टॅंकरने पाणी आणावे लागते. अशा परिस्थितीत सरकारकडून शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळाली पाहिजे, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा,’’ असे सांगून शेतकऱ्यांनी वास्तवता व्यक्त केली. टोमॅटो, कांद्याचे दर पाडल्याचाही यावेळी शेतकऱ्यांनी उल्लेख केला.
शेतकऱ्यांच्या व्यथा एकून घेतल्यावर उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका करत अंदोलन उभारणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘‘राज्यातला शेतकरी संकटात आहे. शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे. नुकसानीचे तातडीने सरसकट पंचनामे झाले पाहिजे. शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. जर शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले तर शिवसेनापूर्ण ताकदीने उभी राहील. शेतकऱ्यांनो, पचंनामे होतात की नाही, ते मला कळवा, माध्यमानेही शेतकऱ्यांना मदत होतेय की नाही याकडे लक्ष द्यावे,’’ असेही ठाकरे म्हणाले.
‘शासन आपल्या दारी’ ने काय दिले?
सरकार ‘‘शासन आपल्या दारी’’ कार्यक्रम घेते आहे. आपल्या जवळच शिर्डीला हा कार्यक्रम झाला. काय दिले या ‘शासन आपल्या दारीने,’ असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी काकडी (ता. राहाता) शिवारात पाहणी करताना शेतकऱ्यांनी विचारला. शेतकऱ्यांना लाभ दिला जात असल्याचे सांगत केवळ फार्स केला जात आहे. कोट्यवधी रुपये खर्च केले. मात्र आलेल्या लोकांना उपाशी परत जावे लागले. आमच्या काकडी गावांत कोट्यवधी रुपये खर्च करून विमानतळ केले, मात्र आमच्या ग्रामपंचायतीचे साडेसात कोटी रुपये दिले नाही असे सांगत तेथील नागरिकांनी कैफियत मांडली.
‘२५ टक्के अग्रिम द्या’
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘सरकार निघृण, निर्दयी आहे. लाठीमार करत आहेत. आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर तुमचे बहुमत आहे. विशेष अधिवेशन बोलावून प्रश्न सोडवा. विमा योजनेचा शेतकऱ्यांना काही फायदा नाही. विमा कंपन्यासाठी सरकार काम करते आहे. पाऊस झाला तर चारा, पाण्याचा प्रश्न सुटेल, पण झालेले नुकसान भरून येणार नाही. त्यामुळे २५ टक्के अग्रीम नाहीतर पूर्ण शंभर टक्के विमा भरपाई द्यावी. जाहिरातीवर मोठा खर्च करतात. पण शेतकऱ्यांना मागील नुकसान भरपाई दिली जात नाही. महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. स्वतःच्या शेतात हेलिकॉप्टरने जाण्याऐवजी शेतकऱ्यांच्या शेतात जावे,’ असेही ते म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.