Pune News : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी कृषिमंत्री व अतिरिक्त मुख्य सचिवांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे २० अधिकाऱ्यांना बढती मिळणार असून कृषी आयुक्तालयाकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
राज्यात सध्या एसएओ पदाच्या २४ जागा रिक्त आहेत. यात नागपूर १, अमरावती १, औरंगाबाद ४, नाशिक ३, कोकण २, तर पुणे विभागात १३ जागा रिक्त आहेत.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, रिक्त जागा भरण्यासाठी यापूर्वीसारखी अडवणूक होणार नाही, अशी भूमिका कृषिमंत्री धनंजय मुंडे व अतिरिक्त मुख्य सचिव अनूप कुमार यांनी घेतली आहे. त्यामुळे दिरंगाई न होता प्रथमच काही अधिकाऱ्यांना बढती मिळते आहे.
रिक्त जागा भरण्यासाठी कृषी आयुक्तालयाने यापूर्वी अधिकाऱ्यांच्या प्रस्तावांची छाननी केली होती. छाननी केल्यानंतर प्रस्ताव पुढे ‘खात्यांतर्गत पदोन्नती समिती’कडे (डीपीसी) पाठवले होते. कृषी सचिवांच्या अध्यक्षतेखालील या समितीने प्रस्तावांवर शिक्कामोर्तब केले व सामान्य प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवले होते.
अलीकडेच सामान्य प्रशासन विभागाचे या प्रस्तावांना मान्यता दिली. त्यामुळे कृषी उपसचिव अ.नि.साखरकर यांनी कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांना पत्र पाठवून बढती दिल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे कळवली आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
बढतीच्या मूळ यादीतील एका उपसंचालकाचा गेल्या महिन्यात मृत्यू झाला आहे. तसेच एक अधिकारी निवृत्त झाला आहे. त्यामुळे बढती दिल्या जाणाऱ्या २० अधिकाऱ्यांकडून त्यांच्या पसंतीच्या विभागांचे विकल्प मागविण्यात आले आहेत. विकल्प प्राप्त होताच मंत्रालयात नागरी सेवा मंडळाची बैठक होईल.
मंडळाच्या शिफारशींवर कृषिमंत्री शिक्कामोर्तब करतील व अंतिम स्वाक्षरीसाठी प्रस्ताव पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच जातील, असे सूत्रांचे म्हणणे आहे. बढती मिळालेल्या अधिकाऱ्यांना नवे पद मिळण्यासाठी अजून किमान एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
या अधिकाऱ्यांना मिळणार बढती
सुबोध मोहरील, कंसात सध्याची पदे नमुद केली आहेत.
(उपसंचालक, वसंतराव नाईक कृषी व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, नागपूर), फिलिप डिसोजा (विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकारी, अहमदनगर), दीपक पटेल (समन्वय अधिकारी, उपसंचालक कृषी व्यवसाय, आत्मा, बुलडाणा), अजय कुलकर्णी (उपसंचालक, खते विभाग, कृषी आयुक्तालय), रक्षा शिंदे (विभागीय सांख्यिक, जेडीए कार्यालय, लातूर), शीतल चव्हाण (उपविभागीय कृषी अधिकारी, जालना), प्रियांका भोसले (उपसंचालक, एसएओ कार्यालय, सांगली), आश्विनी भोपळे (उपसंचालक, विस्तार व प्रशिक्षण, माहिती विभाग, कृषी आयुक्तालय),
माधुरी सोनवणे (प्रकल्प उपसंचालक, आत्मा,नांदेड), वंदना शिंदे (प्रकल्प उपसंचालक, आत्मा, नाशिक), गोकुळ वाघ (उपविभागीय कृषी अधिकारी, नाशिक), दत्तात्रय दिवटे (उपसंचालक, एसएओ कार्यालय, छत्रपती संभाजीनगर), विठ्ठल कर्डिले (उपसंचालक, कृषी गणना, कृषी आयुक्तालय), राजेंद्र कदम (उपसंचालक, सध्या पद नाही),
गोविंद मोरे (उपसंचालक, दक्षता पथका, कृषी आयुक्तालय), कैलास शिरसाठ (जिल्हा कृषी विकास अधिकारी, नाशिक), खंडोराव सराफ (उपसंचालक, फलोत्पादन विभाग, कृषी आयुक्तालय), अंबादास मिसाळ (उपविभागीय कृषी अधिकारी, मेहकर, बुलडाणा), ज्ञानेश्वर तसरे (उपविभागीय कृषी अधिकारी, उमरेड, नागपूर), श्रीपाद खळीकर (सहसंचालक, विस्तार विभाग, दिल्ली).
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.